“
एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला
मारहाण केली तर तो कौटुंबिक हिंसाचार म्हणता येणार नाही- असा सर्वोच्च न्यायालयाचा
निकाल आहे. तो आज आम्ही सादर केला” असा वैष्णवी हगवणे केसमधील बचाव पक्षाच्या वकिलाने
युक्तिवाद केला. ज्यांनी निकाल दिला त्या न्यायमूर्तींना आणि या वकील साहेबांना माझे
दोन प्रश्न आहेत
११)जर हा छळ आणि हिंसाचार नाही, तर मग कौटुंबिक
हिंसाचाराची व्याख्या तुमच्या मते काय आहे? सळ्यांनी मारहाण करणे, चटके देणे, की
आणखी काही? जर तसे असेल तर मग फक्त हाताने मारहाण झाली तर कौटुंबिक हिंसाचाराची
तक्रार नोंदवण्यासाठी पत्नीला हे सगळे होईपर्यंत थांबावे लागणार का?
२२)याला जर ‘छळ’ म्हणता येणार नाही तर काय म्हणता
येईल? पुरुषार्थ? की पराक्रम?
मुळात घटना विषण्ण करणारी आहेच त्यातून अशी विधाने ऐकली की संतापाने
लाही होते. पण हा वांझोटा संताप आहे की काय अशी भीती वाटते. न्याय व्यवस्थेवर
पूर्ण विश्वास आहेच, पण राहून राहून असे वाटते की न्यायालयाचा
दरवाजा ठोठावण्यासाठी तिचा जीव जाईपर्यंत का वाट पाहिली? दीड एक वर्षांपूर्वी सुद्धा तिने विषारी औषध
पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता असे वाचले. तरीही आई वडिलांनी तिला पुन्हा
सासरी का पाठवले? तेव्हाच छळाची तक्रार का केली नाही? काय अगतिकता होती? सत्ता आणि पैसा यांनी माजलेले सासरचे लोक काय
करतील ही भीती? 'जिस घर में तेरी डोली जाएगी वहीं से तेरी अर्थी
उठेगी ' या पिढ्यानपिढ्या माथी मारलेल्या वाक्यामुळे समाजात
नाचक्की होईल ही भीती? की आणखी काही? पण या सगळ्या शंका, भीती
तिच्या जिवापेक्षा जास्त होत्या?
काय उपाय आहे या भीतीवर मात करण्याचा? पूर्वी मुली शिकलेल्या
नसायच्या, कमावत्या नसायच्या, आत्मविश्वास नसायचा, म्हणून त्या ओठ मिटून सासुरवास
सहन करायच्या अशी समजूत होती. पण आजही तीच परिस्थिती? इतके अत्याचार का सहन करतात
मुली? कुठे तक्रार करायची ते समजत नाही म्हणून? माहेरचा आधार नाही मिळाला तर एकटी
कशी राहू, खाऊ काय, या प्रश्नांपोटी? सासरचे राजकीय लागेबांधे असले तर आणखी काय
काय सोसावे लागेल या भीतीपोटी? आत्महत्येसारखे टोकाचे पाउल उचलण्याइतक्या का हतबल होतात?
ती तर जीवानिशी गेलीच पण तिच्या ९-१० महिन्याच्या बाळाचे काय?
त्याच्या पोरकेपणाला जबाबदार कोण?
सीमेपलिकडच्या दहशतवादाला जरब बसवण्यासाठी बरेच काही केले जाते, ते योग्यच आहे पण घरातल्या या दहशतवादाला कोण
कशी कधी जरब बसवणार? आणखी किती निरपराध बळी जायला हवेत त्यासाठी?
नुसते प्रश्न-प्रश्न-प्रश्न! मिळणार आहेत का यांची उत्तरे कधी? –
हाही एक अनुत्तरित प्रश्नच.
या घटनेचा विषाद वाटून माझा भाऊ नंदन फडणीस याने ही उर्दू गजलनुमा
कविता लिहिली
फिर दहेज़ ने इक मासूम को
निगला है,
और कहते हो अब समाज ये
बदला है.
औरत के सम्मान के चर्चे
बहुत हुए,
समझ गए हैं सारे ये बस
जुमला है.
बाबुल क्यों ना घर वापस
उसको ले आये,
रहरहकर दिल से सवाल ये
निकला है.
उसके दिल के अरमाँनोंको
उम्मीदों को,
इस निज़ाम ने बेरहमी से
कुचला है.
मर्दों के ही बनाये सब
कानून हैं,
हर सूरत में औरत का दामन
मैला है.
कुछ दिन की ये खबर न बन
कर रह जाए,
हर दुल्हन के वुजूद का ये
मसला है.
जिनके हाथों इक़्तिदार है
दौलत है,
उनके ही घर से ये जनाज़ा
निकला है.
अख़लाक़ी-अक़दार खो चुके हम 'नंदन',
रोज़ आदमी और एक क़दम फिसला
है.– नंदन फडणीस
याचा मी केलेला स्वैर मराठी अनुवाद –
हुंड्याने आणखी एक निरपराध बळी घेतला आहे,
आणि तुम्ही म्हणता समाज सुधारला आहे !
स्त्री सन्मानाच्या चर्चा खूप झडतात,
मात्र तो फक्त पोकळ शब्दांचा गलबला आहे.
वडिलांनी तिला माहेरी का आणलं नाही?
अशा अनेक प्रश्नांचा मनात कल्लोळ माजला आहे.
तिच्या मनातल्या सर्व इच्छा आकांक्षांना,
या व्यवस्थेने निष्ठुरपणे सुरुंग लावला आहे.
पुरुषांनीच बनवले आहेत सर्व कायदे,
स्त्रीच्या पदरात कायमच कलंक आला आहे.
ही बातमी चार दिवसांत विरून जाऊ नये,
प्रत्येक विवाहितेच्या अस्तित्वावर प्रश्न उठला
आहे.
लहानपणी
ऐकलेली, केलेली ही प्रार्थना आज सकाळी जाग येतायेताच आठवली. लहानपणी ती अगदी साधी
वाटायची पण का कोण जाणे, आज त्यावर जरा विचार करावासा वाटला आणि त्या साध्या
सोप्या शब्दांत किती खोल अर्थ आहे हे जाणवलं. प्रार्थना कदाचित तुम्हां सगळ्यांचीच
पाठ असेल पण आज ती मला कशी भिडली ते सांगते.
