मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

"पुढा स्नेह पाझरे" blog no. 2024/7

पुढा स्नेह पाझरे ---  








अहमदनगर मधील स्नेहालय आणि त्याचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी बहुतेकांना माहिती आहेत. त्यांचे अफाट कामही काही जणांना माहिती असेल. ज्यांना अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी www.snehalaya.org या त्यांच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. 

स्नेहालयची माहिती सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच नाही, तर प्रत्येक भेटीत डॉ गिरीश कुलकर्णी यांचा एक वेगळाच पैलू दिसतो आणि आपले अचंबित होणे कसे थांबतच नाही हे मला सांगायचे आहे.

माझी मैत्रीण शुभांगी कोपरकर हिने स्नेहालयवर लिहिलेल्या ‘परिवर्तनाची पहाट’ या मराठी पुस्तकाचा मी हिंदी अनुवाद केला. ते पुस्तक ‘ परिवर्तन की प्रभात’ दि ५ जानेवारी २०१९ ला हिंदी साहित्यातील एक थोर व्यक्तिमत्व आणि पुणे विद्यापीठातील माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव प्रथमवीर यांच्या हस्ते स्नेहालयमधेच प्रकाशित झाले. त्या समारंभासाठी शुभांगी आणि मी गेलो होतो.

शुभांगी आता स्नेहालयच्या पुण्यातील प्रकल्पाचे – स्नेहाधारचे काम बघते. त्याविषयी तिला गिरीश सरांशी काही बोलायचे होते त्यामुळे कार्यक्रम स्थळी जाताना ते आमच्या गाडीत आले. इतर गोष्टी बोलून झाल्यावर शुभांगी त्यांना म्हणाली, ‘ आपल्या एका देणगीदारांची मुलगी अमेरिकेत असते तिला मोठी देणगी द्यायची आहे. तर आता तुम्हाला कुठल्या विशेष गोष्टीसाठी मदत पाहिजे ते सांगितले तर त्या त्याप्रमाणे व्यवस्था करतील.’ मग गिरीश सरांनी सांगितले ‘सध्या पाण्याचा खूप प्रश्न आहे त्यामुळे बोअरवेल करायची आहे, काही इमारतींची डागडुजी करायला हवी आहे, मुलींच्या वसतिगृहाचे पत्रे खूपच खराब झाले आहेत.’ 

मी ऐकत होते. हे बोलणे कुठल्याही संस्थाचालकासारखे होते. पण गिरीश कुलकर्णी ही चीजच काही और आहे, यावर त्यांच्या पुढच्या वाक्यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कित्येक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या संस्था सुरु केल्या आहेत. त्यापैकी अजित कुलकर्णी याने अंध, मूक बधिरांसाठी ‘अनाम प्रेम’ नावाची संस्था सुरु केली आहे. गिरीश सर पुढे म्हणाले, ‘अनाम प्रेमला खूपच बेसिक गोष्टींसाठी पैशाची गरज आहे. त्या देणगीदारांना चालणार असेल तर स्नेहालय ऐवजी अनाम प्रेमला देणगी द्यायला सांगा.’ 

मला खरंच त्या क्षणी त्यांना साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. स्वतःसाठी मागणे तर त्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल पण आपल्या संस्थेकडे येऊ पाहणारी एक मोठी रक्कम दुसऱ्या संस्थेला द्या असे सांगणाऱ्या माणसाला काय बिरूद लावायचे?

ज्ञानेश्वर माउलींनी तेराव्या अध्यायात ज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगताना म्हटले आहे त्याची आठवण झाली -

पुढा स्नेह पाझरे| माघा चालती अक्षरे|

शब्द पाठी अवतरे| कृपा आधी||

मंजिरी धामणकर





मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट blog no. 2024/6





 ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट 

नमस्कार,

ससा कासव शर्यतीची गोष्ट लहानपणापासून आपण शेकडो वेळा ऐकली आहे. त्याचं तात्पर्य देखील आपल्याला चांगलं ठाऊक आहे. शर्यतीत कासव जिंकलं हे सर्वांना माहिती आहे. पण शर्यत हरलेल्या सशाचं पुढे काय झालं असावं हे सांगणारी ही उरलेली अर्धी गोष्ट नुकतीच वाचनात आली. लेखक माहित नाही पण खूप आवडली गोष्ट म्हणून सांगावीशी वाटली.  

