रम्य ही सर्वांहुन लंका.
‘तो भाइयों और बहनों, आईये अगली पायदान पर सुनते हैं....” दर बुधवारी रात्री आठ वाजता बिनाका गीतमालामध्ये अमीन
सयानीचा जव्हारीदार आवाज आणि कर्णमधुर गाण्यांची लयलूट – ही रेडिओ सिलोनच्या
माध्यमातून तेव्हाच्या सिलोनशी आणि आताच्या श्रीलंकेशी नाळ जुळली होती. रामायणातून
भेटलेली सोन्याची लंका, गदिमांच्या शब्दांतून भेटलेली ‘स्वर्गाहून रम्य ( रौम्य?)
लंका प्रत्यक्ष पाहण्याचा संकल्प बरीच वर्षं होता. तो सिद्धीस गेला ५-१४ सप्टेंबर
२०२५ दरम्यान झालेल्या आमच्या ट्रीपमध्ये.
५
सप्टेंबर
वंदना
बारावकर, नीलू पुरोहित, माधुरी चांदोरकर आणि मी अशा आम्ही चौघी मैत्रिणींनी ५
सप्टेंबर रोजी पहाटे साडेपाचच्या विमानाने कूच केलं. पुणे-चेन्नई- कोलंबो अशी
फ्लाईट होती. प्रवास अगदी सुरळीत पार पडला. साडेबारा वाजता कोलंबोला पोचलो.
संपूर्ण दहा दिवसांसाठी टॅक्सी ठरवली होती. कोलंबो- बेन्टोटा – नुवारा एलिया –
कॅन्डी- सिगीरिया-कोलंबो असा क्रम होता. कोलंबोच्या एस्ना हॉलिडेजच्या मदतीने
हॉटेल्स, टॅक्सी आरक्षित केली होती. आमचा टॅक्सी ड्रायव्हर सुशांत आमच्या
स्वागताला उभा होताच. ऑर्किडच्या सुंदर माळा घालून त्याने आमचं स्वागत केलं आणि
त्या क्षणीच आम्हाला खिशात टाकलं. पुढचे दहाही दिवस आमच्या ह्या तरुण सारथ्याने आम्हां
ज्येष्ठ नागरिकांची सर्वतोपरी काळजी घेतली. त्याची गाडीही अगदी मस्त - टोयोटाची व्हॅन
होती. पुढे ड्रायव्हर आणि एकजण, तीनजण आरामात बसू शकतील अशी मधली अखंड सीट आणि
त्याशिवाय मागे दोघांची प्रशस्त सीट ( इनोव्हासारखी अडचणीची नाही) आणि मोठी
डिक्की. त्यामुळे सगळाच प्रवास अगदी आरामशीर झाला.
विमानतळावरून
बाहेर पडून रस्त्याला लागलो आणि सर्वप्रथम नजरेत भरली ती कमालीची स्वच्छता. युरोप
अमेरिकेत अशी स्वच्छता बघतोच आपण, पण ते खूप दूरचे समृद्ध देश. तिथला सुबकपणा, शिस्त
कौतुकास्पद आहेच पण हा आपल्या इतक्या जवळचा देश, आपल्याचसारखी दिसणारी माणसं, गावं,
ओळखीचं हवामान, तरीही रस्त्यावर, कडेला कुठेही उकिरडा तर सोडाच पण एक कागदाचा कपटा
नाही की प्लास्टिकच्या बाटल्या-पिशव्यांचा कचरा नाही. रस्ते अत्युच्च दर्जाचे,
एकही खड्डा नाही. सर्व वाहनं आपल्या मार्गाने शांतपणे जात होती. कोणीही हॉर्न
वाजवत नव्हतं की वेगाची स्पर्धा नव्हती. ह्या देशाने कमालीची असुरक्षितता,
अस्थैर्य अनुभवलं असलं तरी एकूणच वातावरणात आश्वासक निवांतपणा जाणवत होता. बघून खूप छान वाटलं – थोडीशी
खंतही वाटली. असो!
रस्त्यावरची
भाज्या-फळांची आकर्षक मांडणी केलेली दुकानं पालवीत होती. अननासांचे ढीग बघून
राहवलं नाही. सुशांतला गाडी थांबवायला लावली. नीलू उतरली. सुशांतही पटकन उतरला.
