११ –
११- ११.
११ ह्या आकड्याशी माझे भलते
सख्य. माझा वाढदिवस ११ नोव्हेंबर म्हणजे ११-११. आणि तिथीप्रमाणे कार्तिकी एकादशी,
म्हणजे पुन्हा अकराच. मग २०११ सालचा माझा वाढदिवस म्हणजे ११-११-११, अत्यंत दुर्मिळ
योग. जेव्हा हे लक्षात आले, तेव्हाच ठरवले की त्या दिवशी काहीतरी खूप वेगळे, छान
करायचे. पण नक्की काय,ते सुचत नव्ह्ते. महागडी वस्तू घेणे किंवा पंचतारांकित
हॉटेलात जेवायला जाणे ह्या आम्हा दोघांच्याही आनंदाच्या कल्पना कधीच नव्हत्या. मग
काय बरे करायचे? एकदम सुचले. त्या दिवशी एवरेस्ट बघायचे. मी अजिबातच गिर्यारोहक
वगैरे नाही. पण आमच्यासारख्या साठी नेपाळ सरकारने छान सोय केली आहे. काठमांडू
विमान तळावरून एक छोटे विमान प्रवाश्यांना घेऊन जाते आणि अनेक शिखरांच्या शेजारून
जात जात शेवटी एवरेस्ट दाखवून वळते. ही कल्पना सुचली आणि मी माझ्यावरच खूश झाले.
लगेच नियोजनाला सुरुवात केली. आमचा निष्णात गिर्यारोहक मित्र डॉ. रघुनाथ गोडबोले
ला सांगितले. तो हिमालयाचा भक्तच असल्यामुळे त्याने तत्परतेने माहिती दिली. नेपाळ
पर्यटन आयोजनाचा प्रचंड अनुभव असलेल्या प्लेझर ट्रेवल्सच्या सुजाता जोशी शी गाठ
घालून दिली (जिचे पुढे कायमच्या मैत्रीत रुपांतर झाले.) आमचे मित्र भरत, अमला फाटक
आणि रुक्मिणी ,बंडोपंत साठे आमच्या उत्साहात सहभागी झाले.
६ ते १२ नोव्हेंबर अशी आमची
ट्रीप ठरली. ज्यांना ज्यांना सांगितले त्यातील बहुतेक सर्वांनी मनापासून शुभेच्छा
दिल्या. काहींनी मात्र “जाताय, पण एवरेस्ट नक्की दिसेलच असे नाही. सगळे काही त्या
दिवशीच्या हवामानावर अवलंबून असते.” असे म्हणून नाट लावायचा ही प्रयत्न केला. पण
मी म्हटले,“मी “त्याला” सांगितलंय की मला माझ्या वाढदिवसाला एवरेस्ट बघायचंय. आता
ते मला दाखवायचं की नाही ही त्याची मर्जी.”
६ ता. ला पुणे दिल्ली
काठमांडू असे आमचे विमान होते. माझे पती डॉ, दिलीप, मी, अमला, भरत, रुक्मिणी,
बंडोपंत असा आमचा चमू निघाला. दिल्लीहून निघाल्यावर थोड्या वेळात हिमालयाचे दर्शन
व्हायला लागते. रघुनाथने विमानात कोणत्या बाजूला बसायचे तेही सांगितले होते.
शिखरांची नावासह चित्रे काढून दिली होती. आम्ही खिडकीला डोळे लावून बसलो होतो. आणि
दिसला. अगदी काठमांडूला उतरेपर्यंत हिमालय
दिसत राहिला. आम्ही चित्रे बघून शिखरे ओळखायचा प्रयत्न करत होतो. बराच वेळ घिरट्या
घालून विमान उतरले. आम्ही हॉटेलला गेलो. तिथे सुजाता जोशीची नेपाळमधील जोडीदार
उज्ज्वला दली स्वागताला होतीच. उज्ज्वला मूळची पुण्याचीच. नेपाळी माणसाशी लग्न
करून तिकडे गेली. नेपाळच्या पर्यटन बोर्ड मध्ये काम करते. ती म्हणाली, “ विमानाला
उशीर होत् होता तशी मला काळजीच वाटत होती. नोव्हेंबर मध्ये खरे तर हवा अगदी सुरेख
असते पण कालपर्यंत हवा इतकी खराब होती की काही उड्डाणे रद्द झाली.” झालं, मनात जरा
पाल चुकचुकली पण लगेच म्हटलं, आज सुधारली ना, आता आणखी सुधारेल.