   "सशाने वेगाने धावता धावता मागे वळून पाहिलं, कासव दूरवर कुठेच दिसत नव्हतं. शर्यत ठरल्यापासून कासव सतत, सावकाश, न थांबता शेकडो मैल चालण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल बढाया मारत होतं. सशाला त्याला दाखवून द्यायचं होतं की तोही शेकडो मैल धावू शकतो आणि तेही वेगाने. त्यामुळे शर्यतीच्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. म्हणून झाडाची थंडगार सावली दिसल्यावर सशाने थोडा वेळ विश्रांती घ्यायची ठरवली.

 एक छानसा लांबटगोल दगड निवडून त्यावर मऊसूत गवत पसरून तो सशाने उशाला घेतला  आणि ताणून दिली. आजूबाजूला पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, थोड्या अंतरावरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळाळ - सतत वेगाने धावण्याच्या उन्मादात आजूबाजूच्या इतक्या सुंदर जंगलाकडे त्याने कधी नीट पाहिलंच नव्हतं. सगळच वातावरण इतकं सुखद होतं की लगेच त्याचा डोळा लागला.

 त्याला स्वप्न पडलं की एका लाकडाच्या ओंडक्यावर झोपून तो ओढ्यातून वाहत चालला आहे. किनाऱ्याजवळ आल्यावर त्याला एक लांब दाढी असलेले साधू महाराज दिसले.  त्याच्याकडे बघून हसून त्यांनी विचारलं,

साधू -  ‘ कोण आहेस बेटा तू?’

ससा  - ‘ मी ससा आहे महाराज आणि मी कासवाशी शर्यत लावली आहे.’

 साधू  -‘ ती का बरं?’

 ससा - मी सगळ्यात वेगाने धावू शकतो हे सिद्ध करण्यासाठी.’

साधू  -- ‘ ते कशासाठी सिद्ध करायचं?’

ससा - म्हणजे काय! सरळ आहे. त्यामुळे मला पदक मिळेल, सन्मान मिळेल आणि सर्वात जास्त वेगाने धावणारा म्हणून माझ्यानंतरही माझं नाव घेतलं जाईल.’

 साधू  - ‘ पन्नास – शंभर वर्षांपूर्वी सर्वात वेगाने धावणाऱ्या हरणाचं नाव, किंवा सर्वात मोठ्या हत्तीचं, किंवा सर्वात बलशाली सिंहाचं नाव तुला माहिती आहे का?’

ससा -- ‘ अं --- नाही महाराज.’

साधू - ‘ आज तुला एका कासवाने आव्हान दिलंय, उद्या एखादा साप देईल, परवा झेब्रा. मग काय ‘ मी सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो हे सिद्ध करण्यासाठी तू आयुष्यभर शर्यतच लावत राहणार?’

ससा - ‘ हं – हा विचार मी कधीच केला नव्हता.’

साधू  -- ‘ तर मग आता कर. शर्यत विसर. तुला आयुष्यात कशाने आनंद मिळतो हे शोध आणि ते कर.’

 सशाला जाग आली. त्याला खूप शांत वाटत होतं. तो निवांतपणे चालू लागला. वाटेत भेटणारा प्रत्येकजण विचारत होता, ‘ अरे तू इथे काय करतो आहेस? शर्यत लावली होतीस ना? कासव जिंकलं की. तू हरलास.’

ससा हसून म्हणाला, ‘ कासवाला त्याचा विजय लखलाभ. मला आता कोणतीच शर्यत लावायची नाही. मला शांतपणे माझं काम करत, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आयुष्य जगायचं आहे.’

गोष्ट मी लिहिलेली नसली तरी त्यातून माझं जे विचारचक्र सुरू झालं ते असं- 

मूळ गोष्टीपेक्षा या गोष्टीचं तात्पर्य अगदी वेगळं. पण विचार करायला लावणारं आहे, हो ना?

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शर्यतीत धावतो आहे- ऊर फुटेस्तोवर. परीक्षेतले मार्क, पद, प्रतिष्ठा,पैसा, प्रसिद्धी, गाडीचं, फोनचं मॉडेल, वाहनांचा वेग - अगदी सगळ्या सगळ्या गोष्टींत 'मी कसा सगळ्यांच्या पुढे जाईन ही चुरस. 