स्थानिक भाषेत बोलून अननस विकत घेतला. दुकानदार सोलून द्यायला तयार नव्हता पण
सुशांतने लगेच सोलून, कापून घेतला. अहाहा! काय तो स्वाद, चव, रसाळपणा! अगदी तृप्त! वाटेत जेवून आम्ही बेण्टोटाला
पोचलो. टॅन्जरिन बीच रिसॉर्ट. अप्रतिम हॉटेल. अगदी बीचवरच. प्रत्येक खोलीतून नेत्रांना
समुद्रादर्शन, कानांवर त्याची गाज. सतत सोबतीला होताच. आम्ही लगेच कपडे बदलून बीचवर
गेलो. तिथून सूर्यास्त छान दिसतो म्हणतात पण खूपच ढग होते त्यामुळे तो कल्पनेतच
पाहिला. सुंदर बीच. किनाऱ्याकडे झेपावणाऱ्या भरतीच्या लाटा. मात्र तिथला समुद्र
पोहायला सुरक्षित नाही त्यामुळे समुद्रस्नान झालं नाही. फक्त पाय भिजवत हिंडलो. हॉटेलचे
प्रशस्त लॉन्स, फुलं, नारळाची झाडं, पांढरी वाळू आणि अथांग समुद्र. कुठेही
आचरटपणा, आरडाओरडा करणारे पर्यटक नाहीत.
बराच
वेळ फिरून परत आत आलो. आमच्या प्रवासयोजनेमध्ये सकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण
समाविष्ट होतं. भोजनकक्षात गेलो तर – अरे बापरे- स्वरुची भोजनाचा हा ssss एवढा मांड
मांडलेला. साठ टक्के पदार्थ मांसाहारी- त्यातही समुद्रकिनारी असल्यामुळे परमेश्वराचा प्रथमावतार विविध व्यंजनांनी अनेक रूपांत
नटलेला. माधुरी, वंदना आणि नीलू –तिघी मत्स्यप्रेमी. अगदी तृप्त झाल्या. अर्थात
विविध प्रकारचे शाकाहारी पदार्थही होते त्यामुळे अस्मादिक खूष! समोर कितीही
प्रलोभनं असली तरी पुढचे दहा दिवस आडवा हात मारायचा नाही हे स्वतःला सारखं सांगावं
लागत होतं.
जेवून खोलीत आलो. दमलो होतो. पहाटे साडेपाचचं विमान असल्यामुळे आदल्या रात्री नीट झोप झाली नव्हती, त्यामुळे लवकरच झोपलो
६
सप्टेंबर
आज मादू नावाच्या नदीत नौकाविहाराला जायचं होतं. भरपूर पदार्थ असलेला स्वरुची नाश्ता घेऊन निघालो. नशिबाने दहाही दिवस आम्हाला हवा अगदी छान मिळाली. इच्छित स्थळी पोचलो. मोटरबोटीत बसलो. त्यात चढणं उतरणं त्रासदायकच होतं. आजूबाजूच्या खारफुटीच्या जंगलातून (mangrove) विहार करताना मस्त वाटत होतं.
सुंदरबनला मी ते पाहिलं होतं त्याची आठवण झाली. वेगळ्याच
प्रकारची झाडं, वर आलेली मुळं, त्यांनी तयार केलेल्या नैसर्गिक गुहा, भोवतालचे
पाणपक्षी, जलचर असं बघत बघत मजेत जात होतो. त्या नदीत बरीच बेटं आहेत. त्यातील एका
दालचिनीच्या बेटावर उतरलो. बेटावर उतरायचं म्हटलं पण वास्तविक आधी नावेतून वर चढायचं
आणि मग धक्क्यावर चढायचं. आधाराला काहीच नाही. मी कशीबशी तोल सावरत नावेच्या
कडेपर्यंत आले. सुशांतने मला धक्क्याची (jetty) पायरी चढण्यासाठी हात दिला. मी त्याचा हात
धरला खरा पण मला भीती वाटायला लागली की त्याच्या आणि माझ्या वजनातला फरक बघता,
एकतर मी त्याच्या अंगावर पडेन किंवा त्याला घेऊन पुन्हा खाली नावेत पडेन. म्हणून
मी डावीकडे अंग झोकून दिलं आणि पडले. मला काही झालं नाही पण तो जाम घाबरला. दर दोन
मिनिटांनी मला विचारायचा ‘यू ओके?’
त्या बेटावर सगळी दालचिनीचीच झाडं आहेत. तिथेच राहणारं
एक कुटुंब पिढ्यानपिढ्या दालचिनीचा
व्यवसाय करत आलं आहे. त्यातल्या एकाने दालचिनीची तोडलेली जाड फांदी आधी तासतात, तो भाग खत म्हणून वापरतात, मग आतले पातळ थर धारदार सुरीने काढून एकात
एक गुंडाळून कसे वाळवतात त्याचं प्रात्यक्षिक दाखवलं. खूपच कौशल्याचं काम आहे.
त्याचं म्हणणं, अशी ही पातळ दालचिनी
चांगली. तिथे दालचिनीचं तेल वगैरेही होतं. आमच्या खरेदीला झाली सुरुवात तिथेच. उरलेली
फांदी काठी म्हणून वापरायला अगदी योग्य. मगाचच्या अनुभवाने धसकून गेलेल्या सुशांतने
त्यातले दोन दंडुके आमच्यासाठी घेतले. त्यांचा पुढेही खूप उपयोग झाला.