दुसऱ्या दिवशी सकाळी पोखराला
जायचे होते. काठमांडू पोखरा उड्डाणे सुद्धा गेल्या चार दिवसापासून ठप्प आहेत ही
वार्ता कळली. आम्ही विमानतळावर जाऊन बसलो. मनात विश्वास होता की आपल्याला जायला
मिळणार. झालंही तसच. ९ ला सुटणारे विमान ३ तास उशीरा का होईना पण सुटले. तिथले
हॉटेल अप्रतिम होते. हॉटेलच्या मागेच मत्स्यपुच्छ शिखर, अन्नपूर्णा शिखराचा काही
भाग दिसतो असे कळले होते पण इतके ढग होते की काहीच दिसत नव्हते. तिथे आम्ही दोन
दिवस राहणार होतो. पहाटे सूर्योदयाच्या वेळी अन्नपूर्णा शिखराचे दर्शन हे तिथले
मुख्य आकर्षण होते. तिथे राहणारे काही लोक म्हणत होते, ‘ आम्ही पाच सहा
दिवसांपासून इथे आहोत पण इतके ढग आहेत की सूर्योदय दिसलाच नाही.” आम्हालाही
दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्या ड्रायव्हरचा फोन आला की आज जाण्यात अर्थ नाही. ढग
आहेत.
आम्ही आवरून तळ्याकडे
फिरायला गेलो. तिथे काही मुली अन्नपूर्णा आणि मत्स्यपुच्छ पर्वतरांगांचे अप्रतिम
फोटो असलेली पोस्टर्स विकत होत्या. आम्ही विचारले हे फोटो कुठून काढले आहेत? त्या
हसून म्हणाल्या इथूनच. काय! इथून ही शिखरे दिसतात? आम्ही डोळे फाडफाडून बघितले पण
ढगांशिवाय काही दिसत नव्हते. अरे बापरे, हिमालय आपल्याला प्रसन्न होणार की नाही!
संध्याकाळी आम्ही तिथे एक
सुंदर संग्रहालय आहे ते बघायला गेलो. अमलाने मला हाक मारली आणि खिडकीबाहेर
अंगुलीनिर्देश केला. अहाहा, मत्स्यपुच्छ शिखराचे टोक दिसू लागले होते. आम्ही
हॉटेलमध्ये परते पर्यंत मावळतीची किरणांनी आरक्त झालेला आणखी थोडा भाग दृग्गोचर
झाला होता. हॉटेलच्या गच्चीवर जाऊन सूर्यास्त होईपर्यंत आम्ही ते दृश्य डोळ्यात
साठवत होतो. रात्री जोरदार पाऊस सुरु झाला. हॉटेलमधील माहितगार मंडळी खूश झाली. “
पाऊस पडला म्हणजे उद्या नक्की सूर्योदय दिसणार.” आपके मुंह में घी शक्कर म्हणत
आम्ही पहाटेची वाट बघू लागलो.
पहाटे
४ ला उठून व्ह्यू पोईंट ला गेलो. अजून तसा अंधार होता पण पर्वतांच्या काळसर
रेखाकृती दिसत होत्या. सूर्योदय जिथे
होणार त्या दिशेकडे आधी बघत राहिलो. मग लक्षात आले की उगवत्या सूर्याचे किरण
शिखरांना उजळताना बघायला हवे, मग तिकडे तोंड करून उभे राहिलो. हळूहळू सूर्यनारायण
उदित झाले आणि एकेका शिखरावर जणू दिवा लागत गेला . काय ती शोभा वर्णावी! शब्दातीत
दृश्य, पण मी ते कवितेत बद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्या भागात पर्वताला हिमाल म्हणतात.
तोच शब्द मी कवितेत घेतला.
मिलन
हिमाल
राजाच्या मुकुटाचे रश्मी राणीने चुंबन घेतलं,
हलके हलके राजाने राणीला
अंगभर लपेटून घेतलं.