आता त्यात भर पडली आहे सोशल मीडियाची. फॉलोअर्स,सब्स्क्राइबर्स,व्ह्यूज, यांत चढाओढ. त्यासाठी रील्स बनवताना, सेल्फी घेताना जिवाचीही पर्वा नाही. मी इतरांपेक्षा आघाडीवर राहिलं पाहिजे- बस्स! कुठे जाणार आहोत आपण ही आघाडी घेऊन? लाख मोलाचा जीव असल्या क्षुल्लक स्पर्धेसाठी पणाला लावायचा? जे मिळवण्यासाठी इतका आटापिटा चालला आहे, ते मिळालं तर त्याचा उपभोग घ्यायला तरी वेळ आहे का? 

लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती. 

एका माणसाजवळ खूप अंथरूणं - पांघरुणं होती. त्याला वास्तविक एकच पुरणार होतं पण त्याला वाटलं सगळ्याचा उपभोग घेऊ. म्हणून तो सगळी अंथरूणं घालत बसला. शेवटचं घालेपर्यंत सकाळ झाली. त्याला झोपायलाच मिळालं नाही. 

विचार करू या. जाऊ दे कासवाला पुढे. आपण आनंदाचे क्षण वेचू या. 

   मंज़िलें मिलीं नहीं, तो चलो, रास्ते बदल लेते हैं

    वक़्त बदला नहीं, तो चलो, ख़्वाहिशें बदल लेते हैं,

    समय किसी के लिए रुकता नहीं,

    जो मिला है, चलो, उसीको संवार लेते हैं||

वाचकहो, पटलं,आवडलं तर कॉमेंट बॉक्समधे तसं नक्की लिहा. 

आणखी कुठल्या विषयाबद्दल वाचायला आवडेल तेही लिहा. मी नक्की लिहायचा प्रयत्न करीन. 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

आश्ना -उर्दू शायरीची मराठी सखी भाग १ Blog no. 2024/5

 


                                  

उर्दू शायरी, ग़ज़ल, या काव्यप्रकारात काही वेगळीच खुमारी आहे, लज्जत आहे. भाषेची नजाकत, शायराचं कविकल्पनेत स्वतःला झोकून देणं, त्यामुळे होणारी अतिशयोक्ती, हे सगळंच फार तरल, लोभस आहे. उर्दू शायरी न वाचणाऱ्या मराठी रसिकांपर्यंत ते वैभव आणावं म्हणून मी त्या शेरांचा मराठी काव्यपंक्तींत अनुवाद करायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक झालं. त्यातलीच पानं स्कॅन करून मी इथे टाकते आहे, जेणेकरून त्यातील चित्रं देखील वाचकांना बघता येतील आणि पुस्तक वाचतो आहोत असं वाटेल. माझंच पुस्तक असल्यामुळे कॉपीराईटचाही प्रश्न नाही.  या पहिल्या भागात बघूया हे काही शेर ‘शायरी, ग़ज़ल,’ या विषयावरचेच –






यातील काही भागाचा दृक्श्राव्य अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.




हे पुस्तक माझ्याच आवाजात स्टोरीटेलवर आहे. https://www.storytel.com/books/ashana-1475376?appRedirect=true

तेही तुम्ही ऐकू शकता.

 

 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

अद्भुत संस्कृत 2024/4

 

                                                                                                                      अद्भुत संस्कृत  


नमस्कार,

संस्कृत एक अद्भुत भाषा.  आजच्या लेखात संस्कृतची महती.  एकच गोष्ट स्पष्ट करते. संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय आहे – अभ्यासाचा नाही. कदाचित एखादी चूक होऊ शकते. तेव्हा चूकभूल देणे-घेणे

सुसुवातीला मुंडक उपनिषदाचा हा शांतिपाठ

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम  देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः|

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्त नः पूषा विश्ववेदाः

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः , स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||

हे देवांनो, आम्हाला कानांनी मंगलकारक ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहायला मिळो. स्थिर (निरोगी) आणि सुदृढ अशा अवयव आणि शरीरासह आम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होवो. इंद्र, पूषण,गरुड देव, आणि बृहस्पती आमचं कल्याण करो. 

संस्कृत भाषा कशी आहे तर -

भाषासु  मुख्य मधुरा दिव्या गीर्वाणभारती

तत्रापि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम्||

संस्कृत ही किती समृद्ध भाषा आहे हे सिद्ध करणारा पुढचा श्लोक. यात केवळ हे एकच अक्षर वापरूनच पूर्ण अद्भुत श्लोक तयार केलेला आहे. किरातार्जुनीयम् काव्यसंग्रहातील हा श्लोक भारवि या महाकविने रचलेला आहे.  

