"प्रौढ लेकरू "
खेड्यामधले घर कौलारू हे गदिमांचं भावपूर्ण भावगीत - अगदी त्या घराचं मूर्तिमंत चित्र
त्यातल्या नादांसकट डोळ्यापुढे उभं करणारं. विशेषतः त्यातलं
“माजघरातिल उजेड मिणमिण
वृध्द काकणे करिती किणकिण
किणकिण ती हळू ये कुरवाळू
दूरदेशीचे प्रौढ लेकरू”
हे शेवटचं कडवं तर स्वतः प्रौढ झाल्यावर जास्तच जवळचं झालं. खरंच, जोपर्यंत मोठीमा णसं घरात, आसपास आहेत तोपर्यंत आपलं वय कितीही झालं तरी लेकरूपण संपत नाही, खूप छान उबदार वाटत राहतं. हे भाग्य परमेश्वराने भरभरून माझ्या पदरात घातलंय. आई वडील, सासू, सासरे यांच्याबरोबरच इतर ज्येष्ठ नातेवाईक, ओळखीचे यांचा खूप स्नेह लाभला,आजही लाभतो आहे. माझ्या माम्या,आत्या, मावश्या, काकू यांनी तर लाड केलेच पण माझ्यासासूबाईंच्या बहिणी, वहिन्या यांच्याकडून ही मला भरपूर प्रेम मिळालं, मिळतं आहे.
नातं नसलेल्या अनेकांनीही या प्रौढ लेकरावर माया केली आहे.
आमचे फॅमिली फ्रेंड इन्स्पेक्टर नाईक पोलिस दलातून निवृत्त झालेले. करारी, कडक शिस्तीचेभोक्ते. तोंडावर कधी कौतुक नाही करणार पण मनात उदंड प्रेम. नेहमी पेरू घेऊन यायचे.त्यात मला आवडतो म्हणून एक कडक पेरू नक्की असणारच. “घ्या, दगड आणलायतुमच्यासाठी. दात बीत पडले तर मला सांगू नका” ही वर पुस्ती.आमच्या घरासमोर राहणाऱं सोमण कुटुंब म्हणजे धामणकरांचे लोकमान्यनगर पासूनचे सख्खे शेजारी. सोमण आजी – त्यांना सगळे मम्मी म्हणायचे- अत्यंत प्रेमळ. आमच्या घरातल्या सगळ्यांचे वाढदिवस त्यांच्या लक्षात असायचे. फोन तर करायच्याच पण त्या त्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ स्वतः करून घेऊन यायच्या. एकदा मम्मींनी फोन केला. म्हणाल्या येऊन जा. मी गेले. मनात उत्सुकता होती का बर मुद्दाम बोलावलं असेल? माझ्यासमोर गळ्यातल्या कानातल्याचे बरेच सेट्स ठेवले आणि म्हणाल्या “ घे कुठलं आवडेल ते”. “अहो पण हे कशासाठी आत्ता”? तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आलं.
त्यांचे यजमान – पपा- जाऊन बरीच वर्षं झाली होती. माझं लग्न व्हायच्या कितीतरी आधी ते गेले होते. मी त्यांना पाहिलंच नव्हतं.
“पपांना डॉ. धामणकरांच्या ओळखीने तुझ्या वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये- श्री क्लिनिक मध्ये नोकरी लागली होती. तेव्हा तू खूपच लहान- आठ- दहा वर्षांची होतीस. हॉस्पिटलच्या वरच घर असल्यामुळे तू खाली येऊन सगळ्यांशी गप्पा मारायचीस, गाणी बिणी म्हणायचीस. पपांना तुझं खूप कौतुक होतं. मला एकदा म्हणाले, “इतकी चुणचुणीत मुलगी आहे. पुढे नक्की नाव कमावणार बघ. मला तिला काहीतरी द्यायचंय. तू जरा तिच्यासाठी छान बांगड्या घेऊन ये.”
पण काही न काही कारणाने त्या बांगड्या काही आणल्या गेल्या नाहीत. पुढे पपा गेलेच. आता तुझे इतके कार्यक्रम होतात, पेपरमध्ये नाव फोटो बघून मला तेव्हाची आठवण झाली. म्हटलं पपांची तेव्हाची राहिलेली इच्छा आता तरी पूर्ण करूया. म्हणून हे आणलंय. तुला आवडेल ते घे.”
आमच्या घरासमोर राहणाऱ्या लीलुताई जोशी- माझ्या सासूबाईची खास मैत्रीण. अप्रतिम चित्रकार. माझ्या चर्पट्मंजिरी या एकपात्री कार्यक्रमाच्या पाचशेव्या प्रयोगाला त्यांनी आपणहून दरवाज्यापाशी सुंदर रांगोळी काढली, त्यात माझ्याबद्दल कौतुकाच्या चार ओळी लिहिल्या.