“ईश्वराची
दया” या शब्दांनी सुरुवात करूया. त्या करुणानिधीच्या दयेला, करुणेला सीमाच नाही. मोठ्या
संकटातून, आजारातून, अडचणीतून आपण बाहेर आलो की आपण ‘त्याचे’ आभार मानतो पण आपण
रोज आपल्याही नकळत किती गोष्टी करतो आणि त्या गृहीत धरतो त्यांची या प्रार्थनेत जाणीव
करून दिली आहे.
डोळ्यांनी
बघतो, कानांनी ऐकतो, पायांनी चालतो. – ‘मग? त्यात काय मोठं?’ अशा गुर्मीत आपण
असतो, पण वयोमानापरत्वे, किंवा इतर काही कारणामुळे दृष्टी तितकीशी चांगली राहिली
नाही, ऐकू कमी यायला लागलं, गुडघेदुखी, कंबरदुखी, हाड मोडणे किंवा अन्य काही
कारणामुळे चालायला त्रास होऊ लागला की मग त्याची किंमत कळते. ईश्वराच्या कृपेने आपण बघतो, ऐकतो आहोत ही सतत जाणीव असेल तर काय बघतो, काय ऐकतो, मोबाईल-टीव्ही स्क्रीनवर किती वेळ घालवतो याबद्दल मला वाटतं आपण जागरूक राहू.
जिव्हेने
रस चाखतो मधुरही वाचे आम्ही बोलतो – करोना काळात ज्यांची चवीची जाणीव गेली होती,
किंवा कधीकधी आजारपणामुळे अन्नाची चव लागत नाही, तेव्हा जेवणातील गंमतच संपते. ‘मधुर’
हा शब्द दोन्हीकडे लागू पडतो. रस चाखण्याला जोडून घेतला तर असं म्हणता येईल, की जे
अन्न खातो आहोत ते ‘गोड मानून’ म्हणजेच नावं न ठेवता आनंदाने ग्रहण करणं. बोलण्याला
जोडून घेतला तर गोड बोलणं असा अर्थ होईल. पण म्हणजे पोटात एक ओठांत एक असं कृत्रिम
गोड बोलणं नव्हे, तर श्रेयस साधणारं प्रेयस बोलावं असा मी त्यातून अर्थ घेतला. हे
अजिबातच सोपं नाही. पण ध्येय काय आहे हे तरी त्यातून निश्चित होईल. मी तर फारच
तडकफडक बोलणारी आहे. ‘मी स्पष्टवक्ती’ आहे अशी मी स्वतःची समजून करून घेतली आहे,
पण ती चुकीची आहे हे आज पुन्हा एकदा जाणवलं. त्यालाच मी माझ्याकडून एक आणखी पुस्ती
जोडते- मितभाषण असायला हवं. ज्ञानेश्वर माउली सांगतात त्याप्रमाणे
साच
आणि मवाळ | मितुले आणि रसाळ|
शब्द
जणू कल्लोळ | अमृताचे||
हे
कुठल्या तरी जन्मात साध्य व्हावं!!
हातांनी
बहु साल काम करतो – सर्व ज्ञानेंद्रिये, कर्मेंद्रिये आपापली कामं चोख करत असतात
तेव्हा आयुष्य किती सुखकर असतं हे, ती तितक्या ताकदीने कामं करेनाशी होतात तेव्हा
जाणवायला लागतं. म्हणूनच आतापर्यंतच्या ओळींमध्ये सांगितलेलं सगळं सुरळीत चालू
असतं ती ईश्वराचीच कृपा!
विश्रांतीही
घ्यावया घेतो झोप सुखे, फिरुनी उठतो – किती महत्त्वाची ओळ आहे ही! वर सांगितलेली
सगळी कामं यथास्थित केली की मग झोपायचं ते विश्रांती घ्यायला. म्हणजेच नुसतं
लोळायचं नाही. विश्रांती पुरतीच झोप घ्यायची. इथेसुद्धा ‘सुखे’ हा शब्द दोन्हीकडे
लागू होईल. सुखाची झोप- म्हणजे गाढ झोप. ज्यांना झोप लागत नाही, त्यांना याचं मोल चांगलंच
माहित असेल. आणि अशी झोप झाल्यावर ‘फिरुनी उठतो’ हेही किती महत्त्वाचं! याला जोडून
‘सुखे’ हा शब्द घेतला तर रोज सकाळी आनंदाने, सकारात्मकतेने उठणं असा अर्थ होईल.
हे सगळं
न मागता, फुकट मिळालं आहे, याची जाणीव राहावी म्हणून ही प्रार्थना रोज म्हणू या,
आपल्या मुला-नातवंडांनाही शिकवू या.
(मातृदिनानिमित्त
एका मध्यमवयीन आईची तिच्या आईला आणि स्वतःच्या लेकीला लिहिलेली प्रातिनिधिक पत्रं)
प्रिय
आई,
मातृदिनाच्या
शुभेच्छा!
गम्मतच
वाटते मला. मातृदिन, पितृदिन, मैत्रीदिन, महिलादिन या गोष्टी काय एका दिवसापुरत्या
मर्यादित असतात का? कशाला त्याची एवढी फॅडं? पण पुन्हा वाटतं, काय
हरकत आहे? वर्षभर आपण वाढतच असतो तरी वाढदिवसाचं महत्त्व आहेच की! मनातलं प्रकट करायला
त्या दिनाचं निमित्त. माझंच बघ की. एरवी मी तुला पत्र लिहिलं असतं असं नाही, पण
मातृदिन आहे असं लेक म्हणाली, म्हटलं चला, आईशी थोड्या गप्पा मारूया.
आई, ह्या आपल्या गप्पा खरं तर माझ्या लग्नानंतरच जास्त
व्हायला लागल्या नाही? कारण तोपर्यंत तू बाबांची बिझिनेस पार्टनर असल्यामुळे पूर्ण
वेळ ते काम, घरातली पाहुण्यांची वर्दळ, त्यातूनही वेळ काढून बागकाम, वाचन, गाणं
यांसारखे जोपासलेले छंद यांत गढलेली: आणि मी शाळा, कॉलेज, मित्रमैत्रिणी, नाटकातली
कामं, गाण्याचा क्लास यांत बुडलेली.
