“
एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला
मारहाण केली तर तो कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नाही- असा सर्वोच्च न्यायालयाचा
निकाल आहे. तो आज आम्ही सादर केला” असा वैष्णवी हगवणे केसमधील बचाव पक्षाच्या वकिलाने
युक्तिवाद केला. ज्यांनी निकाल दिला त्या न्यायमूर्तींना आणि या वकील साहेबांना माझे
दोन प्रश्न आहेत
११)जर हा छळ आणि हिंसाचार नाही, तर मग कौटुंबिक
हिंसाचाराची व्याख्या तुमच्या मते काय आहे? सळ्यांनी मारहाण करणे, चटके देणे, की
आणखी काही? जर तसे असेल तर मग फक्त हाताने मारहाण झाली तर कौटुंबिक हिंसाचाराची
तक्रार नोंदवण्यासाठी पत्नीला हे सगळे होईपर्यंत थांबावे लागणार का?
२२)याला जर ‘छळ’ म्हणता येणार नाही तर काय म्हणता
येईल? पुरुषार्थ? की पराक्रम?
मुळात घटना विषण्ण करणारी आहेच त्यातून अशी विधाने ऐकली की संतापाने
लाही होते. पण हा वांझोटा संताप आहे की काय अशी भीती वाटते. न्याय व्यवस्थेवर
पूर्ण विश्वास आहेच, पण राहून राहून असे वाटते की न्यायालयाचा
दरवाजा ठोठावण्यासाठी तिचा जीव जाईपर्यंत का वाट पाहिली? दीड एक वर्षांपूर्वी सुद्धा तिने विषारी औषध
पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे वाचले. तरीही आई वडिलांनी तिला पुन्हा
सासरी का पाठवले? तेव्हाच छळाची तक्रार का केली नाही? काय अगतिकता होती? सत्ता आणि पैसा यांनी माजलेले सासरचे लोक काय
करतील ही भीती? 'जिस घर में तेरी डोली जाएगी वहीं से तेरी अर्थी
उठेगी ' या पिढ्यानपिढ्या माथी मारलेल्या वाक्यामुळे समाजात
नाचक्की होईल ही भीती? की आणखी काही? पण या सगळ्या शंका, भीती
तिच्या जिवापेक्षा जास्त होत्या?
काय उपाय आहे या भीतीवर मात करण्याचा? पूर्वी मुली शिकलेल्या
नसायच्या, कमावत्या नसायच्या, आत्मविश्वास नसायचा, म्हणून त्या ओठ मिटून सासुरवास
सहन करायच्या अशी समजूत होती. पण आजही तीच परिस्थिती? इतके अत्याचार का सहन करतात
मुली? कुठे तक्रार करायची ते समजत नाही म्हणून? माहेरचा आधार नाही मिळाला तर एकटी
कशी राहू, खाऊ काय, या प्रश्नांपोटी? सासरचे राजकीय लागेबांधे असले तर आणखी काय
काय सोसावे लागेल या भीतीपोटी? आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलण्याइतक्या का हतबल होतात?
ती तर जीवानिशी गेलीच पण तिच्या ९-१० महिन्याच्या बाळाचे काय?
त्याच्या पोरकेपणाला जबाबदार कोण?
सीमेपलिकडच्या दहशतवादाला जरब बसवण्यासाठी बरेच काही केले जाते, ते योग्यच आहे पण घरातल्या या दहशतवादाला कोण
कशी कधी जरब बसवणार? आणखी किती निरपराध बळी जायला हवेत त्यासाठी?
नुसते प्रश्न-प्रश्न-प्रश्न! मिळणार आहेत का यांची उत्तरे कधी? –
हाही एक अनुत्तरित प्रश्नच.
या घटनेचा विषाद वाटून माझा भाऊ नंदन फडणीस याने ही उर्दू गजलनुमा
कविता लिहिली
फिर दहेज़ ने इक मासूम को
निगला है,
और कहते हो अब समाज ये
बदला है.
औरत के सम्मान के चर्चे
बहुत हुए,
समझ गए हैं सारे ये बस
जुमला है.