माझा आतेभाऊ दोन वर्षांसाठी इंग्लंडला गेला होता. २००५ मध्ये त्याची आई – माझी उषाआत्या आणि मी त्याच्याकडे जाणार होतो. मुंबईहून दुपारी १ वाजता जेट एअरवेजची फ्लाईट होती. मी सकाळी पुण्याहून जेटच्याच फ्लाईट ने गेले. उषाआत्या मुंबईला जॉईन होणार होती. मी मुंबईला पोचून डोमेस्टिक वरून इंटरनॅशनल एअरपोर्टला जाऊन पुन्हा सिक्युरिटी वगैरे सोपस्कार करून विमानात बोर्ड करेपर्यंत जरा उशीरच झाला. आत जायच्या रांगेत उभ्या असताना मी सहज आत्याला म्हटलं, “ भूक लागली बाई, केव्हा सकाळी निघालीये. डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळे काही खायला पण दिलं नाही. आता ह्या फ्लाईटमध्ये लवकर खायला दिलं म्हणजे बरं.” तिकीट वेगळं वेगळं काढल्यामुळे तिची आणि माझी सीट जवळ नव्हती. एअरहोस्टेसला सांगितलं तर म्हणाली आत्ता बसून घ्या, नंतर बघू.आम्ही बसतो न बसतो तोच कुर्सी की पेटी बांधनेका संकेत बिंकेत सुरूच झालं. अचानक माझ्या खांद्यावर हात पडला. दचकून पाहिलं तर आत्याबाई पोळीचे रोल घेऊन उभ्या. मी काही म्हणायच्या आत ते माझ्या हातात देऊन ती परत फिरली. तेवढ्यात एअरहोस्टेस तिला ओरडलीच. इतर सगळेजण ही तिच्याकडे नाराजीने बघत होते. हे सगळं का, तर भाचीला भूक लागली होती म्हणून.
कमलमावशी- माझ्या आईची बालमैत्रीण. कॅनडा मधे राहणारी. दर वर्षी हिवाळ्यात चार महिने पुण्यात यायची. अत्यंत धमाल प्रकरण. मावशीपेक्षा मैत्रीणच जास्त.
२००७ मध्ये मी अमेरिकेला जाणार हे कळल्याबरोबर मावशीबाईंनी हुकूम केला. माझ्याकडे कॅनडाला आलंच पाहिजे. मी तुला नायगारा दाखवायला नेणार आहे. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आठवडाभर तिच्याकडे मस्त माहेरपण झालं. नायगाराची ट्रीप तर केवळ अविस्मरणीय. तिच्या घरासमोर एक केनेडियन कुटुंब राहायचं. जेफ, शॅरन आणि त्यांच्या तीन मुली. एकट्या राहणाऱ्या कमल मावशीला त्यांची खूप मदत होत असे. शॅरनच्या माहेरचं कुटुंब खूप मोठं. पीच,प्लम चेरीच्या बागा, फुलशेती असणारं प्रचंड खटलं. त्यांची इस्टेट नायगाराच्या वाटेवरच. तिने सांगितलं तिथे नक्की जा. आम्ही अर्थातच गेलो. त्यावेळी पीचचा सीझन होता. शॅरनच्या वहिनीने बागा दाखवल्या,फळांची तोडणी, प्रतवार निवड, पॅकिंग सगळ्या प्रक्रिया समजावून सांगितल्या, प्रत्यक्ष दाखवल्या. ग्रीन हाउसमधली फुलांची शेती बघून तर डोळ्याचं पारणं फिटलं. निघताना मालकीण बाईंनी प्रीमियम क्वालिटी पीचेसची एक छोटी करंडी भेट दिली. काय रसरशीत फळ. तोंडाला अगदी पाणी सुटलं पण हावरटासारखं लगेच त्यांच्या समोर खाणं वाईट दिसलं असतं म्हणून कशीबशी कळ काढली. पण गाडी त्यांच्या इस्टेटीच्या बाहेर पडल्याबरोबर मी फराळ सुरु केला. शप्पत सांगते तशी पीचेस मी त्यापूर्वी आणि नंतर ही आजतागायत खाल्ली नाहीत. इतकी रसाळ होती की खाता खाता कितीही जपलं तरी रस गळत होता. तिच्या गाडीतले सगळे टिश्यू पेपर्स संपले तरी आपलं माझं कोपरापर्यंत आलेला रस चाटणं चालूच होतं. आम्ही दोघीही इतक्या हसत होतो की शेवटी पोट दुखायला लागलं. खरंच मी अगदी एखाद्या स्वच्छंद, उन्मुक्त छोट्या मुलीसारखी वागत होते. कमल मावशी, त्या क्षणांसाठी तुझे किती आभार मानू!
