कुळाचार
आमचा
ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता. उत्तराताई शास्त्री अंत्यंत नेमकेपणाने गीतेचा
श्लोक, त्यावरचं माऊलींचं भाष्य हे आम्हां अल्पज्ञांना अप्रतिम रीत्या समजावून
सांगत होत्या.
पहिला अध्याय
अर्जुनविषाद योगाचा. ‘सीदन्ति
मम गात्राणि मुखं च परिशुष्यते’ अशा अवस्थेतला अर्जुन ‘ मी माझ्याच
आप्तांना युद्धात मारलं
तर कुलक्षयाचं पाप मला
लागेल’ हे भगवंताला सांगताना म्हणतो, ‘ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः|’
सनातन कुलधर्म म्हणजे माझ्या डोक्यात लगेच व्रतं-वैकल्यं, पूजा-अर्चा
असा अर्थ जोडला गेला पण उत्तराताईनी तो गैरसमज दूर करून नेमका अर्थ विशद केला.
“ सनातन
म्हणजे बुरसटलेला, कर्मठ नाही, तर दीर्घकाळच्या परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेले
कुळाचार म्हणजे त्या कुळाची विशिष्ट संस्कृती, जगण्याची पद्धत, प्रेयस न दडपता
श्रेयसाच्या मार्गाने कसं जायचं हे कुळाचार शिकवतात. त्यामुळे समाजाला स्वास्थ्य
प्राप्त होतं. खरं तर वर्तनाच्या नियमांनाच भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ म्हटलं गेलंय.”
वर्गाहून घरी
येताना डोक्यात विचार सुरू झाले. अलीकडे वर्तनाच्या कितीतरी नियमांना ‘चलता है’
म्हणून तिलांजली दिली जाते.
मध्यंतरी एका
कार्यालयात जेवायला गेले होते. पंगत होती त्यामुळे जरा बरं वाटलं. बहुतेक
कार्यालयांत व्यवस्थित वाढतात, पण तिथे मात्र कुठेही, काहीही, कितीही, कसंही वाढणं
चाललं होतं. ही एवढी चटणी उजवीकडे, भाजीचा ढीग डावीकडे, पातळ पदार्थ वाढताना डाव
निपटून न घेतल्यामुळे पातेल्यातून वाटीत येईपर्यंत वरण, सार, अळूची भाजी इत्यादींचे
रंगीबेरंगी ठिपके चादरीवर पडत होते. ते जेवणाचं पान इतकं कुरूप दिसत होतं की माझी
अन्नावरची वासनाच गेली. त्यातून, हल्ली सगळी पंगत वाढून होईपर्यंत, पार्वतीपते..
म्हणेपर्यंत कोणी थांबतच नाही. ताटात पदार्थ पडला रे पडला की स्वाहा...
ही गोष्ट सहज
एका मैत्रिणीजवळ बोलले तर ती लगेच फणकारली,
“तुझी नसती फॅडं असतात. काय फरक पडतो?”
मी मनात
म्हटलं, ‘ काय फरक पडतो, या चलाऊ वृत्तीमुळेच आपला एकेकाळचा सुसंकृत समाज विकृत
होत चाललाय.’
कोणतेही
समारंभ कॉकटेल्सशिवाय न होणं, बुफेमध्ये परत-परत यायला नको म्हणून शिगोशीग प्लेट
भरून घेणं आणि त्यातलं निम्मं अन्न टाकून देणं, उष्ट्या हातानेच अन्न वाढून घेणं-
काय फरक पडतो? सार्वजनिक ठिकाणी हात-तोंड धुताना मोठमोठ्याने खाकरे काढणं, नाक
शिंकरणं, चुळा भरल्यावर बेसिनमध्ये पाणी न ओतता आपण थुंकलेले अन्नाचे कण तसेच राहू
देणं, पंगतीत सुद्धा पदार्थ मागून घेऊन टाकणं, ताट चिवडलेलं, बरबटलेलं ठेवणं- काय
फरक पडतो?
माझी आई, सासूबाई
नेहमी सांगतात, ‘ आपलं उष्टं ताट उचलणाऱ्याला किळस येतं कामा नये इतकं ताट स्वच्छ
पाहिजे. लिंबाच्या फोडी किंवा मिरच्या-कढीलिंब वगैरे एकत्र करून वाटीत ठेवलं
पाहिजे. यावरही काहींचं म्हणणं असतंच – हॅ, काय फरक पडतो? असं म्हणणाऱ्यांना एकदा पंगतीतली उष्टी ताटं
उचलायला लावली पाहिजेत.
अनोळखी
माणसाला, अगदी हॉटेलमधल्या वेटरला सुद्धा अहो-जाहो म्हणणं हे आमच्या घरातले
संस्कार, त्यामुळे पटकन कुणी तिऱ्हाईताला अरे-जारे केलं की मीच कानकोंडी होते.
जिथे तिथे
थुंकणं, कचरा टाकणं, आपल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या दारात ‘बसवणं’ हे समाजाच्या
आरोग्याला, सौंदर्याला घातक आहे हे कुणालाच जाणवत नाही? सार्वजनिक ठिकाणी
पूजा-उत्सवाच्या नावाखाली स्पीकर्सची भिंत उभी करून कानठळ्या बसवणारी गाणी (?)
लावणं, हिडीस अंगविक्षेप करत नाचणं याने समाजाचं सौष्ठव बिघडतं, असं कुणालाच वाटत
नाही? प्रचंड मोठ्या आवाजाने आजूबाजूच्यांना त्रास होतो, क्वचित बहिरेपणाही येतो
याची कुणालाच काही पडलेली नाही?