 

न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु।

नुन्नोऽनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत्॥

 

अनुवाद -दुर्बलाकडु होइ विद्ध जो

            दुर्बलावरी करी मात जो

           म्हणावेच ना नर हो त्याला

           संबोधावे भेकड त्याला  

 

अर्थ -  आपल्याहून दुर्बल असलेल्याकडून जो मात खातो किंवा पराभव स्वीकारतो तो आणि आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्यावर जो हात उगारतो अशा दोघांनाही माणूस म्हणू  नये, भेकड म्हणावे.

 

रामकृष्ण विलोम काव्य, हा आणखी एक अद्भुत प्रकार.  

 

14 व्या शतकात दैवज्ञ सूर्यकवी नावाच्या कवीने रामकृष्ण विलोमकाव्य लिहिलं. विलोम म्हणजे डावीकडून किंवा उजवीकडून कसंही वाचलं तरी शब्द तेच असतात. साधे उदाहरण म्हणजे ‘समास’ हा शब्द. कसाही वाचला तरी ‘समास’ असाच राहतो. तर हे विलोम काव्य अद्भुत अशासाठी की ते सरळ वाचलं तर श्रीरामाचं चरित्र किंवा स्तुती आहे आणि उलटीकडून वाचलं तर श्रीकृष्णस्तुती आहे.  यातली ही एक ओळ-

 

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्रीः

 

अर्थ – ज्याने भूमिकन्या सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त केलं, ज्याचं हास्य विलोभनीय आहे, ज्याचा अवतार श्रेष्ठ आहे,आणि ज्याच्याकडून सदैव दया आणि भव्यता प्रक्षेपित होते अशा त्याला ( रामाला) मी वंदन करतो.

 

आता उलटीकडून वाचताना –

 

श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदा मुक्तिमुतासुभूतम्

 

अर्थ –ज्याच्या ठायी सूर्यचंद्राचं तेज आहे, ज्याने विध्वंसक पूतनेचा संहार केला आणि जो विश्वात्मा आहे, अशा यादवकुलोत्पन्न श्रीकृष्णाला मी नमन करतो.

 

असंच ‘ राघवयादवीयं’ हे आणखी एक रामकृष्णविलोम काव्य १७ व्या शतकात कांचीपुरमच्या कवी वेंकटाध्वरी यांनी लिहिलं.

 

त्यातला हा पहिला श्लोक

 

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।

रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥

 

अर्थ – ज्यांच्या हृदयात सीता आहे, ज्यांनी पर्वत पार करून लंकेला जाऊन रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून अयोध्येला आले त्या श्रीरामांच्या चरणी मी प्रणाम करतो  

आता उलटीकडून वाचताना –

 

सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः।

यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥

 

अर्थ – जो सदैव माता लक्ष्मीसह विराजमान आहे, ज्याच्या शोभेपुढे  सर्व जडजवाहिराची शोभा फिकी आहे, जो रुक्मिणी आणि गोपींना पूज्य आहे, अशा श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रणाम करतो

 

काय अफाट ही प्रतिभा आणि काय ही संस्कृतची क्षमता !

 

हल्ली अशी भीती व्यक्त केली जाते की संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे.  तसं होऊ नये म्हणून पूज्य श्री वरदानंद भारती यांनी ईश्वराकडे पसायदान मागितलं आहे. तेच आपणही मागू या.

 

करुणानिधे प्रभो, नो दोषान् क्षमस्व भगवन्|

सुचिरात्प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन||

भुविभूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा|

श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन्||.

आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्धवेषा|

अधुना लवावशेषा, तां आश्रयस्व भगवन्||.

देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः|

समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन्||

 

अर्थ – हे करुणाकर परमेश्वरा, आमच्या दोषांना क्षमा कर. दीर्घकाळ निद्रेत असलेल्या या देशाला ज्ञानाने जागृत कर. पृथ्वीतलावर सर्व भाषांची अभिलाषा पूर्ण करणारी ही देवभाषा – संस्कृत – आज केवळ श्वसन करते आहे, तिचा सांभाळ कर. पूर्वी ही देववाणी विशुद्ध रूपाने वास करत होती, आता ती अवशेष मात्र शिल्लक राहिली आहे. तिला तू आश्रय दे. हे परमेश्वरा, या देशाला स्वतंत्रता, प्राचीन सभ्यता आणि वैभवसंपन्नतेच्या काळाकडे पुन्हा घेऊन जा.