अर्थात, तुझं माझ्यावर बारीक लक्ष असायचं. त्यामुळे सगळं
स्वातंत्र्य असलं तरी एक वचक असायचा. त्या वेळी अर्थातच तो जाचक वाटायचा, पण तो
किती आवश्यक आहे, हे मी आई झाल्यावर मला कळलं.
तू काही गोष्टी कंपल्सरी करायला लावायचीस. एकदा सणाच्या
दिवशी तू मला सगळ्यांच्या पानाभोवती रांगोळी काढायला सांगितलीस. जरा शिंगं
फुटल्यामुळे माझा मूड नव्हता. मी म्हटलं, ‘ नाही काढणार’. तू म्हणालीस, ‘ रांगोळी
काढल्याशिवाय जेवायला मिळणार नाही.’
म्हटलं, ‘ नकोच मला जेवण.’ आणि खोलीत जाऊन दार लावून
बसले. तू नंतर मला जेवायला बोलवायला आलीस तेव्हाही मी उत्तर दिलं नाही. दुसऱ्या
दिवशी मला कळलं की तू पण जेवली नाहीस. आणि मग तुझ्या कुशीत शिरून मी पोटभर रडले.
आणि हो, त्या दिवसापासून मी रांगोळ्या काढायला लागले आणि एक्स्पर्ट झाले, आठवतं?
तू, बाबा कधीच मला फारसे रागावल्याचं आठवत नाही, पण तुझी
शिस्त लावायची पद्धत मात्र ओरिजिनल होती.
मी अगदी लहान, मला वाटतं तिसरी-चौथीत असेन. शाळेत
काहीतरी बिनसलं होतं. तो राग घेऊन मी घरी आले. आवडीचं खाणं होतं तरी त्याला हजार
नावं ठेवली. दुधाचा कप रागाने बाजूला सरकवताना दूध सांडलं. तू एकही शब्द न बोलता
मला गाडीत घातलंस आणि अनाथाश्रमात कपडे द्यायच्या निमित्ताने मला तिथे घेऊन गेलीस.
तिथे त्याही मुलांची खाण्याची वेळ होती. आधी सगळा आश्रम फिरून आपण खाण्याच्या तिथे
आलो. ती मुलं जे आनंदाने खात होती, जशी राहत होती, ते पाहून मी जी तुला बिलगले,
त्यातूनच तुला समजलं असेल की जी गोष्ट रागावून, मारूनसुद्धा कदाचित डोक्यात शिरली
नसती, ती त्या दृश्याने कायमची मनात कोरली गेली.
बाबा-तू जे सहज बोलून जायचेत, त्यातून कितीतरी शिकायला
मिळायचं. एकदा आपल्याकडच्या पार्वतीबाईचा मुलगा आजारी होता म्हणून त्या नवस बोलणार
हे कळल्यावर तू त्यांना जे सांगितलंस ते आजही आठवतं. ‘ देवाशी सौदेबाजी कसली करता?
माझ्या मुलाला बरं केलंस तर साडीचोळी नेसवीन म्हणून देवीला लाच कसली देता? ती
त्यासाठी अडून बसलेली नाही. मनापासून तिला नमस्कार करा. तिला तेवढा पुरतो. नवस
फेडण्यात पैसा घालवण्यापेक्षा मुलाला चांगल्या डॉक्टरला दाखवा, त्याचं नीट औषधपाणी
करा.’
एवढं बोलून तू थांबली नाहीस तर ‘नवस करणार नाही’ असं
त्यांच्याकडून कबूल करवून घेऊन तुझ्या खर्चाने त्याचं आजारपण काढलंस.
एकूणच तुम्हां दोघांचे निगर्वी स्वभाव, निरपेक्षपणे मदत
करण्याची वृत्ती, कोणाबद्दलही वाईट न बोलणं, हे आदर्श मनावर पक्के ठसलेत, पण
त्यांची शंभर टक्के अंमलबजावणी माझ्याकडून होत नाही हेही कबूल करते.
लहानपणी, कधीही मनात काही गोंधळ चालू असला आणि तुझी
चाहूल लागली की मन शांत व्हायचं. ‘ आई आली, आता सगळं ठीक होईल’ अशी खात्री
वाटायची.
ही अशी खात्री माझ्या लेकीला माझ्याबद्दल वाटते की नाही
कोण जाणे! वाटत असावी, कारण ती आणि मी जिवलग मैत्रिणी आहोत.
पण आई, हे मैत्रिणीचं नातं ही आजच्या काळाची देणगी आहे
असं मला वाटतं. कारण माझ्या लहानपणी, आई-वडील म्हणजे मोठी माणसं, त्यांना मान
द्यायचा हेच चित्र- आपल्याच नव्हे, तर मैत्रिणींच्याही घरी दिसायचं. चिऊ जशी
जातायेता माझ्या गळ्यात पडते , पापे घेते, हा मोकळेपणा तेव्हा नव्हता. एकूणच
मनातलं बोलून दाखवायची फारशी प्रथा नव्हती. म्हणून या गोष्टी तुला कधी सांगू शकले
नाही.
पण चिऊ जेव्हा मला म्हणते, ‘ आई तू अगदी मॅडूबाई आहेस,
पण तरीही आय लव्ह यू थ्री मच’ तेव्हा मला जग जिंकल्याचा आनंद होतो, तसा, मीही
माझ्या भावना सांगितल्यावर तुलाही नक्कीच होईल असं वाटलं.
आई, हेच आईवडील जन्मोजन्मी मिळावेत म्हणून वटसावित्रीसारखं
एखादं व्रत असेल तर ते मी आनंदाने करीन. ( अर्थात तुला माझ्यासारखी त्रासदायक
मुलगी जन्मोजन्मी हवी आहे की नाही कुणास ठाऊक)
बघ, जे कधी मोकळेपणी बोलू शकेन असं वाटलं नव्हतं, ते
मातृदिनाच्या निमित्तानें लिहून मोकळी झाले. मातृदिनाचे शतशः आभार.
हॅपी
मदर्स डे आई!
तुझं
लाडकं,
प्रौढ
लेकरू.
लाडक्या
चिऊस,
अनेक
आशीर्वाद.
