शुद्धमती
‘नवक्षितिज’ –
डॉ नीलिमा आणि डॉ चंद्रशेखर देसाई यांनी मतिमंद प्रौढांसाठी स्थापन केलेली निवासी
संस्था. दोघेही आमचे जवळचे मित्र असल्यामुळे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली
तेव्हापासून आजपर्यंतची वाटचाल जवळून बघितलेली. आज नवक्षितिजच्या २१ व्या वर्धापन
दिनाला गेले असताना तो सर्व पट नजरेसमोरून तरळून गेला. शेखर-निलीमाची धाकटी मुलगी
अदिती मतिमंद. तिचा पूर्णपणे स्वीकार करून तिच्यासारख्या इतर मुलांची १८ वर्षानंतर
संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी नवक्षितिज उदयाला आली. त्यांना केवळ
अन्न,वस्त्र, निवाराच नव्हे तर उदंड प्रेम आणि त्यांना त्यांचे आयुष्य सन्मानाने,
क्रियाशीलतेने आणि अतिशय आनंदाने जगता येईल अशा सोयी हे नवक्षितिजचे वैशिष्ट्य.
इथे आज साठीच्या घरात असलेली ‘मुले’ही आहेत. आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात
काहींनी सादर केलेले देशभक्तीपर, पर्यावरणाचा संदेश देणारे कार्यक्रम बघताना
त्यांचे शिक्षक आणि काळजीवाहक यांच्यापुढे आपोआपच मान झुकली. या सगळ्या प्रवासात
नीलिमा एका अतर्क्य आजाराने सर्वांना सोडून गेली पण तिने आरंभलेले कार्य थांबले
नाही. संस्था चालवणारे सर्वजण, तिथे राहून काम करणारे कर्मचारी, काळजीवाहक, त्यांची
क्षुधाशांती करणाऱ्या अन्नपूर्णा- सर्वांना सलाम आहे.
आज स्टेजवरचा
त्या ‘मुलांनी’ सादर केलेला सुंदर कार्यक्रम बघताना आणखी एक आठवण जागी झाली.
काही वर्षांपूर्वी कामायनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणी या नात्याने उपस्थित राहण्याचा योग आला. १९६४ मध्ये सिंधूताई जोशींनी मतिमंद मुलांसाठी सुरु केलेल्या या शाळेची निगडीला एक शाखा आहे. त्या शाखेचे स्नेहसंमेलन होते. सर्व कार्यक्रमांचे सूत्र होते – ‘नाती.’ त्यात वडील-मुलगा, गुरु - शिष्य, पैलवान – माती, गाव- गावकरी, देश – देशवासीय, देव- भक्त, निसर्ग- माणूस अश्या विविध नात्यांवर कार्यक्रम बसवलेले होते. दिव्यांग मुलांचे कार्यक्रम म्हणजे ‘ अशी असून सुद्धा त्या मानाने चांगले करताहेत’ असा जास्त कौतुकाचाच भाग असणार अशी धारणा, पण कार्यक्रम सुरु झाले आणि त्यात त्या मुलांची त्या त्या जागेवर उभे राहण्यातली अचूकता, शिकवलेल्या हालचाली तंतोतंत करण्याची धडपड, समरसता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निर्व्याज हसू,हे बघताना माझ्या डोळ्यांना धारा केव्हा लागल्या माझे मलाही कळले नाही.
मुलांचे पोषाख, नेपथ्य, संगीत सगळेच उत्तम जमून आले होते. ते त्या मुलांकडून बसवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडेच. विशेष म्हणजे कार्यक्रम चालू असताना एकही शिक्षक/शिक्षिका स्टेजवर तर नाहीच, पण विंगमध्ये सुद्धा उभे नव्हते. कोणाचे चुकले तर मुलेच त्याला कसे करायचे ते हसत हसत दाखवत होती. देशाचे नाते दाखवताना तर मुले हातात २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांचे फोटो असलेला फ्लेक्स घेऊन आली. सगळ्या हॉलने उभे राहून मानवंदना दिली.
कामायनीचे वर्कशॉप आहे,
त्यातील मुला-मुलींनी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांची
तालाची, लयीची समज बघून थक्क व्हायला झालं.
सलग ५ तास गाऊन रेकॉर्ड केलेला
दिव्यांग मुलगा पृथ्वीराज इंगळे याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याची आई
सांगत होती की
लिहिता वाचता येत नसूनही त्याला शेकडो गाणी पाठ आहेत. कुठूनही मधून म्युझिक लावलं
तरी बरोब्बर तो ते गाणं सुरु करतो.
फक्त त्याला युगुलगीत म्हणता येत
नव्हतं कारण आपण थांबायचं आणि गायिकेला गायला द्यायचं हे त्याला समजत नव्हतं. मग त्याची आई त्याला एखाद्या
युगुलगीताचा व्हिडीओ दाखवायची, हिरोसारखे
कपडे त्याला घालायची, हिरोईनचे कपडे स्वतः घालायची आणि मग तिचा भाग आला
की त्याला थांबवून स्वतः गायची. त्यामुळे आता तो युगुलगीतेही उत्तम प्रकारे म्हणू
शकतो.
खरोखरच धन्य आहे पालकांची,
शिक्षकांची, मुलांना शाळेत नेण्या- आणणाऱ्या
बसचालक-वाहकांची, इतर मदतनिसांची आणि अर्थातच अत्यंत निरागस
असणाऱ्या या मुलांची. अर्थात त्यांचेही भावनांचे चढ उतार,
रुसून बसणे असणारच पण मला वाटते ते क्षणिक असणार. कामायानीतल्या त्या मुलांना आणि नवक्षितिजमधल्या प्रौढांना
बघताना मला सारखे जाणवत होते की परमेश्वराने त्यांना जसे जन्माला घातले त्या शुध्द
स्वरूपातच ती आजही
आहेत. आपल्यासारख्या तथाकथित बुद्धिमंतांप्रमाणे राग,लोभ,द्वेष,मत्सर यांची गाठोडी
त्यांनी निर्माण केलेली नाहीत.
त्यामुळे त्यांचे प्रेम निरपेक्ष आहे. म्हणूनच त्यांना मंदमती म्हणण्याऐवजी ‘शुद्धमती’ म्हटले पाहिजे.