 

 



 

 

शनिवार, ७ सप्टेंबर, २०२४

गणपती बाप्पाची आरती - शब्द आणि नेमका अर्थ . २०२४/३



(रंगचित्र - शिरीष क्षीरसागर )

नमस्कार 

गणपती बाप्पा! सगळ्यांचा लाडका. गणेशचतुर्थीला ती मंगलमूर्ती घरी आणून यथासांग पूजा करून रोज मनोभावे पूजा,आरती करायची. ‘आरती तुम्हाला पाठ आहे का हो?’ असं विचारलं तर नक्की तुम्ही मला वेड्यात काढाल. ‘म्हणजे काय? लहानपणापासून हजारो वेळा म्हटली आहे, अगदी तोंडपाठ आहे.’ आता पुढचा प्रश्न- ‘आरतीचे नेमके शब्द आणि त्यांचा नेमका अर्थ माहिती आहे का हो ?’ आता मात्र हो म्हणण्याआधी जरा घुटमळलात का?हरकत नाही. बघू या नक्की शब्द आणि त्यांचा नेमका अर्थ –

सुखकर्ता दु:खहर्ता वार्ता विघ्नाची

नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची.

सुखकर्ता म्हणजे सुख देणारा, किंवा चांगलं करणारा, दु:खहर्ता म्हणजे दुःख हरणारा हे तर झालंच, पण वार्ता विघ्नाची म्हणजे काय? आणि नुरवी,पुरवी प्रेम चा काय अर्थ? तर चालीच्या दृष्टीने जरी ‘नुरवी पुरवी प्रेम’ पासून दुसरी ओळ सुरू झाली असं वाटलं तरी अर्थाच्या दृष्टीने पहिली ओळ ‘वार्ता विघ्नाची नुरवी’ इथे संपते. म्हणजे गणपती विघ्नाची वार्ता-चाहूल सुद्धा उरू देत नाही, मग प्रत्यक्ष विघ्न तर दूरच. मग ‘पुरवी प्रेम कृपा जयाची’ याचा अर्थ सोपाच आहे.

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची

कंठी झळके माळ मुक्ताफळांची

जयदेव जयदेव जय मंगलमूर्ती

दर्शनमात्रे मनःकामना पुरती ||धृ||

याचा अर्थ सरळ आहे. मुक्ताफळ म्हणजे मोती. त्या मंगलमूर्तीच्या केवळ दर्शनानेच सर्व मनोरथ पूर्ण होतात.

रत्नखचित फरा तुज गौरीकुमरा

चंदनाची उटी कुंकुमकेशरा

हिरेजडित मुकुट शोभतो बरा

रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया

जयदेव जयदेव ||१||

निराकार निर्गुण परब्रह्माच्या सगुण साकार रूपाची ही स्तुती आहे, म्हणून हे सगळे त्या मूर्तीचे सोहळे आहेत. त्या गौरीच्या म्हणजे पार्वतीच्या पुत्राच्या मूर्तीला रत्नांनी मढवलेला फरा म्हणजे मुकुटाचा तुरा किंवा भाळावरचं पदक आहे. चंदन,कुंकुम, केशर अशा शांतवणाऱ्या, सुगंधी द्रव्यांची उटी म्हणजे लेप आहे. हिरेजडित मुकुट आहे. आणि पायात रुणझुण करणारे छोटे घुंगरू आहेत.

लंबोदर पीतांबर फणिवरबंधना ( फळीवर वंदना नाही!)

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना

दास रामाचा वाट पाहे सदना ( सजणा नाही)