नुकतेच आम्ही रोटरी क्लबचे मित्र-मैत्रिणी लखनौ, अयोध्या-वाराणसीची ट्रीप करून आलो. ट्रीप अगदी छान झाली. अयोध्येला तर रामललाचं दर्शन इतकं सुंदर आणि विनासायास झालं की सगळेच अगदी कृतकृत्य झालो. पण त्या सुंदर दिवसाला गालबोट लावणारी एक गोष्ट रात्री घडली. त्या दिवशी उन्हात भरपूर चालणं झालं होतं. दमणूक झाली होती. आता रात्री मस्त झोपायचं अशा आमच्या सुखस्वप्नावर पाणी पडलं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, तिथेच खाली लॉनवर लग्नसमारंभ सुरू होता. उत्तरेकडची लग्नं मध्यरात्रीनंतरच लागतात. त्यामुळे आम्ही नऊच्या सुमारास खोलीत आलो तेव्हा स्पीकर्सची प्रचंड भिंत लावून कर्कश आवाजात गाणीबिणी चालू होती. त्यातून ते सगळं आमच्या खोलीच्या बरोब्बर खाली चालू होतं. धसका बसून मी रिसेप्शनला फोन करून विचारलं की हे किती वाजेपर्यंत चालणार आहे? तो म्हणाला ११. हरे राम! पण काही इलाजच नव्हता. प्रत्यक्षात मात्र बारा वाजून गेले तरी गोंगाट कमी होण्याचं नाव नाही. मी आपली सारखी खाली फोन करत होते. एकदा खाली जाऊन पण आले. त्यांचं म्हणणं – आम्ही सांगितलं पण आमचं ते ऐकत नाहीत. एक वाजता असह्य होऊन मी चक्क त्या मांडवात गेले. यजमानाला आवाज बंद करण्याची विनंती केली. सगळे दारू पिऊन तर्र झालेले. एकजण मला म्हणाला, ‘ शादी एक दिन ही होती है. सोते तो आप रोज है.’ काय बोलणार याच्यावर? मुकाट्याने परत खोलीत आले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टला म्हटलं – पोलिसांना फोन करा. तो म्हणाला तुम्हीच करा. मी फोन लावला. तक्रार सांगितली. पुन्हा मला पोलिसांकडून दोनतीनदा फोन आला. ‘आम्ही आलो आहोत, खाली या’ म्हणाले. म्हटलं मी येणार नाही. रिसेप्शनिस्टला म्हटलं तू जा बाहेर. आवाज बंद झाला. मी सुटकेचा निःश्वास टाकला पण दहा मिनिटांत पुन्हा सुरू. मी पुन्हा पोलिसांना फोन लावला. तर ते म्हणाले, ‘ आम्ही येऊन आवाज बंद करायला लावला पण आम्ही गेल्यावर त्यांनी पुन्हा सुरू केला तर आम्ही काय करणार? आम्ही काही तिथे चोवीस तास बसून राहू शकत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा.’ आता मात्र मी हतबलतेचा शेवटचा टप्पा गाठला होता. स्वस्थ पडून राहिले. दोन अडीचनंतर कधीतरी तो गोंधळ बंद झाला.
आपल्या
देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेने जगण्याचा हक्क दिला आहे, पण इतरांनी
तुम्हाला शांततेने जगू दिलं पाहिजे ना! भारताने क्रिकेट सामना जिंकला किंवा अगदी
फुटकळ कारणांनी सुद्धा, जोरदार फटाके, रात्री-अपरात्री मोठमोठ्याने हॉर्न वाजवत, आरडाओरडा
करत रस्त्यांतून बेफाम जायचं, मग त्याचा कोणाला त्रास झाला तरी बेहत्तर. ही विकृती
का बोकाळत चालली आहे? मला वाटतं याचं एक कारण म्हणजे या मंडळींच्या अंगी लक्षवेधी
काम करण्यासाठी स्वतःची कर्तबगारी नसते, मग स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधून
घेण्यासाठी असलेच आचरट उपाय उरतात.
शाळेत शिकलेलं
एक सुभाषित आठवतं –
अष्टादश
पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्
परोपकारः
पुण्याय पापाय परपीडनम् ||
अठरा पुराणांचं
सार म्हणजे व्यासांची ही दोन वचनं – ‘दुसऱ्याला मदत करणं हे पुण्य आणि त्रास देणं
म्हणजे पाप’
हा इतका (म्हटलं
तर)सोपा आपल्या भारतीय संस्कृतीचा कुळाचार आहे, तर मग कोणतीही गोष्ट बोलताना, करताना
समाजाच्या स्वास्थ्याला, सुबकतेला, नीतिनियमांना तडा जाणार नाही याचं भान राखणं फार
अवघड आहे का?
खूपच छान मंजिरी. एका महत्त्वाच्या विषयाला तू वाचा फोडली. अयोध्येला वरील घटनेची साक्षीदार मी सुद्धा तुझ्याबरोबर हजर होते. शिवाय पुण्यातही वेळोवेळी आपण सर्वजणच वर्षभर आवाजाच्या त्रासाला तोंड देत असतोच. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या इतरही बाबींचा तू छान परामर्श घेतला आहेस.
उत्तर द्याहटवाधर्म म्हणजे वर्तनाचे नियम याचा तू उल्लेख केलास हे फार छान झाले.
धन्यवाद प्रतिमा
उत्तर द्याहटवा