बाबुल क्यों ना घर वापस
उसको ले आये,
रहरहकर दिल से सवाल ये
निकला है.
उसके दिल के अरमाँनोंको
उम्मीदों को,
इस निज़ाम ने बेरहमी से
कुचला है.
मर्दों के ही बनाये सब
कानून हैं,
हर सूरत में औरत का दामन
मैला है.
कुछ दिन की ये खबर न बन
कर रह जाए,
हर दुल्हन के वुजूद का ये
मसला है.
जिनके हाथों इक़्तिदार है
दौलत है,
उनके ही घर से ये जनाज़ा
निकला है.
अख़लाक़ी-अक़दार खो चुके हम 'नंदन',
रोज़ आदमी और एक क़दम फिसला
है.– नंदन फडणीस
याचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद –
हुंड्याने आणखी एक निरपराध बळी घेतला आहे,
आणि तुम्ही म्हणता समाज सुधारला आहे !
स्त्री सन्मानाच्या चर्चा खूप झडतात,
मात्र तो फक्त पोकळ शब्दांचा गलबला आहे.
वडिलांनी तिला माहेरी का आणलं नाही?
अशा अनेक प्रश्नांचा मनात कल्लोळ माजला आहे.
तिच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षांना,
या व्यवस्थेने निष्ठुरपणे सुरुंग लावला आहे.
पुरुषांनीच बनवले आहेत सर्व कायदे,
स्त्रीच्या पदरात कायमच कलंक आला आहे.
ही बातमी चार दिवसांत विरून जाऊ नये,
प्रत्येक विवाहितेच्या अस्तित्वावर प्रश्न उठला
आहे.
लहानपणी
ऐकलेली, केलेली ही प्रार्थना आज सकाळी जाग येतायेताच आठवली. लहानपणी ती अगदी साधी
वाटायची पण का कोण जाणे, आज त्यावर जरा विचार करावासा वाटला आणि त्या साध्या
सोप्या शब्दांत किती खोल अर्थ आहे हे जाणवलं. प्रार्थना कदाचित तुम्हां सगळ्यांचीच
पाठ असेल पण आज ती मला कशी भिडली ते सांगते.
“ईश्वराची
दया” या शब्दांनी सुरुवात करूया. त्या करुणानिधीच्या दयेला, करुणेला सीमाच नाही. मोठ्या
संकटातून, आजारातून, अडचणीतून आपण बाहेर आलो की आपण ‘त्याचे’ आभार मानतो पण आपण
रोज आपल्याही नकळत किती गोष्टी करतो आणि त्या गृहीत धरतो त्यांची या प्रार्थनेत जाणीव
करून दिली आहे.
डोळ्यांनी
बघतो, कानांनी ऐकतो, पायांनी चालतो. – ‘मग? त्यात काय मोठं?’ अशा गुर्मीत आपण
असतो, पण वयोमानापरत्वे, किंवा इतर काही कारणामुळे दृष्टी तितकीशी चांगली राहिली
नाही, ऐकू कमी यायला लागलं, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाड मोडणे किंवा अन्य काही
कारणामुळे चालायला त्रास होऊ लागला की मग त्याची किंमत कळते. ईश्वराच्या कृपेने आपण बघतो, ऐकतो आहोत ही सतत जाणीव असेल तर काय बघतो, काय ऐकतो, मोबाईल-टीव्ही स्क्रीनवर किती वेळ घालवतो याबद्दल मला वाटतं आपण जागरूक राहू.