दीड तास जलविहार करून परत आलो. त्या नदीचं एक वैशिष्ट्य
म्हणजे ती जिथे संपलेली दिसते तिथे एक वाळूचा पट्टा आणि काही खडक आणि त्यापुढे
लगेच समुद्र. हे असं दृश्य कधीच पाहिलं नव्हतं. काठावरच्या एका हॉटेलमध्ये मासे
रिचवून (मी शाकाहारी बर्गर) परत निघालो. वाटेत एक कासव अंडी उबवणी केंद्र (turtle hatchery) बघितलं. खाजगी होतं.
त्यांना सरकारकडून काही पैसे मिळत नाहीत म्हणे. कासवांनी समुद्रकिनारी घातलेली
अंडी गोळा करणाऱ्या लोकांकडून ते ती विकत घेतात, वाळूत पुरून उबवतात. हौशी लोक
त्यांच्याकडून ती उबवलेली अंडी विकत घेऊन पिल्लं बाहेर आली की समुद्रात सोडतात.
तिथे त्यांनी मोठे हौद बांधलेले आहेत त्यात समुद्रात टिकू शकणार नाहीत अशी आजारी
कासवं आहेत. भलीमोठी आहेत. एक कासव तर १०० वर्षाचं होतं.
तिथून गेलो एक मुखवट्यांचा कारखाना बघायला. नृत्यनाट्य
करणारे कलाकार विविध भूमिकांसाठी विविध मुखवटे वापरतात. ते तिथे तयार केले जातात.
खूप जुना कारखाना आहे. संध्याकाळी हॉटेलला परत येऊन तिथल्या तलावात पोहायला गेलो.
मग मस्त गप्पा, जेवण, झोप.
७ सप्टेंबर
आज नुवारा एलियाला जायला निघणार होतो. हे
श्रीलंकेमधील सर्वाधिक उंचीचं एकमेव थंड हवेचं ठिकाण. डिसेंबरमध्ये म्हणे तिथे
कधीकधी बर्फही पडतो. जाण्याचा रस्ता सुंदर वळणावळणाचा. हिरवा निसर्ग सोबतीला
होताच. मधेच मुरकी घेतलेली एखादी नदी दर्शन द्यायची. पुन्हा एकदा खड्डे नसलेले
रस्ते, स्वच्छता, हॉर्नविरहित प्रवास यांचा सुखद अनुभव घेत चाललो होतो. वाटेत स्वच्छतागृहाची
गरज भासली. इथे कोणतेही स्वच्छतागृह हे खरोखर स्वच्छ असणार याची एव्हाना खात्री
झाली होती, पण सुशांतने ज्या हॉटेलपाशी गाडी थांबवली ते बघून आम्ही थक्कच झालो. कितुलगाला
गावाजवळ केलानी नदीच्या नदीच्या काठावरचं ते हॉटेल, अप्रतिम बाग, प्रशस्त भोजनगृह,
देखण्या पुरातन(अॅण्टिक) लाकडी सामानाची कलात्मक मांडणी. फार सुंदर! इथेच एखादा
दिवस राहावं असा मोह झाला. ह्या गावात
‘ब्रिज ऑन द रिव्हर क्वाय’ ह्या चित्रपटाचं
चित्रीकरण झालं होतं हे आम्हाला नंतर कळलं नाहीतर ते ठिकाण जाऊन पाहिलं असतं.
नुवारा
एलियाला पोचलो. आधी सीता अम्मन देवळात गेलो. इथेच म्हणे अशोकवनात सीतेला ठेवलं
होतं. देऊळ म्हटलं की माझ्या पोटात गोळा येतो. ती गर्दी, धक्काबुक्की, फुलं, तेल,
नारळ यांचा कोंडलेला वास, पैसे घेऊन झटपट दर्शन करवणारे पुजारी( दलालच म्हणायला
पाहिजे), मेंढरं हाकावीत तसे एका सेकंदात गाभाऱ्यासमोरून तुसडेपणे हाकलणारे आतले
पुजारी, देवळाच्या बाहेरचे (आणि आतलेही) भिकारी, चपला काढून जाताना पायाखालची ओली
घाण, बापरे! मी जरा नाखूषच असते अशा देवळांत जायला. पण अहो आश्चर्यम्! ह्या
सगळ्या समजुतींना छेद देणारं ते देऊळ होतं आणि नंतरचीही सगळी तशीच होती. प्रशस्त,
स्वच्छ, तुरळक गर्दी, तिथल्या पुजाऱ्याने आम्हाला गाभाऱ्यात जाऊन पाहिजे तेवढा वेळ
दर्शन घेऊ देऊन, आमची नावं विचारून आपणहून
मंत्र म्हणून आमच्यासमोर आरती धरून प्रसाद दिला. एकही पैसा मागितला नाही, घेतलाही
नाही.