संकटी पावावे ( संकष्टी नाही) निर्वाणी रक्षावे सुरवरवंदना

जयदेव—||२||

मोठं पोट असलेला, पिवळं वस्त्र नेसलेला, (पिवळं पीतांबर ही द्विरुक्ती. पीत – पिवळे, अंबर – वस्त्र), ज्याच्या पोटाभोवती ‘फणिवरबंध’ म्हणजे नागाचा बंध आहे, ( ‘फणिवरवंदना’ असाही पाठभेद आहे. फणिवर - सर्वश्रेष्ठ नाग म्हणजे शेषनाग देखील ज्याला वंदन करतो असा), सरळ सोंड असलेला, वक्रतुंड म्हणजे वाकडं तोंड नव्हे, तर गोल चेहरा असलेला, दोन चर्मचक्षु आणि कपाळावरचा तिसरा ज्ञानचक्षु असे तीन डोळे असलेला – त्रिनयन असा गणपती, माझ्या सदना- म्हणजे घरी येईल याची रामाचा दास वाट पाहत आहे. ही आरती रामदास स्वामींनी रचली आहे आणि ते त्या सुरवरवंदनाला – म्हणजे देवांचेही देव- श्रेष्ठ देव सुद्धा ज्याला वंदन करतात अशा गजाननाला विनंती करत आहेत की माझ्या संकटकाळी तू मला पाव, म्हणजे धावून ये. आणि निर्वाणी, म्हणजे माझ्या मृत्युसमयी तू माझं रक्षण कर. याचा अर्थ फार खोल आहे. म्हणजे त्या शेवटच्या घडीला माझ्या मनात कोणतीही खळबळ, अस्थिरता असू नये, मी अगदी शांत असावं.

तर असे हे शब्द आणि असा त्याचा अर्थ. यापुढे आरती म्हणताना अर्थ समजून-उमजून म्हटली तर अधिक भावपूर्ण होईल. हो ना!  

हेच सगळं ऐकायचंही असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा 

 मंजिरी धामणकर 

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

११-११-११ blog no. 2024/2

 

                                        ११ – ११- ११.



११ ह्या आकड्याशी ­माझे भलते सख्य. माझा वाढदिवस ११ नोव्हेंबर म्हणजे ११-११. आणि तिथीप्रमाणे कार्तिकी एकादशी, म्हणजे पुन्हा अकराच. मग २०११ सालचा माझा वाढदिवस म्हणजे ११-११-११, अत्यंत दुर्मिळ योग. जेव्हा हे लक्षात आले, तेव्हाच ठरवले की त्या दिवशी काहीतरी खूप वेगळे, छान करायचे. पण नक्की काय,ते सुचत नव्ह्ते. महागडी वस्तू घेणे किंवा पंचतारांकित हॉटेलात जेवायला जाणे ह्या आम्हा दोघांच्याही आनंदाच्या कल्पना कधीच नव्हत्या. मग काय बरे करायचे? एकदम सुचले. त्या दिवशी एवरेस्ट बघायचे. मी अजिबातच गिर्यारोहक वगैरे नाही. पण आमच्यासारख्या साठी नेपाळ सरकारने छान सोय केली आहे. काठमांडू विमान तळावरून एक छोटे विमान प्रवाश्यांना घेऊन जाते आणि अनेक शिखरांच्या शेजारून जात जात शेवटी एवरेस्ट दाखवून वळते. ही कल्पना सुचली आणि मी माझ्यावरच खूश झाले. लगेच नियोजनाला सुरुवात केली. आमचा निष्णात गिर्यारोहक मित्र डॉ. रघुनाथ गोडबोले ला सांगितले. तो हिमालयाचा भक्तच असल्यामुळे त्याने तत्परतेने माहिती दिली. नेपाळ पर्यटन आयोजनाचा प्रचंड अनुभव असलेल्या प्लेझर ट्रेवल्सच्या सुजाता जोशी शी गाठ घालून दिली (जिचे पुढे कायमच्या मैत्रीत रुपांतर झाले.) आमचे मित्र भरत, अमला फाटक आणि रुक्मिणी ,बंडोपंत साठे आमच्या उत्साहात सहभागी झाले.

६ ते १२ नोव्हेंबर अशी आमची ट्रीप ठरली. ज्यांना ज्यांना सांगितले त्यातील बहुतेक सर्वांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. काहींनी मात्र “जाताय, पण एवरेस्ट नक्की दिसेलच असे नाही. सगळे काही त्या दिवशीच्या हवामानावर अवलंबून असते.” असे म्हणून नाट लावायचा ही प्रयत्न केला. पण मी म्हटले,“मी “त्याला” सांगितलंय की मला माझ्या वाढदिवसाला एवरेस्ट बघायचंय. आता ते मला दाखवायचं की नाही ही त्याची मर्जी.”