जिव्हेने
रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो – करोना काळात ज्यांची चवीची जाणीव गेली होती,
किंवा कधीकधी आजारपणामुळे अन्नाची चव लागत नाही, तेव्हा जेवणातील गंमतच संपते. ‘मधुर’
हा शब्द दोन्हीकडे लागू पडतो. रस चाखण्याला जोडून घेतला तर असं म्हणता येईल, की जे
अन्न खातो आहोत ते ‘गोड मानून’ म्हणजेच नावं न ठेवता आनंदाने ग्रहण करणं. बोलण्याला
जोडून घेतला तर गोड बोलणं असा अर्थ होईल. पण म्हणजे पोटात एक ओठांत एक असं कृत्रिम
गोड बोलणं नव्हे, तर श्रेयस साधणारं प्रेयस बोलावं असा मी त्यातून अर्थ घेतला. हे
अजिबातच सोपं नाही. पण ध्येय काय आहे हे तरी त्यातून निश्चित होईल. मी तर फारच
तडकफडक बोलणारी आहे. ‘मी स्पष्टवक्ती’ आहे अशी मी स्वतःची समजून करून घेतली आहे,
पण ती चुकीची आहे हे आज पुन्हा एकदा जाणवलं. त्यालाच मी माझ्याकडून एक आणखी पुस्ती
जोडते- मितभाषण असायला हवं. ज्ञानेश्वर माउली सांगतात त्याप्रमाणे
साच
आणि मवाळ | मितुले आणि रसाळ|
शब्द
जणू कल्लोळ | अमृताचे||
हे
कुठल्या तरी जन्मात साध्य व्हावं!!
हातांनी
बहु साल काम करतो – सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आपापली कामं चोख करत असतात
तेव्हा आयुष्य किती सुखकर असतं हे, ती तितक्या ताकदीने कामं करेनाशी होतात तेव्हा
जाणवायला लागतं. म्हणूनच आतापर्यंतच्या ओळींमध्ये सांगितलेलं सगळं सुरळीत चालू
असतं ती ईश्वराचीच कृपा!
विश्रांतीही
घ्यावया घेतो झोप सुखे, फिरुनी उठतो – किती महत्त्वाची ओळ आहे ही! वर सांगितलेली
सगळी कामं यथास्थित केली की मग झोपायचं ते विश्रांती घ्यायला. म्हणजेच नुसतं
लोळायचं नाही. विश्रांती पुरतीच झोप घ्यायची. इथेसुद्धा ‘सुखे’ हा शब्द दोन्हीकडे
लागू होईल. सुखाची झोप- म्हणजे गाढ झोप. ज्यांना झोप लागत नाही, त्यांना याचं मोल चांगलंच
माहित असेल. आणि अशी झोप झाल्यावर ‘फिरुनी उठतो’ हेही किती महत्त्वाचं! याला जोडून
‘सुखे’ हा शब्द घेतला तर रोज सकाळी आनंदाने, सकारात्मकतेने उठणं असा अर्थ होईल.
हे सगळं
न मागता, फुकट मिळालं आहे, याची जाणीव राहावी म्हणून ही प्रार्थना रोज म्हणू या,
आपल्या मुला-नातवंडांनाही शिकवू या.
(मातृदिनानिमित्त
एका मध्यमवयीन आईची तिच्या आईला आणि स्वतःच्या लेकीला लिहिलेली प्रातिनिधिक पत्रं)
प्रिय
आई,
मातृदिनाच्या
शुभेच्छा!
गम्मतच
वाटते मला. मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन, महिलादिन या गोष्टी काय एका दिवसापुरत्या
मर्यादित असतात का? कशाला त्याची एवढी फॅडं? पण पुन्हा वाटतं, काय
हरकत आहे? वर्षभर आपण वाढतच असतो तरी वाढदिवसाचं महत्त्व आहेच की! मनातलं प्रकट करायला
त्या दिनाचं निमित्त. माझंच बघ की. एरवी मी तुला पत्र लिहिलं असतं असं नाही, पण
मातृदिन आहे असं लेक म्हणाली, म्हटलं चला, आईशी थोड्या गप्पा मारूया.
आई, ह्या आपल्या गप्पा खरं तर माझ्या लग्नानंतरच जास्त
व्हायला लागल्या नाही? कारण तोपर्यंत तू बाबांची बिझिनेस पार्टनर असल्यामुळे पूर्ण
वेळ ते काम, घरातली पाहुण्यांची वर्दळ, त्यातूनही वेळ काढून बागकाम, वाचन, गाणं
यांसारखे जोपासलेले छंद यांत गढलेली: आणि मी शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी, नाटकातली
कामं, गाण्याचा क्लास यांत बुडलेली.
