हुंडाबळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हुंडाबळी लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २९ मे, २०२५

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

 







                             आणखी एक ( किती?) बळी!

“ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण केली तर तो कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नाही- असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे. तो आज आम्ही सादर केला” असा वैष्णवी हगवणे केसमधील बचाव पक्षाच्या वकिलाने युक्तिवाद केला. ज्यांनी निकाल दिला त्या न्यायमूर्तींना आणि या वकील साहेबांना माझे दोन प्रश्न आहेत

११)   जर हा छळ आणि हिंसाचार नाही, तर मग कौटुंबिक हिंसाचाराची व्याख्या तुमच्या मते काय आहे? सळ्यांनी मारहाण करणे, चटके देणे, की आणखी काही? जर तसे असेल तर मग फक्त हाताने मारहाण झाली तर कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार नोंदवण्यासाठी पत्नीला हे सगळे होईपर्यंत थांबावे लागणार का?

२२)   याला जर ‘छळ’ म्हणता येणार नाही तर काय म्हणता येईल? पुरुषार्थ? की पराक्रम?

मुळात घटना विषण्ण करणारी आहेच त्यातून अशी विधाने ऐकली की संतापाने लाही होते. पण हा वांझोटा संताप आहे की काय अशी भीती वाटते. न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहेच, पण राहून राहून असे वाटते की न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्यासाठी तिचा जीव जाईपर्यंत का वाट पाहिली? दीड एक वर्षांपूर्वी सुद्धा तिने विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे वाचले. तरीही आई वडिलांनी तिला पुन्हा सासरी का पाठवले? तेव्हाच छळाची तक्रार का केली नाही? काय अगतिकता होती? सत्ता आणि पैसा यांनी माजलेले सासरचे लोक काय करतील ही भीती? 'जिस घर में तेरी डोली जाएगी वहीं से तेरी अर्थी उठेगी ' या पिढ्यानपिढ्या माथी मारलेल्या वाक्यामुळे समाजात नाचक्की होईल ही भीती? की आणखी काही? पण या सगळ्या शंका, भीती तिच्या जिवापेक्षा जास्त होत्या?

काय उपाय आहे या भीतीवर मात करण्याचा? पूर्वी मुली शिकलेल्या नसायच्या, कमावत्या नसायच्या, आत्मविश्वास नसायचा, म्हणून त्या ओठ मिटून सासुरवास सहन करायच्या अशी समजूत होती. पण आजही तीच परिस्थिती? इतके अत्याचार का सहन करतात मुली? कुठे तक्रार करायची ते समजत नाही म्हणून? माहेरचा आधार नाही मिळाला तर एकटी कशी राहू, खाऊ काय, या प्रश्नांपोटी? सासरचे राजकीय लागेबांधे असले तर आणखी काय काय सोसावे लागेल या भीतीपोटी? आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलण्याइतक्या का हतबल होतात?

ती तर जीवानिशी गेलीच पण तिच्या ९-१० महिन्याच्या बाळाचे काय? त्याच्या पोरकेपणाला जबाबदार कोण?

सीमेपलिकडच्या दहशतवादाला जरब बसवण्यासाठी बरेच काही केले जाते, ते योग्यच आहे पण घरातल्या या दहशतवादाला कोण कशी कधी जरब बसवणार? आणखी किती निरपराध बळी जायला हवेत त्यासाठी?

नुसते प्रश्न-प्रश्न-प्रश्न! मिळणार आहेत का यांची उत्तरे कधी? – हाही एक अनुत्तरित प्रश्नच.

या घटनेचा विषाद वाटून माझा भाऊ नंदन फडणीस याने ही उर्दू गजलनुमा कविता लिहिली

फिर दहेज़ ने इक मासूम को निगला है,

और कहते हो अब समाज ये बदला है.

औरत के सम्मान के चर्चे बहुत हुए,

समझ गए हैं सारे ये बस जुमला है.

बाबुल क्यों ना घर वापस उसको ले आये,

रहरहकर दिल से सवाल ये निकला है.

उसके दिल के अरमाँनोंको उम्मीदों को,

इस निज़ाम ने बेरहमी से कुचला है.         

मर्दों के ही बनाये सब कानून हैं,

हर सूरत में औरत का दामन मैला है.

कुछ दिन की ये खबर न बन कर रह जाए,

हर दुल्हन के वुजूद का ये मसला है.         

जिनके हाथों इक़्तिदार है दौलत है,         

उनके ही घर से ये जनाज़ा निकला है.

अख़लाक़ी-अक़दार खो चुके हम 'नंदन',    

रोज़ आदमी और एक क़दम फिसला है. – नंदन फडणीस

 

याचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद –

हुंड्याने आणखी एक निरपराध बळी घेतला आहे,

आणि तुम्ही म्हणता समाज सुधारला आहे !

स्त्री सन्मानाच्या चर्चा खूप झडतात,

मात्र तो फक्त पोकळ शब्दांचा गलबला आहे.

वडिलांनी तिला माहेरी का आणलं नाही?

अशा अनेक प्रश्नांचा मनात कल्लोळ माजला आहे.

तिच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षांना,

या व्यवस्थेने निष्ठुरपणे सुरुंग लावला आहे.

पुरुषांनीच बनवले आहेत सर्व कायदे,

स्त्रीच्या पदरात कायमच कलंक आला आहे.

ही बातमी चार दिवसांत विरून जाऊ नये,

प्रत्येक विवाहितेच्या अस्तित्वावर प्रश्न उठला आहे.

सत्तेची, पैशाची धुंद मस्ती आहे जिथे,

त्याच दारातून या प्रेतयात्रेचा उगम झाला आहे.

सभ्यता - संस्कृतीला तिलांजली दिलीच आहे आपण

माणसाचा पाय दिवसेंदिवस घसरतच चालला आहे.

 


आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...