६ ता. ला पुणे दिल्ली काठमांडू असे आमचे विमान होते. माझे पती डॉ, दिलीप, मी, अमला, भरत, रुक्मिणी, बंडोपंत असा आमचा चमू निघाला. दिल्लीहून निघाल्यावर थोड्या वेळात हिमालयाचे दर्शन व्हायला लागते. रघुनाथने विमानात कोणत्या बाजूला बसायचे तेही सांगितले होते. शिखरांची नावासह चित्रे काढून दिली होती. आम्ही खिडकीला डोळे लावून बसलो होतो. आणि दिसला. अगदी  काठमांडूला उतरेपर्यंत हिमालय दिसत राहिला. आम्ही चित्रे बघून शिखरे ओळखायचा प्रयत्न करत होतो. बराच वेळ घिरट्या घालून विमान उतरले. आम्ही हॉटेलला गेलो. तिथे सुजाता जोशीची नेपाळमधील जोडीदार उज्ज्वला दली स्वागताला होतीच. उज्ज्वला मूळची पुण्याचीच. नेपाळी माणसाशी लग्न करून तिकडे गेली. नेपाळच्या पर्यटन बोर्ड मध्ये काम करते. ती म्हणाली, “ विमानाला उशीर होत् होता तशी मला काळजीच वाटत होती. नोव्हेंबर मध्ये खरे तर हवा अगदी सुरेख असते पण कालपर्यंत हवा इतकी खराब होती की काही उड्डाणे रद्द झाली.” झालं, मनात जरा पाल चुकचुकली पण लगेच म्हटलं, आज सुधारली ना, आता आणखी सुधारेल.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोखराला जायचे होते. काठमांडू पोखरा उड्डाणे सुद्धा गेल्या चार दिवसापासून ठप्प आहेत ही वार्ता कळली. आम्ही विमानतळावर जाऊन बसलो. मनात विश्वास होता की आपल्याला जायला मिळणार. झालंही तसच. ९ ला सुटणारे विमान ३ तास उशीरा का होईना पण सुटले. तिथले हॉटेल अप्रतिम होते. हॉटेलच्या मागेच मत्स्यपुच्छ शिखर, अन्नपूर्णा शिखराचा काही भाग दिसतो असे कळले होते पण इतके ढग होते की काहीच दिसत नव्हते. तिथे आम्ही दोन दिवस राहणार होतो. पहाटे सूर्योदयाच्या वेळी अन्नपूर्णा शिखराचे दर्शन हे तिथले मुख्य आकर्षण होते. तिथे राहणारे काही लोक म्हणत होते, ‘ आम्ही पाच सहा दिवसांपासून इथे आहोत पण इतके ढग आहेत की सूर्योदय दिसलाच नाही.” आम्हालाही दुसऱ्या दिवशी पहाटे आमच्या ड्रायव्हरचा फोन आला की आज जाण्यात अर्थ नाही. ढग आहेत.

आम्ही आवरून तळ्याकडे फिरायला गेलो. तिथे काही मुली अन्नपूर्णा आणि मत्स्यपुच्छ पर्वतरांगांचे अप्रतिम फोटो असलेली पोस्टर्स विकत होत्या. आम्ही विचारले हे फोटो कुठून काढले आहेत? त्या हसून म्हणाल्या इथूनच. काय! इथून ही शिखरे दिसतात? आम्ही डोळे फाडफाडून बघितले पण ढगांशिवाय काही दिसत नव्हते. अरे बापरे, हिमालय आपल्याला प्रसन्न होणार की नाही!

संध्याकाळी आम्ही तिथे एक सुंदर संग्रहालय आहे ते बघायला गेलो. अमलाने मला हाक मारली आणि खिडकीबाहेर अंगुलीनिर्देश केला. अहाहा, मत्स्यपुच्छ शिखराचे टोक दिसू लागले होते. आम्ही हॉटेलमध्ये परते पर्यंत मावळतीची किरणांनी आरक्त झालेला आणखी थोडा भाग दृग्गोचर झाला होता. हॉटेलच्या गच्चीवर जाऊन सूर्यास्त होईपर्यंत आम्ही ते दृश्य डोळ्यात साठवत होतो. रात्री जोरदार पाऊस सुरु झाला. हॉटेलमधील माहितगार मंडळी खूश झाली. “ पाऊस पडला म्हणजे उद्या नक्की सूर्योदय दिसणार.” आपके मुंह में घी शक्कर म्हणत आम्ही पहाटेची वाट बघू लागलो.