तिथून मग आम्ही सेंट अॅन्ड्रूज हॉटेलला गेलो... आणि
प्रथमदर्शनी प्रेमातच पडलो. सुमारे दीडशे वर्षापूर्वीची ब्रिटीश पद्धतीची इमारत. समोरची
प्रशस्त हिरवळ, तीवर ठेवलेल्या पांढऱ्या टेबलखुर्च्या, छत्र्या, विविध रंगांची
सुंदर फुलं, आतलं लाकूडकाम, प्रत्यक्ष लाकडं पेटवून ऊब आणणारी शेकोटी ( फायरप्लेस)
, कशाकशाचं म्हणून वर्णन करावं! ह्या इमारतीचा इतिहासही मोठा रंजक आहे.
विस्तारभयास्तव तो इथे देत नाही.
त्या प्राचीन इमारतीचं बोट धरून आम्ही जणू थेट त्या काळात गेलो. थोडा वेळ हिरवळीवर फिरलो, मग बगीचात फेरी मारली. दिवसभराच्या प्रवासाचा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. चांगलीच थंडी होती. शेकोटीच्या खोलीत मस्त वाटत होतं. जेवायला गेलो मात्र..! भरपूर पदार्थ असण्याची एव्हाना सवय झाली होती, पण त्या हॉटेलमध्ये इतक्या कलात्मक पद्धतीने जेवण मांडलं होतं की डोळे निवले. पदार्थांची चवही उत्तमच होती.
. मंद संगीत वाजत होतं. हवेत सुखद गारवा होता. पंचेद्रियांची क्षुधाशांती करून आम्ही पुन्हा शेकोटीजवळ आलो. त्या रात्री खग्रास चंद्रग्रहण होतं. रात्री नऊला स्पर्श आणि अकराच्या सुमारास पूर्ण ग्रास. अर्धा चंद्र ग्रासेपर्यंत आम्ही सगळ्यांनीच मध्येमध्ये बाहेर जाऊन बघितलं पण थंडीमुळे फार वेळ बसता येत नव्हतं. थोड्या वेळाने बाकीच्या तिघी झोप आली म्हणून खोलीत गेल्या. मग मी स्वेटर आणि दोन शाली पांघरून बाहेर हिरवळीवरच बसून संपूर्ण ग्रास होईपर्यंत पाहिलं.
खरं तर ते सुटतानाही बघायचा मोह झाला पण थंडी आणि झोप दोन्ही अनावर झाल्यामुळे खोलीत गेले. पुन्हा एकदा ब्रिटीश काळात गेल्याचा भास झाला, कारण पांघरूण एका बाजूने थोडं दुमडून गादीवर चक्क गरम पाण्याची पिशवी ठेवलेली होती. अहाहा! त्या उबदार बिछान्यात शिरणं म्हणजे स्वर्गसुखच वाटलं.
८ सप्टेंबर
. तो अनुभव खरोखर शब्दातीत होता. त्याच संकुलात इतरही
मंदिरे आहेत. एक गायत्रीदेवीचं आहे. प्रसन्न मनाने तिथून बाहेर पडलो. नुवारा
एलियाहून एल्ला नावाच्या छोट्या गावाला आगगाडीने जाण्याचा सल्ला आम्हाला बऱ्याच
जणांनी दिला होता. फारच निसर्गरम्य प्रवास आहे, एल्ला गावही सुंदर आहे, तिथला नऊ कमानींचा
पूल, रावण धबधबा अगदी बघण्यासारखा आहे वगैरे ऐकलं होतं. पण प्रत्यक्षात मात्र जरा
भ्रमनिरास झाला. तो दिवस वाया गेला असं वाटलं. असो!
९ सप्टेंबर
आज कॅन्डीला जायचं होतं. वाटेत रम्बोडा इथे भक्त हनुमान
मंदिर आणि एक चहाचा कारखाना बघायचा होता. पावसाळी हवा होती. ऊन नव्हतं त्यामुळे
छान वाटत होतं. हनुमान मंदिरापाशी पोचलो. हनुमान जेव्हा समुद्र लंघून सीतेला शोधायला
लंकेत आला तेव्हा त्याची पहिली उडी इथे पडली असं म्हणतात. हे मंदिर तसं नवीन आहे .
चिन्मय मिशनने १९९९ साली ते बांधलं. हनुमानाला भारतात जो आदर आहे तो पूर्वी
श्रीलंकेत नव्हता कारण त्याने लंकेची नासधूस केली पण अलीकडच्या काळात त्याची पूजा
सुरु झाली. हिरवळ, झाडं,फुलं,पानांनी नटलेला अप्रतिम परिसर. टेकडीवर असलेल्या त्या
देवळाला जंगल असलेल्या मोठ्या डोंगराचं नैसर्गिक नेपथ्य, बरेच लोक असले तरी सगळं
शिस्तीत चाललेलं. कुठेही गडबड,गोंधळ, गलिच्छपणा नाही. प्रत्यक्ष मंदिर तर काय
वर्णावं? अठरा फूट उंचीची काळ्या पाषाणाची हनुमानाची भव्य मूर्ती. देवळात अर्थातच
कमालीची स्वच्छता. प्रशस्त सभामंडप. अगदी गाभाऱ्यासमोर जाऊन पाहिजे तितका वेळ दर्शन
घेण्याची मुभा. नास्तिकाच्या मनातही श्रद्धा उत्पन्न व्हावी असं वातावरण.