अर्थात, तुझं माझ्यावर बारीक लक्ष असायचं. त्यामुळे सगळं
स्वातंत्र्य असलं तरी एक वचक असायचा. त्या वेळी अर्थातच तो जाचक वाटायचा, पण तो
किती आवश्यक आहे, हे मी आई झाल्यावर मला कळलं.
तू काही गोष्टी कंपल्सरी करायला लावायचीस. एकदा सणाच्या
दिवशी तू मला सगळ्यांच्या पानाभोवती रांगोळी काढायला सांगितलीस. जरा शिंगं
फुटल्यामुळे माझा मूड नव्हता. मी म्हटलं, ‘ नाही काढणार’. तू म्हणालीस, ‘ रांगोळी
काढल्याशिवाय जेवायला मिळणार नाही.’
म्हटलं, ‘ नकोच मला जेवण.’ आणि खोलीत जाऊन दार लावून
बसले. तू नंतर मला जेवायला बोलवायला आलीस तेव्हाही मी उत्तर दिलं नाही. दुसऱ्या
दिवशी मला कळलं की तू पण जेवली नाहीस. आणि मग तुझ्या कुशीत शिरून मी पोटभर रडले.
आणि हो, त्या दिवसापासून मी रांगोळ्या काढायला लागले आणि एक्स्पर्ट झाले, आठवतं?
तू, बाबा कधीच मला फारसे रागावल्याचं आठवत नाही, पण तुझी
शिस्त लावायची पद्धत मात्र ओरिजिनल होती.
मी अगदी लहान, मला वाटतं तिसरी-चौथीत असेन. शाळेत
काहीतरी बिनसलं होतं. तो राग घेऊन मी घरी आले. आवडीचं खाणं होतं तरी त्याला हजार
नावं ठेवली. दुधाचा कप रागाने बाजूला सरकवताना दूध सांडलं. तू एकही शब्द न बोलता
मला गाडीत घातलंस आणि अनाथाश्रमात कपडे द्यायच्या निमित्ताने मला तिथे घेऊन गेलीस.
तिथे त्याही मुलांची खाण्याची वेळ होती. आधी सगळा आश्रम फिरून आपण खाण्याच्या तिथे
आलो. ती मुलं जे आनंदाने खात होती, जशी राहत होती, ते पाहून मी जी तुला बिलगले,
त्यातूनच तुला समजलं असेल की जी गोष्ट रागावून, मारूनसुद्धा कदाचित डोक्यात शिरली
नसती, ती त्या दृश्याने कायमची मनात कोरली गेली.
बाबा-तू जे सहज बोलून जायचेत, त्यातून कितीतरी शिकायला
मिळायचं. एकदा आपल्याकडच्या पार्वतीबाईचा मुलगा आजारी होता म्हणून त्या नवस बोलणार
हे कळल्यावर तू त्यांना जे सांगितलंस ते आजही आठवतं. ‘ देवाशी सौदेबाजी कसली करता?
माझ्या मुलाला बरं केलंस तर साडीचोळी नेसवीन म्हणून देवीला लाच कसली देता? ती
त्यासाठी अडून बसलेली नाही. मनापासून तिला नमस्कार करा. तिला तेवढा पुरतो. नवस
फेडण्यात पैसा घालवण्यापेक्षा मुलाला चांगल्या डॉक्टरला दाखवा, त्याचं नीट औषधपाणी
करा.’
एवढं बोलून तू थांबली नाहीस तर ‘नवस करणार नाही’ असं
त्यांच्याकडून कबूल करवून घेऊन तुझ्या खर्चाने त्याचं आजारपण काढलंस.
एकूणच तुम्हां दोघांचे निगर्वी स्वभाव, निरपेक्षपणे मदत
करण्याची वृत्ती, कोणाबद्दलही वाईट न बोलणं, हे आदर्श मनावर पक्के ठसलेत, पण
त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी माझ्याकडून होत नाही हेही कबूल करते.
लहानपणी, कधीही मनात काही गोंधळ चालू असला आणि तुझी
चाहूल लागली की मन शांत व्हायचं. ‘ आई आली, आता सगळं ठीक होईल’ अशी खात्री
वाटायची.
ही अशी खात्री माझ्या लेकीला माझ्याबद्दल वाटते की नाही
कोण जाणे! वाटत असावी, कारण ती आणि मी जिवलग मैत्रिणी आहोत.