‘माझ्या
खऱ्या नावाने कधीच हाक मारत नाहीस, मग एवढा खर्च करून बारसं केलं कशाला?’ हा
शंभरदा विचारलेला प्रश्न तू पत्र वाचतानाही विचारणारच, पण मला माहिती आहे की तुलाही
मी चिऊ म्हटलेलंच आवडतं. ‘आईने मला नावाने हाक मारली की नक्की चिडलेली असते,’ असं तुम्हा
मैत्रिणींची ‘स्टीरिओफोनिक कुजबुज’ चालू असताना एकदा कानावर आलं आणि आणि ‘चिऊ मोठी
झाली, आता तिला चिऊ म्हणता कामा नये,’ हा विचार मनात येण्यापूर्वीच हद्दपार झाला.
आज
मातृदिनी, मी आई झाले तो क्षण लख्ख आठवतो. हज्जारदा ऐकलेली गोष्ट परत ऐक. भूल देऊन
सिझेरियन केल्यामुळे तुझं पहिलं रडणं मी ऐकलंच नाही. भूल उतरल्यानंतर, म्हणजे
सगळ्यांनी तुला पाहिल्यानंतर सर्वांत शेवटी मी पाहिलं. तुला माझ्या कुशीत ठेवलं
होतं आणि तू टक्क डोळे उघडून माझ्याकडे पाहत होतीस. आणि चिऊ, तुझी ती पहिली स्वच्छ
नजर आजही तितकीच निर्मळ आहे हे विशेष. तुला कधीही नजर चुकवून बोलायची वेळ आली नाही,
याचं श्रेय मी देवाची कृपा, दोन्हीकडच्या आजीआजोबांचा सहवास, त्यांचे संस्कार आणि
अर्थातच तू स्वतः ,यांना देईन.
तुझी
पहिलीची परीक्षा होती. आधी डिक्टेशन आणि मग इंग्लिश असे लागोपाठ पेपर होते. घरी
आल्यावर तू सांगितलंस, ‘ आई, डिक्टेशन झालं आणि तो पेपर घ्यायच्या आधीच आम्हाला
इंग्लिशचे क्वश्चनपेपर दिले. डिक्टेशनमधला एक शब्द त्या पेपरमध्ये होता आणि मला कळलं
की माझं त्या शब्दाचं स्पेलिंग चुकलं आहे. पण आई, ते मी करेक्ट नाही केलं कारण ते
कॉपी केल्यासारखं झालं असतं ना!’
आजही
तो प्रसंग आठवला की त्याच आवेगाने डोळ्यात पाणी येतं आणि अभिमानाने मान ताठ होते.
तोच प्रामाणिकपणा बारावीच्या सहामाहीला गणितात १०० पैकी १०० मार्क पडले तेव्हा बेरीज
चुकली हे सरांच्या निदर्शनाला आणून देऊन १०० चे ९९ झाले तेव्हा, आणि मेडिकल
कॉलेजच्या पहिल्या सहामाहीला पहिली आलीस पण तेव्हाही चुकलेली बेरीज दाखवून दोन
मार्क कमी घेऊन तिसऱ्या क्रमांकावर गेलीस तेव्हा कॉलेजच्या गळ्यातला ताईत झालीस. तुझ्या
मित्रमैत्रिणींनी तर तुला संत ही पदवी बहाल केली.
पण त्या
संत मुलीचा डामरटपण काही कमी नव्हता. जेमतेम वर्षाची असशील. तुझा लाडका मामा तुला
मांडीवर घेऊन थोपटत ‘नन्ही कली सोने चाली’गात होता. सगळं गाणं ऐकून घेतलंस आणि मग
म्हणालीस, ‘मामा, माझ्या आईसारखं तुला गाता येत नाही.’ एकदा कोणीतरी घरी आलेलं
असताना त्यांना ‘ माझ्या आईला ऑम्लेटशिवाय काहीही करता येत नाही’ असं सांगून माझं ‘पाककौशल्य’
वेशीला टांगलं होतंस.
अशीच
एकदा आत्याकडे गेली असताना तिने तुला प्रेमाने विचारलं, ‘खायला काय करू?’ तू
म्हणालीस, ‘ आलू पराठे कर, कारण सहसा ते कोणाचे बिघडत नाहीत.’
पहिलीत
असताना ‘मायसेल्फ’निबंध लिहिताना तू लिहिलेलं ‘ आय लुक व्हेरी ब्युटीफुल’ हे वाक्य
ऐकून आमची हसून हसून मुरकुंडी वळली होती. पण खरंच, देवदयेने तू अंतर्बाह्य सुंदर आहेस.
छोटी
छोटी भांडणं व्हायची आपली, अजूनही होतात, पण तू नववीत असताना तुझ्या मैत्रिणी,
त्यातल्या एकीचा मोठा भाऊ आणि त्याच्या मित्रांबरोबर दोन दिवस महाबळेश्वरला जाणार
होत्या. त्यांच्याबरोबर तुला पाठवलं नाही म्हणून तू माझ्यावर जी चिडलीस – चार दिवस
बोलली नाहीस. पण मी शांत होते कारण अगदी असाच जुळा प्रसंग माझ्या बाबतीत घडला होता.
दहावीत असताना नाटकात हौस म्हणून काम करायला परवानगी होती, पण दौरा जाणार होता,
त्या वेळी आईने पाठवलं नाही म्हणून मी असंच तारांगण केलं होतं – अर्धवट वयातले
धोके समजावून दिले तरीही तेव्हा काही पटलं नव्हतं. तेव्हा आईने मला जे सांगितलं , ‘तू
आई झालीस की मगच तुला पटेल’ तेच त्या वेळी मी तुलाही सांगितलं होतं आणि तूही
तुझ्या मुलीला तेच सांगशील. काळ बदलला तरी वात्सल्याचा, काळजीचा पोत बदलत नाही गं!
जरा
लांबलंच का पत्र? पण अगं कितीतरी आठवणी राहूनच गेल्या. बरं असू दे. त्या पुढच्या
मातृदिनाला.
तर चिऊताई, आजच्या मातृदिनी, ‘ तू खूप शीक,
निवडलेल्या क्षेत्रात टॉपला जा. समजूतदार नवरा मिळो, सुखाचा संसार होवो,’ हे
आशीर्वाद तर आहेतच, पण आणखी एक स्पेशल आशीर्वाद देते. तुझ्याही आयुष्यात एक ‘चिऊ’
येवो आणि तू आम्हाला जसा आनंद दिलास तसाच तुम्हा उभयतांना मिळो.’