पुजाऱ्याने आरती आमच्यासमोर धरली. प्रसाद दिला. पैशाची कुठेच बात नस्से! दर्शन
घेऊन सभामंडपात बसून आम्ही मारुतीस्तोत्र म्हटलं.
बाहेर आलो. जेवायची वेळ झाली होती. समोरच पाटी ( अर्थातच
इंग्रजीत)होती – ‘अन्नपूर्नी’ शाकाहारी जेवणाची उत्तम सोय. वाह. लगेच त्या
भोजनकक्षात गेलो. अवघ्या पाचशे श्रीलंकन रुपयांत पोटभर उत्तम जेवण. मुद्दाम काहीही
न ठरवता आदल्या दिवशी सोमवारी आम्ही महादेवाच्या मंदिरात गेलो होतो, आज मंगळवारी
हनुमानाने बोलावून घेतलं. वर भोजन देऊन तृप्त केलं. त्या दिवशीची तारीख ९-९-२०२५
म्हणजे ९९९. हा म्हणे फारच महत्त्वाचा योग होता. त्याचा हनुमानाशीही संबंध असतो. ९
हा आकडा त्याच्या शक्ती, धैर्य आणि रक्षण ह्या गुणांचं प्रतीक आणि ९९९ म्हणजे
आयुष्यात धाडसाने काही नवीन सुरु करण्यासाठी हनुमानाचे आशीर्वाद मागण्याचं
‘पोर्टल’. हे सगळं समाजमाध्यमांच्या समूहावर आलेलं नंतर वाचलं पण नेमके आम्ही त्या
दिवशी तिथे असण्याच्या योगायोगाची गम्मत वाटली.
तिथून आम्ही गेलो ‘किंग्जवुड’ नावाचा चहाचा कारखाना बघायला. रम्य निसर्गसान्निध्यात उभ्या असलेल्या त्या इमारतीचं म्हणे पंधरा दिवसांपूर्वीच उद्घाटन झालेलं. अर्थात मूळ कारखाना खूप जुना आहे. त्याच्या बऱ्याच शाखा आहेत. पण रम्बोडातली ही इमारत अगदी नवीन. तिथेच मागच्या डोंगरांवर त्यांचे चहाचे मळे. चार मजली भव्य देखणी इमारत. लिफ्टच्या दरवाज्यांभोवती देखील सुंदर कोरीवकाम
सगळीकडे स्वच्छता. तिथे कामं करणाऱ्या सगळ्या प्रसन्नवदना
मुली. त्यातलीच ‘सुभाषी’ हे तिचं नाव सार्थ करणारी एक सुहासिनी आम्हाला कारखाना
दाखवायला आली. अगदी पहिल्या प्रक्रियेपासून तिने सगळं छान समजावून सांगितलं. कमी
दाबाखाली चहाची पानं मोडत नाहीत, फक्त आक्रसतात. त्या चहाला ऑरेंज पिको म्हणतात.
त्याचा स्वाद अगदी हलका असतो. मग आणखी दाब दिला की पानं मोडतात. तो ‘ब्रोकन ऑरेंज पिको’. थोडा कडक चहा. सर्वसाधारण
भारतीयांना हा आवडतो. मग असा दाब वाढवत वाढवत शेवटी ‘डस्ट’ म्हणजे एकदम कडक चहा.
ही नावं ऐकली होती पण त्यांचा खरा अर्थ त्यादिवशी कळला. खरोखर, कोणत्याही
प्रकारच्या कामात किती खोलवर ज्ञान असावं लागतं आणि त्या क्षेत्रात काम करणारी
माणसं ते किती अभ्यासाने मिळवतात! थक्क व्हायला होतं.
दुपारी कॅन्डीला पोचलो. थेट एका जेम फॅक्टरीत गेलो. अशीच
तीन-चार मजली इमारत. स्वच्छ, सुंदर, कलात्मक. तिथे एकजण आमच्या दिमतीला होताच.
तिथे आधी खाणीतून रत्नं कशी काढतात त्याचा व्हिडिओ दाखवला. मग इमारतीत हिंडून पैलू
कसे पाडतात वगैरे दाखवलं. आमच्या मार्गदर्शकाचं त्या क्षेत्रातलं ज्ञान आणि
त्याविषयीची आत्मीयता बघून आम्ही थक्क झालो. नंतर अर्थातच शोरूम. विविध रंगांची,
आकारांची रत्नं बघून डोळ्यांचं पारणं फिटलं.
