Blog no. 2024/1
03/09/2024
पंचक्लेश
योगेन चित्तस्य पदेन वाचां मलं शरीरस्य च वैद्यकेन
योऽपाकरोत्तं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोsस्मि ||
योगाच्या
सहाय्याने चित्ताची मलीनता घालवून चित्तशुद्धी कशी करता येते हे १९५ पातंजल योगसूत्रे सांगतात. ‘चित्ताची
मलीनता’ हे शब्द ऐकल्यावर मला एकदम लहानपणी पारायणे केलेल्या श्यामची आई
पुस्तकातलं आईचं वाक्य आठवलं, ‘ पायाला घाण लागू नको नये म्हणून जितका जपतोस
तितकाच मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम.’ त्या माउलीने योगसूत्रे वाचली
होती की नाही कोण जाणे पण भारतीय संस्कृती जनमानसांत कशी आणि किती रुजली होती हे
त्या माउलीच्या शब्दांतून दिसतं.
चित्तवृत्तींचा
निरोध म्हणजे योग असं पतंजली सांगतात. म्हणजेच चित्तातील खळबळ शांत होणं. मुळात ही
खळबळ माजते याच एक महत्त्वाचं कारण म्हणजे पंचक्लेश – अविद्या, अस्मिता, राग,
द्वेष आणि अभिनिवेश.
पतंजली
म्हणतात की साधकाच्या समाधीप्रत जाण्याच्या साधनमार्गातील हे अडथळे आहेत.
हे सगळं
वाचताना मी या सर्व बाबींचा माझ्याशी कसा संबंध जोडायचा याचा विचार करते. मी एक
सामान्य बाई. समाधी वगैरे या जन्मात तरी शक्य नाही हे पूर्णपणे जाणून आहे. पण मग
समाधी नाही तरी माझं काहीतरी उद्दिष्ट असलंच पाहिजे. मग आयुष्य वगैरे मोठे शब्द न
वापरता, सर्वसाधारणपणे माझा रोजचा दिवस कसा असावा असं मला वाटतं? तर रोजचा
व्यायाम, दैनंदिन नित्यकर्मे ,कामाच्या- घरातल्या जबाबदाऱ्या नीट पार पाडणे, लेखन-वाचनातून
मेंदूला खुराक देणे, काही मनोरंजन, होईल तेवढी दुसऱ्याला मदत- हे तर आहेच पण हे
सर्व करताना माझी मानसिक, भावनिक स्थिती बिघडू न देणं हे माझं उद्दिष्ट आहे.
परिस्थिती कशी असावी, इतरांनी माझ्याशी कसं वागावं यावर माझं नियंत्रण नाही, पण
त्याला मी प्रतिसाद कसा द्यावा हे माझ्या नियंत्रणाखाली असलं पाहिजे हे माझं
उद्दिष्ट आहे. त्यामध्ये हे पंचक्लेश कसा अडथळा आणतात?
अविद्या – अज्ञान.
मी प्रकृतीचा घटक नसून प्रत्यक्ष चैतन्य आहे याची जाणीव नसणं म्हणजे अविद्या अशी
व्याख्या आहे. पण हा क्लेश अत्यंत सूक्ष्म आहे. मग दैनंदिन जीवनांत त्याचं माझ्या
मानसिक भावनिक स्थिरतेत अडथळा आणणारं स्थूल रूप कुठलं असा विचार करताना जाणवलं की ‘गैरसमज’
म्हणे अविद्या. कोणतीही परिस्थिती, प्रसंग, एखाद्या व्यक्तीचं वागणं याचा सारासार
विचार न करता, ‘मला असं वाटलं’ म्हणत आपल्याला सोयीस्कर तो अर्थ लावून गैरसमज करून
घेणं आणि तो कुरवाळत बसणं ही अविद्या. वाटलं म्हणजे चुकलंच ना! पतंजली म्हणतात की ही
अविद्या हेच इतर चारही क्लेशांचं मूळ आहे.
अस्मिता – अहंकार.
मलाच सगळं कळतं, माझ्या म्हणण्याप्रमाणेच सगळ्यांनी वागलं पाहिजे, मी कलाकार आहे,
मला सगळ्यांनी ओळखलं पाहिजे, मान दिला पाहिजे हे गैरसमज उर्फ अविद्येमुळेच घडतं,
नाही का? ‘मी म्हणून टिकले आहे, मी आहे म्हणून घर / ऑफिस चाललं आहे हा एक लाडका (
गैर)समज. नुकतंच माझं गुडघ्याचं ऑपरेशन झालं तेव्हा हा माझा गैरसमज पूर्णपणे दूर
झाला. घराचं आणि कलाविश्वाचं माझ्यावाचून काहीही अडलं नाही.