तुझी,
मॅडूबाई आई.
रविवार, ६ एप्रिल, २०२५
रामनवमी
नमस्कार, सर्वांना रामनवमीच्या शुभेच्छा. श्रीराम, सीतामाई, लक्ष्मण आणि हनुमान हा संपूर्ण श्रीराम परिवार वंदनीय. श्रीरामांबरोबर या सर्वांचीही आपण पूजा करतो. पण म्हणजे ‘आम्ही मूर्तींना स्नान घालतो, चंदन उटी लावतो, धूप-
दीप, नैवेद्य दाखवतो,रामरक्षा तोंडपाठ म्हणतो, ‘श्रीराम जयराम जयजयराम’ हा जप करतो, आणि या सगळ्याचा व्हिडीओ समाज माध्यमांवर टाकून हजारो लाईक्स मिळवतो, आणि हो, हे सगळं करताना आपल्या मागण्यांची यादी
त्याच्यापुढे सादर करायला विसरत नाही,’म्हणजे आम्ही रामभक्त म्हणवायला मोकळे झालो का? हे सगळं करताना मनात भाव आहे का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात त्याप्रमाणे,
‘ मनी नाही भाव, म्हणे देवा मला पाव, देव अशाने भेटायचा नाही रे,
देव बाजारचा भाजीपाला नाही रे.’
पण मग पूजा, नामजप करायचा की नाही? याचे उत्तर ज्ञानेश्वरीत मिळते.श्रीमद् ज्ञानेश्वरीच्या १२ व्या अध्यायात माउलींचा कृष्ण म्हणतो –
या भवसागराचे भल्याभल्यांना भय वाटते, मग माझ्या भक्तांनाही भय वाटतेच. म्हणून मी ज्याच्या-त्याच्या योग्यतेप्रमाणे त्याला मार्ग दिला. जे विरक्त होते, त्यांना ध्यानमार्ग दिला, पण सगुण उपासनेची गरज असलेल्या भाबड्या भक्तांसाठी मी मूर्तींचे मेळावे मांडले आणि नामाच्या हजारो होड्या सोडल्या.
म्हणजेच नामजप, मूर्तीपूजा भगवंतानेच मान्य केली आहे. मात्र कर्मकांड, व्रतवैकल्ये यांत गुंतून न पडता भाव महत्त्वाचा, याचेही प्रतिपादन केले आहे. म्हणजेच सर्व साधकांचे ध्येय एकच- आत्मस्वरूपाचे ज्ञान – पण मार्ग वेगळे.
तुकोबा देखील म्हणतात – ‘सगुण निर्गुण नाही भेद, दोन्ही टिपरी एकच नाद’.
राम, कृष्ण, शिव, देवी, गणपती ही प्रत्येक देवता म्हणजे एकेका शक्तीचे, गुणाचे प्रतीक. पिंडी ते ब्रह्मांडी – ब्रह्मांडी ते पिंडी या न्यायाने त्या सगळ्या शक्ती आपल्यात वसतातच. ज्या वेळी जी शक्ती पाहिजे असेल, तेव्हा त्या त्या देवतेचे स्मरण करून आपल्यातच वास करत असलेल्या शक्तीला आवाहन करणे म्हणजे त्या देवतेची पूजा, उपासना असे मला वाटते. श्रीराम म्हणजे मर्यादा पुरुषोत्तम, मूर्तिमंत विवेक, सत्यवचनी, मातृपितृभक्त, राजाची भूमिका निभावण्यासाठी स्वतःच्या सुखापेक्षा प्रजेच्या हिताला प्राधान्य देणारे. अन्याय, दुष्टपणा सहन न करणारे, दुष्टशक्तीचे निर्दालन करणारे. सीतामाई म्हणजे संपूर्ण समर्पण, लक्ष्मण म्हणजे सेवाभाव आणि हनुमान म्हणजे भक्तीची परिसीमा. हे सगळे गुण, या सर्व शक्ती आपल्याही अंतरात आहेतच. म्हणून ज्या ज्या वेळी या गुणांची गरज भासेल, तेव्हा या देवतांचे स्मरण, पूजन अर्चन करावे असा माझा दृष्टीकोन आहे.
या संदर्भातली तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास यांची एक कथा फार बोलकी आहे. हे दोघेही समकालीन. महाराष्ट्र धर्माचा प्रसार करण्यासाठी समर्थ भ्रमण करत असताना पंढरपुरी आले. तुकाराम महाराजांना चंद्रभागेच्या वाळवंटात उराउरी भेटले. तुकोबा त्यांना पांडुरंगाच्या दर्शनाला घेऊन गेले. त्या साजिऱ्या मूर्तीचे ‘ सुंदर ते ध्यान’ असे वर्णन करून त्यांनी समर्थांना विचारले, ‘ योगिराजा, तुला कसा दिसतो माझा पांडुरंग?’ समर्थ एकटक त्या मूर्तीकडे पाहत राहिले. समर्थ रामाचे भक्त. विठ्ठलाच्या मूर्तीच्या हातात शस्त्र नाही. विठ्ठलाची मूर्ती ही समाजाच्या अत्यंत प्रगत, चौथ्या अवस्थेचे प्रतीक आहे, असे विनोबा भाव्यांचे प्रतिपादन आहे.
पहिली अवस्था म्हणजे शासनकर्ताच नाही, दोघांचे भांडण झाले तर एकमेकांनाच धोपटायचे.
दुसरी अवस्था म्हणजे राजा किंवा नेत्याने ते भांडण सोडवायचे,
तिसरी अवस्था म्हणजे देवाने न्यायनिवाडा करायचा आणि शासन करायचे, ( याचा अर्थ सदसद्विवेक जागृत असलेला समाज, अंतःस्थ ईश्वराकडून शिक्षा.)
आणि चौथी अवस्था म्हणजे देवाचाही शस्त्रसंन्यास. शिक्षा करावी असा प्रसंगच उद्भवणे नाही.