तिथून आम्ही एक स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम बघायला
गेलो. सुमारे दीड तासाचा छान कार्यक्रम होता. खास तिथल्या पोशाखात, तिथली वाद्ये
वाजवत, तिथलंच नृत्यसंगीत त्या कलाकारांनी सादर केलं. शेवटी चक्क आगीवर चालण्याचं
प्रात्यक्षिक झालं.
सूर्यास्ताच्या वेळेला हॉटेलला आलो. अर्ल रीजंट हॉटेल.
अतिशय सुंदर. बाहेर छान बगीचा. प्रशस्त, म्हणजे खूपच मोठ्या खोल्या, मोठी बाल्कनी,
समोर हिरवेगार डोंगर. थोड्यात वेळात आकाशात सूर्यास्ताची रंगपंचमी सुरु झाली. डोळे
भरून तो सोहळा पाहिला. मग खाली जेवायला गेलो. तिथेही जेवणाचा भलामोठा मांड मांडलेला
होताच. वर येऊन गप्पा मारून मस्त झोपलो.
१० सप्टेंबर
आज कॅन्डीचं प्रसिद्ध बोटॅनिकल गार्डन बघायचं होतं.
भलीमोठी बाग आहे. आधी एक तास आम्ही बग्गी करून सगळा परिसर हिंडलो आणि मग दोनेक तास
आवडलेली ठिकाणं बघत रेंगाळलो. ऑर्किडच्या कक्षातील ती विलक्षण रंगांची, आकारांची
ऑर्किड्स, हिरवळ, फुलं, प्रचंड मोठे शेकडो वर्षे जुने वृक्ष, त्यांच्या मुळांच्या झालेल्या
चमत्कृतीपूर्ण आकृती, छे! त्या बागेचं शब्दांत वर्णन करणं अशक्य आहे. ती पाहायलाच
हवी.
तिथून गेलो कॅन्डीचा प्रसिद्ध स्तूप बघायला. बुद्धाचा
दात तिथे ठेवलेला आहे म्हणे. खूप गर्दी होती पण सगळं शांतपणे चाललं होतं. लोकांनी
तिथे वाहायला सुंदर कमळं आणली होती. स्तूपांमध्ये मुख्य गाभारा बंदच असतो. पण
बाहेर लोकांनी ती इतक्या सुंदर पद्धतीने मांडली
होती की ती आरास बघत राहावी. स्तूप
आणि देवळांत वाहायला लोक खूप फुलं नेतात पण निर्माल्याचं काय करतात कोण जाणे!
कोणीही नदीत पिशव्या फेकताना दिसलं नाही. सगळ्या नद्या अगदी स्वच्छ दिसल्या. असो!
स्तूप आणि तिथलं म्यूझियम बघून बाहेर पडलो. समोरच मोठ्ठा
तलाव आहे. अर्थातच स्वच्छ. तिथेच एका कॅफेमध्ये खाऊन हॉटेलला परत आलो. चक्क
दुपारची झोप काढली आणि संध्याकाळी स्थानिक बाजारात जाऊन थोडीफार खरेदी केली.
११ सप्टेंबर
आधीच्या बेताप्रमाणे आज आम्ही त्रिंकोमाली बीचला जाणार
होतो पण एक बीच बघून झाला होता म्हणून ऐतिहासिक महत्त्व असलेल्या अनुराधापुराला जायचं
ठरवलं. आधी एका मसाल्याच्या बागेत ( स्पाईस गार्डन) गेलो. छान होतं. एका
आयुर्वेदिक डॉक्टरने आम्हाला बरीच माहिती देत ती बाग हिंडून दाखवली. तिथेच मागे
म्हणे आयुर्वेद कॉलेज आहे. पूर्ण पाच वर्षांचा अभासक्रम आहे. आम्ही तिथे मसाले
घ्यायचे ठरवले होते पण खूपच महाग वाटले. जेवणाची वेळ झाली होती. सुशांतने आम्हाला ‘अतुल’
नावाच्या एका खास लंकेचं जेवण मिळणाऱ्या एका घरगुती हॉटेलमध्ये नेलं. केवळ ७००
श्रीलंकन रुपयांमध्ये ( १ भारतीय रुपया = ३.५ लंकन रुपये) मस्त जेवण झालं. साधं
कौलारू घरगुती हॉटेल. अर्थातच स्वच्छ. बुफे मांडलेला होता. निरामिष पदार्थहि होते
पण शाकाहारीमध्ये किती त्या भाज्या! केळफूल, फणस, वांगं, फरसबी, पालक, अशा कोरड्या
भाज्या, एक-दोन रस्से, भात. पोळ्या होत्या पण तिथल्या लोकांना पोळ्या मात्र जमत
नाहीत. नंतर एकदम गोड पपई आणि केळी. त्या हॉटेलच्या मालकिणीचे केस अक्षरशः
टाचेपर्यंत लांब होते. आम्ही बघून अवाक. तिला म्हटलं तर ती म्हणाली कालच मी सहा
इंच कापले कारण जमिनीवर लोळत होते.
