प्रार्थना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
प्रार्थना लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २५ मे, २०२५

ईश्वराची दया २०२५/७

 



                                                                  



                                                                       ईश्वराची दया 

“डोळ्यांनी बघतो, ध्वनी परिसतो कानी, पदी चालतो.

                      जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो.

हातांनी बहु साल काम करतो, विश्रांतीही घ्यावया-

-घेतो झोप सुखे फिरुनी उठतो, ही ईश्वराची दया.”

लहानपणी ऐकलेली, केलेली ही प्रार्थना आज सकाळी जाग येतायेताच आठवली. लहानपणी ती अगदी साधी वाटायची पण का कोण जाणे, आज त्यावर जरा विचार करावासा वाटला आणि त्या साध्या सोप्या शब्दांत किती खोल अर्थ आहे हे जाणवलं. प्रार्थना कदाचित तुम्हां सगळ्यांचीच पाठ असेल पण आज ती मला कशी भिडली ते सांगते.

“ईश्वराची दया” या शब्दांनी सुरुवात करूया. त्या करुणानिधीच्या दयेला, करुणेला सीमाच नाही. मोठ्या संकटातून, आजारातून, अडचणीतून आपण बाहेर आलो की आपण ‘त्याचे’ आभार मानतो पण आपण रोज आपल्याही नकळत किती गोष्टी करतो आणि त्या गृहीत धरतो त्यांची या प्रार्थनेत जाणीव करून दिली आहे.

डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, पायांनी चालतो. – ‘मग? त्यात काय मोठं?’ अशा गुर्मीत आपण असतो, पण वयोमानापरत्वे, किंवा इतर काही कारणामुळे दृष्टी तितकीशी चांगली राहिली नाही, ऐकू कमी यायला लागलं, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाड मोडणे किंवा अन्य काही कारणामुळे चालायला त्रास होऊ लागला की मग त्याची किंमत कळते. ईश्वराच्या कृपेने आपण बघतो, ऐकतो आहोत ही सतत जाणीव असेल तर काय बघतो, काय ऐकतो, मोबाईल-टीव्ही स्क्रीनवर किती वेळ घालवतो याबद्दल मला वाटतं आपण जागरूक राहू.

जिव्हेने रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो – करोना काळात ज्यांची चवीची जाणीव गेली होती, किंवा कधीकधी आजारपणामुळे अन्नाची चव लागत नाही, तेव्हा जेवणातील गंमतच संपते. ‘मधुर’ हा शब्द दोन्हीकडे लागू पडतो. रस चाखण्याला जोडून घेतला तर असं म्हणता येईल, की जे अन्न खातो आहोत ते ‘गोड मानून’ म्हणजेच नावं न ठेवता आनंदाने ग्रहण करणं. बोलण्याला जोडून घेतला तर गोड बोलणं असा अर्थ होईल. पण म्हणजे पोटात एक ओठांत एक असं कृत्रिम गोड बोलणं नव्हे, तर श्रेयस साधणारं प्रेयस बोलावं असा मी त्यातून अर्थ घेतला. हे अजिबातच सोपं नाही. पण ध्येय काय आहे हे तरी त्यातून निश्चित होईल. मी तर फारच तडकफडक बोलणारी आहे. ‘मी स्पष्टवक्ती’ आहे अशी मी स्वतःची समजून करून घेतली आहे, पण ती चुकीची आहे हे आज पुन्हा एकदा जाणवलं. त्यालाच मी माझ्याकडून एक आणखी पुस्ती जोडते- मितभाषण असायला हवं. ज्ञानेश्वर माउली सांगतात त्याप्रमाणे

साच आणि मवाळ | मितुले आणि रसाळ|

शब्द जणू कल्लोळ | अमृताचे||

हे कुठल्या तरी जन्मात साध्य व्हावं!!

हातांनी बहु साल काम करतो – सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आपापली कामं चोख करत असतात तेव्हा आयुष्य किती सुखकर असतं हे, ती तितक्या ताकदीने कामं करेनाशी होतात तेव्हा जाणवायला लागतं. म्हणूनच आतापर्यंतच्या ओळींमध्ये सांगितलेलं सगळं सुरळीत चालू असतं ती ईश्वराचीच कृपा!

विश्रांतीही घ्यावया घेतो झोप सुखे, फिरुनी उठतो – किती महत्त्वाची ओळ आहे ही! वर सांगितलेली सगळी कामं यथास्थित केली की मग झोपायचं ते विश्रांती घ्यायला. म्हणजेच नुसतं लोळायचं नाही. विश्रांती पुरतीच झोप घ्यायची. इथेसुद्धा ‘सुखे’ हा शब्द दोन्हीकडे लागू होईल. सुखाची झोप- म्हणजे गाढ झोप. ज्यांना झोप लागत नाही, त्यांना याचं  मोल चांगलंच माहित असेल. आणि अशी झोप झाल्यावर ‘फिरुनी उठतो’ हेही किती महत्त्वाचं! याला जोडून ‘सुखे’ हा शब्द घेतला तर रोज सकाळी आनंदाने, सकारात्मकतेने उठणं असा अर्थ होईल.

हे सगळं न मागता, फुकट मिळालं आहे, याची जाणीव राहावी म्हणून ही प्रार्थना रोज म्हणू या, आपल्या मुला-नातवंडांनाही शिकवू या.

 

 


आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...