काल
तिन्हीसांजेपर्यंत ती त्याच्याबरोबरच होती.
नंतर सहस्ररश्मी पित्याबरोबर
दूरदेशी गेली होती.
रात्र
सरताच उषेचं बोट धरून रश्मी लगबगीनं आली.
वाट पाहणाऱ्या राजाला
आवेगाने बिलगली.
हिमाल
तेजोमय झाला की रश्मी हिममय झाली?
कुणास ठाऊक, पण दोघ एकरूप
झाली.
हिमाल
रश्मीच्या मिलनाची मी भाग्यवान साक्षीदार,
ह्या क्षणाबद्दल देवा, किती
मानू आभार!
एका आगळ्या धुंदीतच परत आलो.
त्या दिवशी हवा इतकी स्वच्छ होती की तलावाकाठच्या मुलीकडच्या पोस्टरमधलं आधी न
दिसलेलं दृश्य प्रत्यक्ष बघून अगदी डोळ्याचं पारण फिटलं.
तिथून आम्ही चितवन
अभयारण्यात जायला निघालो. आयलंड रिसोर्ट नावाच्या एका बेटावरच्या रिसोर्टमध्ये
आम्ही राहणार होतो. जंगलातच वसवलेल्या त्या जागेत वीज नाही. झोपडीवजा खोल्या. बेट
असल्यामुळे समोर वाहणारी नदी. अत्यंत रम्य ठिकाण. पायी चालत, हत्तीवरून, जीपमधून
जंगलात मनसोक्त हिंडलो. तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे एकशिंगी गेंडा. त्याचंही दर्शन
झालं. तिथला आणखी एक भन्नाट प्रकार म्हणजे एलिफंट बेदिंग. हत्तींना नदीत आंघोळीला
नेतात तेव्हा त्यांच्या पाठीवर आपण बसायचं. हत्ती सोंडेत पाणी घेऊन आपल्यावर
फवारतात. मधेच पाठीवरून खाली पडतात. इतकी मजा आली म्हणून सांगू!
तिथे सूरज नावाचा आमचा गाईड
होता. त्याने विचारलं, “रात्री जंगलात फिरायला आवडेल का?” दिलीप आणि मी लगेच तयार
झालो. तो म्हणाला, “हत्ती झोपले की मी तुम्हाला बोलवायला येतो. हत्ती कसे झोपतात
तुम्ही कधी पाहिलं नसेल.” खरंच की. नव्हतंच पाहिलं.
रात्री त्याच्याबरोबर
निघालो. नेमकी त्या दिवशी पौर्णिमा होती. कुठेच वीज नसल्यामुळे टिपूर चांदण्यात
न्हाऊन निघालेलं ते जंगल, चांदीचा प्रवाह असावा तशी दिसणारी नदी,निःशब्द शांतता,
आम्ही भारल्यासारखे त्याच्या मागून चालत होतो. हत्तींच्या निवास स्थानापाशी गेलो.
सूरजने आधीच सांगितलं होतं की सगळे हत्ती कधीच एकदम झोपत नाहीत. आळीपाळीने झोपतात.
दोन जण पहारा देतात. आम्ही अगदी हळू, पाय न वाजवता गेलो. बघितलं तर खरंच दोन जागे
होते. बाकीचे कुशीवर झोपलेले होते. खरंच सांगते झोपलेल्या बाळांना बघताना जसं वात्सल्य मनात दाटत, तसं, दिवसभर आमची धुडे
वाहून दमून भागून झोपलेले ते निरागस हत्ती बघताना माझ्या मनात दाटून आलं.
आणखी थोडं हिंडून सूरजने
आम्हाला खोलीपर्यंत सोडलं. त्याला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही दार लावलं. लगेचच
त्याने परत दार वाजवले. दार उघडताच त्याने न बोलता फक्त नदीच्या दिशेने निर्देश
केला. नदीपलीकडे एक गेंडा स्तब्ध उभा होता. स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघालेली
चंदेरी नदी, गूढरम्य भासणारं जंगल आणि त्या नेपथ्यात उभा असलेला तो गेंडा , एखादे
स्वप्नदृश्य असावे तसा तो देखावा होता. रात्री फिरायला न आलेल्यांना दुसऱ्या दिवशी
आम्ही सगळ्याचं वर्णन जरा तिखट मीठ लावूनच सांगितलं.