पण तो काळ मोंगलांच्या अत्याचाराचा होता. विठ्ठलाच्या त्या निःशस्त्र मूर्तीपेक्षा समर्थांना दुष्टशक्तीचा संहार करणारा धनुर्धारी राम हवा होता. त्यामुळे त्यांच्या तोंडून शब्द उमटले-
येथे का रे उभा श्रीरामा | मनमोहन मेघश्यामा ||
चापबाण काय केले | कर कटावरी ठेविले ||
का बा धरिला अबोला | दिसे वेष पालटीला ||
काय केली अयोध्यापुरी | येथे वसविली पंढरी ||
सध्या आपण समाजाच्या कितव्या अवस्थेत आहोत याची आपल्या सगळ्यांनाच पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे अद्याप देवाच्या शस्त्रसंन्यासाची वेळ आली नाही हे निश्चित. आज सगळ्यात जास्त गरज कशाची असेल तर ती विवेकी, चारित्र्यवान, योग्य तिथे शासन करणाऱ्या नेतृत्वाची, आणि आपल्याही प्रत्येकाच्या अंतरातल्या या गुणांना, शक्तींना आवाहन करण्याची, म्हणूनच हे सर्व गुण असणाऱ्या श्रीरामाचे अधिक महत्त्व !
आमचा
ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता. उत्तराताई शास्त्री अंत्यंत नेमकेपणाने गीतेचा
श्लोक, त्यावरचं माऊलींचं भाष्य हे आम्हां अल्पज्ञांना अप्रतिम रीत्या समजावून
सांगत होत्या.
पहिला अध्याय
अर्जुनविषाद योगाचा. ‘सीदन्ति
मम गात्राणि मुखं च परिशुष्यते’ अशा अवस्थेतला अर्जुन ‘ मी माझ्याच
आप्तांना युद्धात मारलं
तर कुलक्षयाचं पाप मला
लागेल’ हे भगवंताला सांगताना म्हणतो, ‘ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः|’
सनातन कुलधर्म म्हणजे माझ्या डोक्यात लगेच व्रतं-वैकल्यं, पूजा-अर्चा
असा अर्थ जोडला गेला पण उत्तराताईनी तो गैरसमज दूर करून नेमका अर्थ विशद केला.
“ सनातन
म्हणजे बुरसटलेला, कर्मठ नाही, तर दीर्घकाळच्या परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेले
कुळाचार म्हणजे त्या कुळाची विशिष्ट संस्कृती, जगण्याची पद्धत, प्रेयस न दडपता
श्रेयसाच्या मार्गाने कसं जायचं हे कुळाचार शिकवतात. त्यामुळे समाजाला स्वास्थ्य
प्राप्त होतं. खरं तर वर्तनाच्या नियमांनाच भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ म्हटलं गेलंय.”
वर्गाहून घरी
येताना डोक्यात विचार सुरू झाले. अलीकडे वर्तनाच्या कितीतरी नियमांना ‘चलता है’
म्हणून तिलांजली दिली जाते.
मध्यंतरी एका
कार्यालयात जेवायला गेले होते. पंगत होती त्यामुळे जरा बरं वाटलं. बहुतेक
कार्यालयांत व्यवस्थित वाढतात, पण तिथे मात्र कुठेही, काहीही, कितीही, कसंही वाढणं
चाललं होतं. ही एवढी चटणी उजवीकडे, भाजीचा ढीग डावीकडे, पातळ पदार्थ वाढताना डाव
निपटून न घेतल्यामुळे पातेल्यातून वाटीत येईपर्यंत वरण, सार, अळूची भाजी इत्यादींचे
रंगीबेरंगी ठिपके चादरीवर पडत होते. ते जेवणाचं पान इतकं कुरूप दिसत होतं की माझी
अन्नावरची वासनाच गेली. त्यातून, हल्ली सगळी पंगत वाढून होईपर्यंत, पार्वतीपते..
म्हणेपर्यंत कोणी थांबतच नाही. ताटात पदार्थ पडला रे पडला की स्वाहा...
ही गोष्ट सहज
एका मैत्रिणीजवळ बोलले तर ती लगेच फणकारली,“तुझी नसती फॅडं असतात. काय फरक पडतो?”
मी मनात
म्हटलं, ‘ काय फरक पडतो, या चलाऊ वृत्तीमुळेच आपला एकेकाळचा सुसंकृत समाज विकृत
होत चाललाय.’
कोणतेही
समारंभ कॉकटेल्सशिवाय न होणं, बुफेमध्ये परत-परत यायला नको म्हणून शिगोशीग प्लेट
भरून घेणं आणि त्यातलं निम्मं अन्न टाकून देणं, उष्ट्या हातानेच अन्न वाढून घेणं-
काय फरक पडतो? सार्वजनिक ठिकाणी हात-तोंड धुताना मोठमोठ्याने खाकरे काढणं, नाक
शिंकरणं, चुळा भरल्यावर बेसिनमध्ये पाणी न ओतता आपण थुंकलेले अन्नाचे कण तसेच राहू
देणं, पंगतीत सुद्धा पदार्थ मागून घेऊन टाकणं, ताट चिवडलेलं, बरबटलेलं ठेवणं- काय
फरक पडतो?
माझी आई, सासूबाई
नेहमी सांगतात, ‘ आपलं उष्टं ताट उचलणाऱ्याला किळस येतं कामा नये इतकं ताट स्वच्छ
पाहिजे. लिंबाच्या फोडी किंवा मिरच्या-कढीलिंब वगैरे एकत्र करून वाटीत ठेवलं
पाहिजे. यावरही काहींचं म्हणणं असतंच – हॅ, काय फरक पडतो? असं म्हणणाऱ्यांना एकदा पंगतीतली उष्टी ताटं
उचलायला लावली पाहिजेत.
अनोळखी
माणसाला, अगदी हॉटेलमधल्या वेटरला सुद्धा अहो-जाहो म्हणणं हे आमच्या घरातले
संस्कार, त्यामुळे पटकन कुणी तिऱ्हाईताला अरे-जारे केलं की मीच कानकोंडी होते.
जिथे तिथे
थुंकणं, कचरा टाकणं, आपल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या दारात ‘बसवणं’ हे समाजाच्या
आरोग्याला, सौंदर्याला घातक आहे हे कुणालाच जाणवत नाही? सार्वजनिक ठिकाणी
पूजा-उत्सवाच्या नावाखाली स्पीकर्सची भिंत उभी करून कानठळ्या बसवणारी गाणी (?)