पण आई, हे मैत्रिणीचं नातं ही आजच्या काळाची देणगी आहे
असं मला वाटतं. कारण माझ्या लहानपणी, आई-वडील म्हणजे मोठी माणसं, त्यांना मान
द्यायचा हेच चित्र- आपल्याच नव्हे, तर मैत्रिणींच्याही घरी दिसायचं. चिऊ जशी
जातायेता माझ्या गळ्यात पडते , पापे घेते, हा मोकळेपणा तेव्हा नव्हता. एकूणच
मनातलं बोलून दाखवायची फारशी प्रथा नव्हती. म्हणून या गोष्टी तुला कधी सांगू शकले
नाही.
पण चिऊ जेव्हा मला म्हणते, ‘ आई तू अगदी मॅडूबाई आहेस,
पण तरीही आय लव्ह यू थ्री मच’ तेव्हा मला जग जिंकल्याचा आनंद होतो, तसा, मीही
माझ्या भावना सांगितल्यावर तुलाही नक्कीच होईल असं वाटलं.
आई, हेच आईवडील जन्मोजन्मी मिळावेत म्हणून वटसावित्रीसारखं
एखादं व्रत असेल तर ते मी आनंदाने करीन. ( अर्थात तुला माझ्यासारखी त्रासदायक
मुलगी जन्मोजन्मी हवी आहे की नाही कुणास ठाऊक)
बघ, जे कधी मोकळेपणी बोलू शकेन असं वाटलं नव्हतं, ते
मातृदिनाच्या निमित्तानें लिहून मोकळी झाले. मातृदिनाचे शतशः आभार.
हॅपी
मदर्स डे आई!
तुझं
लाडकं,
प्रौढ
लेकरू.
लाडक्या
चिऊस,
अनेक
आशीर्वाद.
‘माझ्या
खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाहीस, मग एवढा खर्च करून बारसं केलं कशाला?’ हा
शंभरदा विचारलेला प्रश्न तू पत्र वाचतानाही विचारणारच, पण मला माहिती आहे की तुलाही
मी चिऊ म्हटलेलंच आवडतं. ‘आईने मला नावाने हाक मारली की नक्की चिडलेली असते,’ असं तुम्हा
मैत्रिणींची ‘स्टीरिओफोनिक कुजबुज’ चालू असताना एकदा कानावर आलं आणि आणि ‘चिऊ मोठी
झाली, आता तिला चिऊ म्हणता कामा नये,’ हा विचार मनात येण्यापूर्वीच हद्दपार झाला.
आज
मातृदिनी, मी आई झाले तो क्षण लख्ख आठवतो. हज्जारदा ऐकलेली गोष्ट परत ऐक. भूल देऊन
सिझेरियन केल्यामुळे तुझं पहिलं रडणं मी ऐकलंच नाही. भूल उतरल्यानंतर, म्हणजे
सगळ्यांनी तुला पाहिल्यानंतर सर्वांत शेवटी मी पाहिलं. तुला माझ्या कुशीत ठेवलं
होतं आणि तू टक्क डोळे उघडून माझ्याकडे पाहत होतीस. आणि चिऊ, तुझी ती पहिली स्वच्छ
नजर आजही तितकीच निर्मळ आहे हे विशेष. तुला कधीही नजर चुकवून बोलायची वेळ आली नाही,
याचं श्रेय मी देवाची कृपा, दोन्हीकडच्या आजीआजोबांचा सहवास, त्यांचे संस्कार आणि
अर्थातच तू स्वतः ,यांना देईन.
तुझी
पहिलीची परीक्षा होती. आधी डिक्टेशन आणि मग इंग्लिश असे लागोपाठ पेपर होते. घरी
आल्यावर तू सांगितलंस, ‘ आई, डिक्टेशन झालं आणि तो पेपर घ्यायच्या आधीच आम्हाला
इंग्लिशचे क्वश्चनपेपर दिले. डिक्टेशनमधला एक शब्द त्या पेपरमध्ये होता आणि मला कळलं
की माझं त्या शब्दाचं स्पेलिंग चुकलं आहे. पण आई, ते मी करेक्ट नाही केलं कारण ते
कॉपी केल्यासारखं झालं असतं ना!’