काठमांडूला परतलो. ११.११.११.
उजाडला. सकाळी ७.३० ला “ती” फ्लाईट होती. विमानतळावर जाण्यासाठी खाली आलो, तर
हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सुहास्य मुद्रेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक
सुंदरसा केक हातात ठेवला. हिला कसं कळलं हा प्रश्न मनात यायच्या आतच उत्तर सापडलं.
उज्ज्वला ने केक ठेवला असणार. तेव्हढ्यात तिचा फोन आलाच. “ गाडी बाहेर उभी असेलच.
आज हवा सुंदर आहे. तुझी एव्हरेस्ट बघायची इच्छा नक्की पूर्ण होणार. Happy Birthday.”
विमानतळावर
आलो. खरंच हवा अगदी स्वच्छ होती. असणारच होती. आधी कोणाजवळ बोलले नव्हते पण माझी
दृढ श्रद्धा होती की देव माझा संकल्प सिद्धीला नेणार. विमानात बसलो. तिकिटाबरोबर
एक मोठा फोटो दिला होता. जी शिखरं दिसणार त्यांचे नावासकट फोटो होते. विमानाने
आकाशात भरारी घेतली. आम्ही हातातल्या फोटोवरून शिखरं ओळखण्याचा प्रयत्न करत
होतो. सगळीच शिखरं सुंदर दिसत होती. पण गौरीशंकर आम्हाला सगळ्यांनाच फार आवडलं.
वैमानिक एकेकाला कॉकपिट मध्ये बोलावत होता. विमानाच्या खिडकीतून छानच दिसत होतं पण
कॉक पिट मधून समोर दिसणाऱ्या हिमालयाची भव्यता श्वास रोखणारी होती. जसजसं विमान
एव्हरेस्ट जवळ जाऊ लागलं तशी माझी धडधड वाढायला लागली. ८-९ महिन्यापासून जपलेलं
स्वप्न पूर्ण होणार होतं. आणि- दिसलं- एवरेस्ट दिसलं. सगळ्या हिमनगांपेक्षा उंच,
स्थितप्रज्ञ भासणारं, अवघ्या जगाच्या कुतूहलाचा विषय असलेलं ते अत्युच्च शिखर
११.११.११.ला मला दिसलं. तोपर्यंत विमानातल्या सगळ्यांनाच माझ्या वाढदिवसाबद्दल
कळलं होतं, त्यामुळे एव्हरेस्ट दिसताच सगळ्यांनी Happy Birthday चा जल्लोष केला. माझा
वाढदिवस खरोखर On top of the world साजरा झाला. अनेक भावनांची मनात गर्दी झाली होती. त्यांची नंतर कविता झाली.
नेपाळी लोक एवरेस्टला सगरमाथा म्हणतात. कवितेचं शीर्षक अर्थात तेच.
सगरमाथा
तू सगरमाथा,
नभाच ललाट
सगळाच
हिमालय सुंदर , पण तुझा न्यारा थाट.
तुला
भेटायचं म्हणजे गिर्यारोहकांना मोठं आव्हान,
सर्वात
उत्तुंग स्थान म्हणून जगात तुला मोठा मान.
पण
एक सांग,
इतक्या
उंचावर कधी एकट एकट वाटतं का रे?
सोबतीची
गरज कधीतरी भासते का रे?
अरे
पण हो,
जमिनीपासून
तू सर्वात दूर म्हणजे तुला जवळ आकाश,
म्हणजे
ईश्वराचाच शेजार तुला, त्याचा सतत सहवास.
तुला
बघण्यासाठी केव्हाचं आसुसल होतं मन
आणि
अचानक तुझ्याबरोबर “त्यानेही” दिलं दर्शन.
खरं
तर “तो” असतो निर्गुण निराकार,
पण
माझ्यासाठी तुझ्या रूपात झाला सगुण साकार.
तुझं
रूप कोरलं गेलं कायमचं माझ्या हृदयावर.
तुला
बघता आलं ही देवाची केवढी कृपा माझ्यावर!-------------