लावणं, हिडीस अंगविक्षेप करत नाचणं याने समाजाचं सौष्ठव बिघडतं, असं कुणालाच वाटत
नाही? प्रचंड मोठ्या आवाजाने आजूबाजूच्यांना त्रास होतो, क्वचित बहिरेपणाही येतो
याची कुणालाच काही पडलेली नाही?
नुकतेच आम्ही
रोटरी क्लबचे मित्र-मैत्रिणी लखनौ, अयोध्या-वाराणसीची ट्रीप करून आलो. ट्रीप अगदी
छान झाली. अयोध्येला तर रामललाचं दर्शन इतकं सुंदर आणि विनासायास झालं की सगळेच
अगदी कृतकृत्य झालो. पण त्या सुंदर दिवसाला गालबोट लावणारी एक गोष्ट रात्री घडली.
त्या दिवशी उन्हात भरपूर चालणं झालं होतं. दमणूक झाली होती. आता रात्री मस्त
झोपायचं अशा आमच्या सुखस्वप्नावर पाणी पडलं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो,
तिथेच खाली लॉनवर लग्नसमारंभ सुरू होता. उत्तरेकडची लग्नं मध्यरात्रीनंतरच लागतात.
त्यामुळे आम्ही नऊच्या सुमारास खोलीत आलो तेव्हा स्पीकर्सची प्रचंड भिंत लावून
कर्कश आवाजात गाणीबिणी चालू होती. त्यातून ते सगळं आमच्या खोलीच्या बरोब्बर खाली
चालू होतं. धसका बसून मी रिसेप्शनला फोन करून विचारलं की हे किती वाजेपर्यंत
चालणार आहे? तो म्हणाला ११. हरे राम! पण काही इलाजच नव्हता. प्रत्यक्षात मात्र
बारा वाजून गेले तरी गोंगाट कमी होण्याचं नाव नाही. मी आपली सारखी खाली फोन करत
होते. एकदा खाली जाऊन पण आले. त्यांचं म्हणणं – आम्ही सांगितलं पण आमचं ते ऐकत
नाहीत. एक वाजता असह्य होऊन मी चक्क त्या मांडवात गेले. यजमानाला आवाज बंद
करण्याची विनंती केली. सगळे दारू पिऊन तर्र झालेले. एकजण मला म्हणाला, ‘ शादी एक
दिन ही होती है. सोते तो आप रोज है.’ काय बोलणार याच्यावर? मुकाट्याने परत खोलीत
आले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टला म्हटलं – पोलिसांना फोन करा. तो म्हणाला
तुम्हीच करा. मी फोन लावला. तक्रार सांगितली. पुन्हा मला पोलिसांकडून दोनतीनदा फोन
आला. ‘आम्ही आलो आहोत, खाली या’ म्हणाले. म्हटलं मी येणार नाही. रिसेप्शनिस्टला
म्हटलं तू जा बाहेर. आवाज बंद झाला. मी सुटकेचा निःश्वास टाकला पण दहा मिनिटांत
पुन्हा सुरू. मी पुन्हा पोलिसांना फोन लावला. तर ते म्हणाले, ‘ आम्ही येऊन आवाज
बंद करायला लावला पण आम्ही गेल्यावर त्यांनी पुन्हा सुरू केला तर आम्ही काय करणार?
आम्ही काही तिथे चोवीस तास बसून राहू शकत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार
करा.’ आता मात्र मी हतबलतेचा शेवटचा टप्पा गाठला होता. स्वस्थ पडून राहिले. दोन
अडीचनंतर कधीतरी तो गोंधळ बंद झाला.
आपल्या
देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेने जगण्याचा हक्क दिला आहे, पण इतरांनी
तुम्हाला शांततेने जगू दिलं पाहिजे ना! भारताने क्रिकेट सामना जिंकला किंवा अगदी
फुटकळ कारणांनी सुद्धा, जोरदार फटाके, रात्री-अपरात्री मोठमोठ्याने हॉर्न वाजवत, आरडाओरडा
करत रस्त्यांतून बेफाम जायचं, मग त्याचा कोणाला त्रास झाला तरी बेहत्तर. ही विकृती
का बोकाळत चालली आहे? मला वाटतं याचं एक कारण म्हणजे या मंडळींच्या अंगी लक्षवेधी
काम करण्यासाठी स्वतःची कर्तबगारी नसते, मग स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधून
घेण्यासाठी असलेच आचरट उपाय उरतात.
शाळेत शिकलेलं
एक सुभाषित आठवतं –
अष्टादश
पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्
परोपकारः
पुण्याय पापाय परपीडनम् ||
अठरा पुराणांचं
सार म्हणजे व्यासांची ही दोन वचनं – ‘दुसऱ्याला मदत करणं हे पुण्य आणि त्रास देणं
म्हणजे पाप’
हा इतका (म्हटलं
तर)सोपा आपल्या भारतीय संस्कृतीचा कुळाचार आहे, तर मग कोणतीही गोष्ट बोलताना, करताना
समाजाच्या स्वास्थ्याला, सुबकतेला, नीतिनियमांना तडा जाणार नाही याचं भान राखणं फार
अवघड आहे का?
आपल्याला रोज
कित्येक माणसं भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर
काही कुणाच्या सांगण्यातून. अशाच प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भेटलेल्या, लौकिकार्थाने
सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवलं ते मला खूप
समृद्ध करून गेलं.
१
एका लहान
गावात माझा ‘चर्पटमंजिरी’ हा एकपात्री कार्यक्रम होता. गावातल्या प्रतिष्ठित घरी
माझी उतरायची सोय केली होती. राहायचं नव्हतं, पण गावात पोचल्यावर जेवणखाण, जरा
आराम करण्याची सोय त्यांच्याकडे होती. त्यांचा मुकुंद नावाचा ड्रायव्हर कम नोकर
मला रेल्वे स्टेशनवर न्यायला आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायलाही तोच होता.
माझ्याबरोबर काही सीडीज् होत्या. मी मुकुंदला विचारलं, ‘ बाहेर एक टेबल लावलं तर
तू सीडीज विकशील का?’ तो हो म्हणाला. मी सीडीजची संख्या, किंमत वगैरे लिहून पिशवी
त्याच्या ताब्यात दिली.