नायगाराच्या आधी नायगारा ऑन द लेक नावाचं एक गाव लागतं. किती टुमदार आणि देखणं म्हणून सांगू! जुलै ऑगस्ट महिन्यात तिथे थिएटर फेस्टिवल्स होतात. लोक नटूनथटून नाटकाला चालले होते. मला जरा हेवाच वाटला. नायगाराला पोचलो. लहानपणापासून इतकं ऐकलेला नायगारा प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून मी अगदी खूष होते. पाहिला.अगदी डोळे भरून पाहिला. मेड ऑफ द मिस्ट, टनेल वॉक सगळं काही अनुभवलं. त्यावर एक कविताही झाली. आमची मावशी जगमित्र. चक्क नायगारा गावात सुद्धा तिची एक मैत्रीण राहते. तिच्याकडे आम्ही राहणार होतो कारण रात्री त्या धबधब्यावर रंगीबेरंगी प्रकाशझोत टाकतात ते मला दाखवल्याशिवाय मावशीला चैन कसं पडणार!
तिच्या गावी ग्वेल्फला परत आलो. रोज काही न काही गम्मत चालूच होती. माझा कार्यक्रमही तिने तिथे ठरवला होता. इंग्लंडमध्ये शेक्सपियरचं गाव स्ट्रॅटफोर्ड ऑन अॅव्हॉन जसं जतन केलय त्याची प्रतिकृति ग्वेल्फजवळ आहे. तिथे गेलो. तशीच कमनीय वळण घेतलेली नदी,विहार करणारी बदकं, त्यावरचे देखणे पूल, काठावरचे पाण्यात डोकावणारे वीपिंग विलोज, सगळं तसंच. एक दिवस एका सुंदर थिएटरमध्ये जाऊन एक म्युझिकल नाटक बघितलं.
नायगारा ऑन द लेक मध्ये नाटक बघता न आल्याचं शल्य काही अंशी कमी झालं.
तिच्या घरून निघताना म्हणाली पुढच्या वेळी दिलीपला घेऊन ये. नायगाराच्या काठावरच्या आलिशान हॉटेलमध्ये तुमच्यासाठी हनिमून सूट बुक करते. मात्र ते राहूनच गेलं. कमलमावशीने त्या आधीच जगातून एक्झिट घेतली.
गेल्या जन्मी मी बरंच पुण्य कमावलं असणार म्हणूनच या जन्मात इतकं उदंड प्रेम वाट्याला आलं. मी ही मग मनात आलं की सगळ्या आज्यांना गाडीत घालते. कधी नाटक बघून, कधी मस्त फिरून खाऊन पिऊन आम्ही परत येतो. त्या थोरांमुळे माझं सानपण टिकून आहे.
मध्यंतरी लेकीच्या घरी गेले होते. मी बाहेरच्या खोलीत होते. तिने आतून हाकमारली, “ आई, गरम पोळी खायला ये”. अरेच्या, इतकी वर्षं मी तिला जी हाक मारत आले ती हाक आज माझी लेक मला मारते आहे? खरंच की, साठी जवळ आली म्हणजे दुसरं बालपण सुरू झालं म्हणायचं----
नायगारा कविता –
नायगाऱ्यास,
खरं सांगू?
लांबून पाहिलं तेव्हा तू त्या बाजारी वातावरणात मनाला भिडला नाहीस.
जितकं ऐकलं होतं त्या मानाने प्रथमदर्शनी तितकासा भावला नाहीस.
तू तेव्हा नक्की मनात मला हसला असशील
‘आगे आगे देख होता है क्या’ म्हणाला असशील.
झालंही तसंच,
तुझी धुंदपरी (मेड ऑफ द मिस्ट बोट )मला तुझ्याजवळ घेऊन गेली,
आणि बघता बघता जादूची कांडी फिरली.
इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला,
अन धीरगंभीर ओंकाराने अंगावर रोमांच उमटला.
आधी काही चुकार तुषारांनी गुलाबपाणी शिंपडून स्वागत केलं,
मग मात्र पाहुणचाराच्या सरींनी अंगभर भिजवलं.
शुभ्र फेसाळते लोट आवेगाने झेपावत होते,
खाली फुटून फेसाळताना धुक्याचा पडदा विणत होते.
मग तुझ्या पोटात शिरून (टनेल वॉक) तुझं रहस्य जाणण्याचा प्रयत्न केला,
तेव्हा ओठी तेच पोटी हा अंतर्बाह्य निखळपणा अनुभवला.
रात्री रंगीबेरंगी प्रकाशझोतात तुला पाहिलं,
पण त्या कृत्रिम रंगात तुझं भारदस्त देखणेपण मुळीच नाही मावलं.
सूर्यकिरणांच्या रोषणाईशीच तुझ्या तारा जुळतात,
इंद्रधनुष्याचे अलंकार तुझं सौंदर्य शतगुणित करतात.
मी निघाले तेव्हा सहस्रावधी धारांनी माझा निरोप घेतलास,
‘माझं बर्फाळ तटस्थ रूप बघायला ये’ प्रेमळ आग्रह केलास.
तुझे खूप फोटो काढले इतरांना दाखवण्यासाठी,
माझ्या मनःपटलाची छबी मात्र फक्त माझ्यासाठी,
अगदी खास माझ्याचसाठी ||


.jpeg)