राग म्हणजे आसक्ती,
मोह आणि द्वेष म्हणजे तिरस्कार. हे क्लेश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं
मला वाटतं –पतंजली म्हणतात ‘सुखानुशायी राग’ आणि ‘दुःखानुशायी द्वेष’. आसक्ती ही
सुखाच्या मागेमागे जाते आणि द्वेष हा दुःखाशी जोडलेला असतो. ज्या व्यक्ती आपल्याला
अनुकूल वागतात, आपला अहंकार, अस्मिता कुरवाळतात, किंवा ज्या गोष्टींनी इंद्रियांना
सुख मिळतं, त्या हव्याश्या वाटतात, त्या कायम माझ्यासाठी उपलब्ध असाव्यात हा माझा
हट्ट असतो आणि तशा त्या असल्या की मला आनंद होतो आणि नसल्या की मला दुःख होतं, राग
( मराठीतला) येतो. एखादी माझ्या मर्जीतली व्यक्ती कधी माझ्या विरुध्द वागली, बोलली
की लगेच मला तिच्याविषयी वाटणारी मैत्रीची, प्रेमाची भावना तिरस्कारात बदलते. त्या
व्यक्तीच्या सहवासात मला असुरक्षित वाटू लागतं. म्हणजे माझा आनंद - दुःख, प्रेम-
तिरस्कार बाह्य गोष्टींवर अवलंबून आहे . आपल्या
गोष्टींबद्दल अतिरेकी ममत्त्व हे आसक्तीचे मूळ. दृक दृश्य विवेक सांगतो की माझं
शरीर, माझ्या वस्तू, माझं घर, माझी बाग म्हणजे ‘ मी’ नाही. पण माझ्या बागेतली फुलं
कोणी तोडली तर मला क्लेश होतात. स्वामी रामतीर्थ यांच्या या दोन ओळी मला खूप
आवडतात –
अपने मज़े
की खातिर गुल ही छोड़ दिए जब
सारे जहाँ के गुलशन हमारे हो गये ||
पण त्या
आचरणात आल्या पाहिजेत.
अभिनिवेश –
मृत्यूची भीती किंवा देहाला चिकटून राहण्याची बुद्धी. मला वाटतं की प्रत्यक्ष
मृत्यूची सुप्त भीती असतेच, पण आत्ता आपल्याजवळ असलेल्या प्रिय गोष्टी, व्यक्ती दूर
जातील ही भीती रोजच्या आयुष्यात जास्त भेडसावते. आज कलाकार म्हणून माझी थोडीफार
प्रसिद्धी आहे, मान आहे, तो उद्या नसला तर? आज मी इतकी कामं करू शकते, आज माझी
प्रकृती, स्मरणशक्ती, सृजनशीलता उत्तम आहे, पण ती कायम तशी राहिली नाही तर? ही
भीती म्हणजे अभिनिवेश. हा क्लेश स्वरसवाही आहे अशी याची व्याख्या आहे म्हणजे या
क्लेशाला बाह्य कारण लागत नाही. खरंच आहे की. माझी आत्ताची ही सगळी परिस्थिती
बदलेल असं आज या घडीला तरी काही कारण दिसत
नाही, पण मनात कुठेतरी धास्ती आहेच. पुन्हा – जे कायम टिकणार नाही हे पक्कं माहित
असूनसुद्धा ते टिकेल असा दिलासा देत राहणं - हा गैरसमजच.
अविद्या
सर्वव्यापी आहे. ती सोडून इतर चार क्लेश
कधीच पूर्णतः नाहीसे होत नाहीत, पण ते चार पातळ्यांवर काम करतात.
प्रसुप्त –स्थितप्रज्ञ
व्यक्तीमध्ये हे क्लेश प्रसुप्त पातळीवर असतात, म्हणजे ते असतात पण त्यांचा त्याला
त्रास होत नाही.
तनु – क्षीण
अवस्थेत असतात, म्हणजे कधीतरी वर येतात, पण त्यांचे निराकरण करणे शक्य असते.
विच्छिन्न - व्यक्त होण्याचे अधिक जास्त प्रमाण. विखुरलेल्या
अवस्थेत असतात.
उदार – खूपच
जास्त प्रमाणात व्यक्त होतात. एखाद्या क्लेशाचे वर्चस्व असते.
मग सध्या
विच्छिन्न किंवा उदार पातळीवर असलेल्या माझ्या क्लेशांचं तनुकरण कसं करता येईल?
त्यासाठी पतंजलींनी क्रियायोग सांगितला आहे – तप, स्वाध्याय, ईश्वरप्रणिधान.
म्हणजे मी काय
करायचं? तर मी असा अर्थ लावला आहे की
तप – म्हणजे ओंकार,
प्राणायाम, ध्यान यांच्या योगे मानसिक, भावनिक बळ वाढवायचं,
स्वाध्याय –
स्व अध्याय – जेव्हा माझं मानसिक, भावनिक स्थैर्य ढळतं, तेव्हा ते नक्की कुठल्या
क्लेशामुळे झालं आहे याचं निरीक्षण.
ईश्वर
प्रणिधान – Grounding. सतत त्या परम शक्तीशी अनुसंधान असणं. ते असलं तर आपोआपच
अहंकार, कर्तृत्वाची भावना क्षीण होईल.
यासाठी विमल
लिमये यांच्या ‘घर असावे घरासारखे’ या कवितेतल्या शेवटची ओळ चपखल आहे.
‘पंख असावे
आकाशाचे, परि उंबरठ्यावर भक्ती’
संकल्प तर
केला आहे. सिद्धीस जावा यासाठी पुन्हा
पतञ्जलिं प्राञ्जलिरानतोsस्मि ||
मंजिरी धामणकर