कार्यक्रम छान
झाला. गावातली सगळी मान्यवर, प्रतिष्ठित कुटुंबं आली होती. कार्यक्रम संपल्यावर
तिथेच जेवून स्टेशनवर जायचं होतं. मुकुंद गाडी घेऊन तयार होताच. त्याने आधी सीडीजचा
हिशोब दिला. आम्ही स्टेशनवर गेलो. गाडी यायला वेळ होता. मी एक सीडी काढून मुकुंदला
दिली. म्हटलं, ‘ ही तुला भेट.’
तो म्हणाला, ‘
ताई, सांगणारच नव्हतो, पण आता सांगतो.
हिशोब करताना माझ्या लक्षात आलं की एका सीडीचे पैसे कमी आहेत. गर्दीत कोणीतरी पैसे
न देता उचलली असणार. मग मी तिथल्या वॉचमनची सायकल घेऊन घरी गेलो, तेवढे पैसे आणले
आणि तुम्हाला बरोबर हिशोब दिला.
मी अवाक.’ अरे,
तू तुझ्या खिशातले पैसे कशाला दिलेस?’
‘असं कसं ताई?
तुम्ही माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली होती. नेमके माझ्याजवळ काहीच पैसे
नव्हते, म्हणून घरी जावं लागलं. तुम्ही जेवत होतात तोपर्यंत घरी जाऊन आलो.’
‘ अरे पण
तुझ्याकडे गाडी होती तर सायकल का घेऊन गेलास?’
‘छे छे!
माझ्या कामासाठी मालकांची गाडी कशी वापरायची? ‘
‘मग तुझं
जेवण?’
‘राहू दे हो
ताई, जेवणाचं काय एवढं! तुमचा इतका सुंदर कार्यक्रम ऐकूनच पोट भरलं माझं.’
मी त्याला
सीडीचे पैसे दिले. तो घेताच नव्हता, पण बळजबरीने दिले. तिथे स्टेशनवर वडापावची
गाडी होती तिथून त्याला वडापाव घेऊन दिला, खायला लावला. त्याच्या डोळ्यांत पाणी
आलं, पण खरी हल्ले होते मी.
तथाकथित
प्रतिष्ठित, श्रीमंत जमावातल्या कोणीतरी हातोहात सीडी लांबवली होती आणि या गरीब
माणसाला इमान,विश्वास महत्त्वाचा वाटत होता. त्यासाठी स्वतःच्या पदराला खर
लावायचीही त्याची तयारी होती.
कोणाला
श्रीमंत म्हणायचं, कोणाला गरीब?
२
रोज घरी
येणारा दूधवाला,पोस्टमन, पेपरवाला यांचं,एका संस्थेचा प्रतिनिधी एवढंच आपल्या लेखी
अस्तित्व असतं. पत्र मिळाल्याशी कारण, तो पोस्टमन गोरा की काळा याच्याशी आपल्याला
फारसं देणंघेणं नसतं. हल्ली ईमेल, व्हॉट्सअॅपच्या जमान्यात तर बिचाऱ्या पोस्टमनची
कुणी वाटही पाहत नाही. पण पोस्टमनची एक व्यक्ती म्हणून दखल घ्यायला लावणारी एक
घटना माझ्या बाबतीत बऱ्याच वर्षांपूर्वी घडली.
२००२ साली आम्ही
तीन मैत्रिणींनी मिळून केलेल्या युरोपच्या अनोख्या कार ट्रीपबद्दलची माझी लेखमाला
एका दैनिकात प्रसिद्ध झाली. अनेकांनी ती वाचून मला पसंतीची पावती दिली. पण मला
आश्चर्याचा धक्का दिला तो एका पोस्टमनने. रोज दाराखालून पत्रे सरकवून जाणाऱ्या
पोस्टमनने त्या दिवशी बेल वाजवली. मला वाटलं रजिस्टर असेल किंवा एखाद्या पत्राला
कमी पैशाचं तिकीट लावलं असेल. पण तो म्हणाला, ‘ ताई, मी तुमचे सगळे लेख वाचले.
अतिशय आवडले. मुद्दाम सांगावंसं वाटलं म्हणून बेल वाजवली.’ मी थक्क. त्याला आत
बोलावलं. प्यायला ताक दिलं. तो सांगायला लागला. ‘ मी कॉलेजमध्ये असताना कविता
करायचो. एक कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या बेतात असतानाच घराला आग लागली. इतर
सामानाबरोबर कविताही जाळून गेल्या. मग पुढे पोट पाठीमागे लागलं आणि सगळंच राहून
गेलं. पण काही चांगलं वाचलं, ऐकलं, की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. बरं, येतो ताई.’
असं म्हणून तो सायकल मारत उन्हातून निघून गेला. तेव्हापासून तो निवृत्त होईपर्यंत
आमची साहित्यिक मैत्री होती.
३
एका गावातल्या
जमीनदारांचा हृद्य किस्सा ऐकला. जमीनदार सुमारे सत्तरीचे. आता इनामं जरी गेली असली
तरी गावात त्यांची जबरदस्त पत होती. अडल्यानडल्याचे कैवारी होते. भरपूर शेती होती,
राबणारी कुळंहोती, सुबत्ता होती.
अचानक एक
धक्कादायक बातमी कळली. इनामदारांना सारखा ताप येत होता म्हणून तपासणी केली तर
निदान झालं रक्ताच्या कर्करोगाचं. जेमतेम चार-सहा आठवडे मिळतील असं डॉक्टर
म्हणाले. झालं! गावावर शोककळा पसरली. पण इनामदार माणूसच वेगळा! त्यांनी
गावकऱ्यांना बोलावून सांगितलं ,’ गड्यांनो, मी काही आता राहत नाही. बोलावणं आलं,
जायला पाहिजे. तुमचा निरोप घेता येतोय हे काय कमी आहे? असं करा, येत्या शनिवारी
सगळ्या गावाने वाड्यावर जेवायला यायचं. फक्कड मेजवानी करू या.
गावकरी रडायला
लागेल, ‘ धनी, काय बोलताय? ही काय मेजवानीची वेळ आहे होय?’ इनामदार हसून म्हणाले,
‘ अरे माणूस गेल्यावर तेराव्याचं जेवण घालतात ना, ते मी आत्ताच घालतोय. माझी माणसं
माझ्या डोळ्यादेखत पोटभर जेवताना बघून किती समाधान वाटेल मला!’
काय कमाल
कल्पना आहे नाही! हां, मात्र त्यासाठी काळीज वाघाचंच हवं!!!