तीन वाजता अनुराधापुराला पोचलो. युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट आहे. प्रचंड मोठा परिसर. अगदी प्राचीन स्तूपापासून ते अलीकडच्या स्तूपापर्यंत अनेक स्तूप आहेत. ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात अशोकाचा पुत्र महेंद्र आणि संघमित्रा यांनी तिथे जाऊन बौद्ध धर्माची बीजे रोवली असं म्हणतात. बुद्धाला ज्या वृक्षाखाली बुद्धत्व प्राप्त झालं त्या बोधीवृक्षाचं एक रोप संघमित्रा तिथे घेऊन गेली. तो वृक्ष आजही तिथे आहे. तो खूप जीर्ण झाला आहे पण त्याला सोन्याच्या खांबांचा आधार दिला आहे.
त्याच्या मागे एक तसाच विशाल वृक्ष आहे. तत्कालीन राजाने बौद्ध धर्माची शिकवण देणारं एक भव्य विद्यापीठ बांधलं होतं. पाच हजार भिक्षू तिथे शिक्षण घेत होते. त्यांच्या पाण्याच्या सोयीसाठी राजाने भलं थोरला तलाव बांधला. एलिफंट पॉंड नावाचं त्या तलावात खूप गाल साचला होता. पण नव्वदच्या दशकात तो गाळ काढून भोवतालच्या झाडांच्या बुंध्यांशी घातलं आणि तलाव स्वच्छ केला. तो आजही सुस्थितीत आहे. संपूर्ण आशियातला हा सर्वात मोठं मानवनिर्मित तलाव आहे असं आमच्या गाईडने सांगितलं. त्या विद्यापीठाचे काही अवशेष तिथे आहेत.
अनुराधापुराचा इतिहास खूप मोठा आहे. इथे सगळा देणं शक्य
नाही. तिथे गाईड घेणं आवश्यक.बघताना थक्क व्हायला होतं.
पण तिथल्या ज्या भग्न वास्तू होत्या त्याबद्दल आम्ही
गाईडला विचारलं. त्याच्या उत्तराने मात्र आम्ही फारच विषण्ण झालो, कारण दक्षिण
भारतातल्या चोला राजांनी तिथे जाऊन सगळी तोडमोड केली असं त्याने सांगितलं.
भारतीयांनी आपणहून कोणावरही आक्रमण केलं नाही आणि धार्मिक स्थळांना तर मुळीच हात
लावला नाही ह्या गोड गैरसमजाला चांगलाच धक्का बसला. असो!
आज रात्री सिगीरियाला राहायचं होतं. हॉटेलला पोचेपर्यंत
अंधार झाला. पोचलो तर सगळीकडे अंधार, अगदी मिणमिणते दिवे. अरे बापरे, दिवे गेलेत
की काय? पण नाही. ते जंगल हॉटेल असल्यासारखं होतं. अंधुक उजेडातच खोलीत गेलो.
अगदीच सामान्य खोली होती. आतापर्यंतची हॉटेल्स इतकी अलिशान, मस्त होती की त्या
मानाने हे अगदीच ‘हे’ वाटलं. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र बाहेरची प्रशस्त हिरवळ,
झाडं, फुलं बघून प्रसन्न वाटलं. पण खोल्या मात्र आवडल्या नाहीत. पुन्हा, असो!
१२ सप्टेंबर
. ५० मिनिटं लागली. तसा काहीच त्रास झाला नाही. पाय तर
नाहीच दुखले. मध्येमध्ये दम लागला की थांबत थांबत गेलो वर. वरून दिसणारं विहंगम
दृश्य बघून कष्टांचं सार्थक झालं. मस्त हवा, भन्नाट वारा आणि निर्धार पूर्ण
केल्याचं समाधान. खूप छान वाटत होतं. पण उतरायचंही होतं ना! काठी आणि सुशांत
यांच्या आधाराने सुखरूप परत आलो. हॉटेलवाल्यांनी नाश्ता बांधून दिला होता. तिथेच
खाली बसून खाल्ला. प्रत्येक पदार्थ अमृतासमान लागला. तो दिवस विजयाच्या धुंदीत
मस्त गेला. हॉटेलला आल्यावर थोड्या वेळाने एका छानशा आश्रमवजा मसाज सेंटरमध्ये
जाऊन मस्त मसाज घेतला. त्याही दिवशी सुशांतने अरिया नावाच्या स्थानिक हॉटेलमध्ये
जेवायला नेलं. आज तर कालच्यापेक्षाही जास्त पदार्थ. शेवटी फ्रूट सलाड. ‘आज खूप व्यायाम
केला आहे’ अशी पळवाट काढत आडवा हात मारला. हॉटेलला जाऊन छानपैकी झोप काढली.
संध्याकाळी गप्पा मारत, पत्ते खेळत निवांत वेळ घालवला.