आजही
तो प्रसंग आठवला की त्याच आवेगाने डोळ्यात पाणी येतं आणि अभिमानाने मान ताठ होते.
तोच प्रामाणिकपणा बारावीच्या सहामाहीला गणितात १०० पैकी १०० मार्क पडले तेव्हा बेरीज
चुकली हे सरांच्या निदर्शनाला आणून देऊन १०० चे ९९ झाले तेव्हा, आणि मेडिकल
कॉलेजच्या पहिल्या सहामाहीला पहिली आलीस पण तेव्हाही चुकलेली बेरीज दाखवून दोन
मार्क कमी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेलीस तेव्हा कॉलेजच्या गळ्यातला ताईत झालीस. तुझ्या
मित्रमैत्रिणींनी तर तुला संत ही पदवी बहाल केली.
पण त्या
संत मुलीचा डामरटपण काही कमी नव्हता. जेमतेम वर्षाची असशील. तुझा लाडका मामा तुला
मांडीवर घेऊन थोपटत ‘नन्ही कली सोने चाली’गात होता. सगळं गाणं ऐकून घेतलंस आणि मग
म्हणालीस, ‘मामा, माझ्या आईसारखं तुला गाता येत नाही.’ एकदा कोणीतरी घरी आलेलं
असताना त्यांना ‘ माझ्या आईला ऑम्लेटशिवाय काहीही करता येत नाही’ असं सांगून माझं ‘पाककौशल्य’
वेशीला टांगलं होतंस.
अशीच
एकदा आत्याकडे गेली असताना तिने तुला प्रेमाने विचारलं, ‘खायला काय करू?’ तू
म्हणालीस, ‘ आलू पराठे कर, कारण सहसा ते कोणाचे बिघडत नाहीत.’
पहिलीत
असताना ‘मायसेल्फ’निबंध लिहिताना तू लिहिलेलं ‘ आय लुक व्हेरी ब्युटीफुल’ हे वाक्य
ऐकून आमची हसून हसून मुरकुंडी वळली होती. पण खरंच, देवदयेने तू अंतर्बाह्य सुंदर आहेस.
छोटी
छोटी भांडणं व्हायची आपली, अजूनही होतात, पण तू नववीत असताना तुझ्या मैत्रिणी,
त्यातल्या एकीचा मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांबरोबर दोन दिवस महाबळेश्वरला जाणार
होत्या. त्यांच्याबरोबर तुला पाठवलं नाही म्हणून तू माझ्यावर जी चिडलीस – चार दिवस
बोलली नाहीस. पण मी शांत होते कारण अगदी असाच जुळा प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता.
दहावीत असताना नाटकात हौस म्हणून काम करायला परवानगी होती, पण दौरा जाणार होता,
त्या वेळी आईने पाठवलं नाही म्हणून मी असंच तारांगण केलं होतं – अर्धवट वयातले
धोके समजावून दिले तरीही तेव्हा काही पटलं नव्हतं. तेव्हा आईने मला जे सांगितलं , ‘तू
आई झालीस की मगच तुला पटेल’ तेच त्या वेळी मी तुलाही सांगितलं होतं आणि तूही
तुझ्या मुलीला तेच सांगशील. काळ बदलला तरी वात्सल्याचा, काळजीचा पोत बदलत नाही गं!
जरा
लांबलंच का पत्र? पण अगं कितीतरी आठवणी राहूनच गेल्या. बरं असू दे. त्या पुढच्या
मातृदिनाला.
तर चिऊताई, आजच्या मातृदिनी, ‘ तू खूप शीक,
निवडलेल्या क्षेत्रात टॉपला जा. समजूतदार नवरा मिळो, सुखाचा संसार होवो,’ हे
आशीर्वाद तर आहेतच, पण आणखी एक स्पेशल आशीर्वाद देते. तुझ्याही आयुष्यात एक ‘चिऊ’
येवो आणि तू आम्हाला जसा आनंद दिलास तसाच तुम्हा उभयतांना मिळो.’