१३ सप्टेंबर
आज कोलंबोला जायचं होतं, पण त्याआधी जवळचं, आपल्या अजंठासारखी
गुहेतली रंगचित्र आणि बुद्धमूर्ती असलेलं डंबुला गुफा मंदिर बघायचं होतं. तेही एका
उंच टेकडीवर आहे . ४०० पायऱ्या आहेत असं कळलं होतं पण आदल्या दिवशी १२०० पायऱ्या
चढल्यामुळे कायच्याकाय आत्मविश्वास आला होता. आज वंदनालाही आग्रह केला. ती योगाचार्य
अय्यंगारांची पट्टशिष्या असल्यामुळे तिला बाकी काही अडचण नव्हती. फक्त दम लागतो
म्हणून सिगीरियाला नाही म्हणाली. इथे मात्र आली. हे मंदिरही फारच सुंदर आहे. ख्रिस्तपूर्व
पहिल्या शतकातलं आहे असं म्हणतात. पण उत्तम जतन केल्यामुळे अगदी सुस्थितीत आहे.
चित्रांचे रंग, बुद्धाची सुप्तवास्थेतली मूर्ती, इतर मूर्ती आणि रंगचित्रे,
अप्रतिम! श्रीलंकेला गेलात तर नक्कीच बघायला
हवं. ही देखील युनेस्को हेरिटेज साईट आहे.
मात्र एक सूचना. अनुराधापुरा, सिगीरिया इथे तिकिटांसाठी डॉलर्स
घेतात, कार्डही चालतं पण डंबुलाला मात्र त्यांनी श्रीलंकन रुपयेच मागितले. नशिबाने
आम्ही आदल्याच दिवशी बदलून घेतले होते त्यामुळे अडचण आली नाही पण नाहीतर ते बघू
शकलो नसतो. त्यामुळे स्थानिक चलन बरोबर ठेवणं आवश्यक.
ते बघून कोलंबोला निघालो. संध्याकाळी पोचलो. मोठं शहर,
त्यामुळे उंच इमारती, गाड्यांची, माणसांची गर्दी, पण तरीही वाहतूक सुरळीत.
सिग्नलला झेब्रा क्रॉसिंगच्या अलीकडेच सगळी वाहनं थांबलेली. सिग्नल तोडण्याचा तर
प्रश्नच नाही. संपूर्ण प्रवासात आम्हाला एकाही वाहनाने वाहतुकीचा एकही नियम
मोडलेला दिसला नाही. शहर विद्रूप करणारे जाहिरातींचे, सोन्याचे साखळदंड गळ्यात
घातलेल्या ‘महामानवांचे’ फलक( होर्डींग्ज) कुठेही दिसले नाहीत. शहरांतल्या
वाहतुकीत बहुतांशी दिसणारी आक्रमकता, खाऊ की गिळू अशा नजरेने एकमेकांकडे बघणारे, जागा
नसतानाही वाहन दामटणारे वाहनचालक, सिग्नलला थांबणाऱ्यांकडे दयार्द्र नजरेने बघत
सिग्नल तोडण्याचा ‘पराक्रम’ करणारे वीर – गेले कुठे सगळे? सुशांतला विचारलं तर तो
म्हणाला की इथे जास्तीत जास्त लोक बौद्ध आहेत. बुद्धाची शिकवण पाळणारे आहेत. अगबाई,
हे नवीनच ऐकलं. धर्माची शिकवण पाळायचीही असते?? धर्म म्हणजे एक भांडण्याचं कारण
अशीच आमची समजूत.
खरंच, किती शिकण्यासारखं आहे श्रीलंकेच्या नागरिकांकडून!
कुठेही डामडौल, देखावा, प्रदर्शन, चकचकीत झगमगाट नाही. साधी, स्वच्छ, मैत्रीपूर्ण
राहणी. सगळीकडे सुबक नेटकेपणा. सुशांतचं इंग्रजी अगदीच गरजेपुरतं होतं त्यामुळे तिथली
राजकीय परिस्थिती, अर्थकारण, गुन्हेगारी वगैरेबद्दल गप्पा मारता आल्या नाहीत.
कोलंबोत House of fashion नावाचा मॉल आहे. तिथले दर अगदी वाजवी आहेत.
वस्तूंचा दर्जा उत्तम. तिथे खरेदी वगैरे आटपून हॉटेलला आलो.
१४ सप्टेंबर
आज निघायचं. दहा दिवस कसे गेले कळलंही नाही. विमानतळावर
सुशांतला अच्छा करताना, तो देश सोडताना खरंच मन भरून आलं. राहिलेली ठिकाणं बघायला,
शांतता अनुभवायला पुन्हा श्रीलंकेला यायचंच ह्या निश्चयानेच विमानात पाउल ठेवलं.
(पुलं म्हणतात त्याप्रमाणे हे ‘माझ्या प्रवासाचं’ वर्णन
नसून ‘प्रवासातल्या मी’चं वर्णन आहे. ते गोड मानून घ्याल अशी आशा, नव्हे खात्री
आहे.)