पहाटे ४ ला उठून व्ह्यू पोईंट ला गेलो. अजून तसा अंधार होता पण पर्वतांच्या काळसर रेखाकृती दिसत होत्या.  सूर्योदय जिथे होणार त्या दिशेकडे आधी बघत राहिलो. मग लक्षात आले की उगवत्या सूर्याचे किरण शिखरांना उजळताना बघायला हवे, मग तिकडे तोंड करून उभे राहिलो. हळूहळू सूर्यनारायण उदित झाले आणि एकेका शिखरावर जणू दिवा लागत गेला . काय ती शोभा वर्णावी! शब्दातीत दृश्य, पण मी ते कवितेत बद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्या भागात पर्वताला हिमाल म्हणतात. तोच शब्द मी कवितेत घेतला.                                                                                                                                  मिलन

हिमाल राजाच्या मुकुटाचे रश्मी राणीने चुंबन घेतलं,

हलके हलके राजाने राणीला अंगभर लपेटून घेतलं.

काल तिन्हीसांजेपर्यंत ती त्याच्याबरोबरच होती.

नंतर सहस्ररश्मी पित्याबरोबर दूरदेशी गेली होती.

रात्र सरताच उषेचं बोट धरून रश्मी लगबगीनं आली.

वाट पाहणाऱ्या राजाला आवेगाने बिलगली.

हिमाल तेजोमय झाला की रश्मी हिममय झाली?

कुणास ठाऊक, पण दोघ एकरूप झाली.

हिमाल रश्मीच्या मिलनाची मी भाग्यवान साक्षीदार,

ह्या क्षणाबद्दल देवा, किती मानू आभार!

एका आगळ्या धुंदीतच परत आलो. त्या दिवशी हवा इतकी स्वच्छ होती की तलावाकाठच्या मुलीकडच्या पोस्टरमधलं आधी न दिसलेलं दृश्य प्रत्यक्ष बघून अगदी डोळ्याचं पारण फिटलं.

तिथून आम्ही चितवन अभयारण्यात जायला निघालो. आयलंड रिसोर्ट नावाच्या एका बेटावरच्या रिसोर्टमध्ये आम्ही राहणार होतो. जंगलातच वसवलेल्या त्या जागेत वीज नाही. झोपडीवजा खोल्या. बेट असल्यामुळे समोर वाहणारी नदी. अत्यंत रम्य ठिकाण. पायी चालत, हत्तीवरून, जीपमधून जंगलात मनसोक्त हिंडलो. तिथलं मुख्य आकर्षण म्हणजे एकशिंगी गेंडा. त्याचंही दर्शन झालं. तिथला आणखी एक भन्नाट प्रकार म्हणजे एलिफंट बेदिंग. हत्तींना नदीत आंघोळीला नेतात तेव्हा त्यांच्या पाठीवर आपण बसायचं. हत्ती सोंडेत पाणी घेऊन आपल्यावर फवारतात. मधेच पाठीवरून खाली पडतात. इतकी मजा आली म्हणून सांगू!

तिथे सूरज नावाचा आमचा गाईड होता. त्याने विचारलं, “रात्री जंगलात फिरायला आवडेल का?” दिलीप आणि मी लगेच तयार झालो. तो म्हणाला, “हत्ती झोपले की मी तुम्हाला बोलवायला येतो. हत्ती कसे झोपतात तुम्ही कधी पाहिलं नसेल.” खरंच की. नव्हतंच पाहिलं.

रात्री त्याच्याबरोबर निघालो. नेमकी त्या दिवशी पौर्णिमा होती. कुठेच वीज नसल्यामुळे टिपूर चांदण्यात न्हाऊन निघालेलं ते जंगल, चांदीचा प्रवाह असावा तशी दिसणारी नदी,निःशब्द शांतता, आम्ही भारल्यासारखे त्याच्या मागून चालत होतो. हत्तींच्या निवास स्थानापाशी गेलो. सूरजने आधीच सांगितलं होतं की सगळे हत्ती कधीच एकदम झोपत नाहीत. आळीपाळीने झोपतात. दोन जण पहारा देतात. आम्ही अगदी हळू, पाय न वाजवता गेलो. बघितलं तर खरंच दोन जागे होते. बाकीचे कुशीवर झोपलेले होते. खरंच सांगते झोपलेल्या बाळांना बघताना  जसं वात्सल्य मनात दाटत, तसं, दिवसभर आमची धुडे वाहून दमून भागून झोपलेले ते निरागस हत्ती बघताना माझ्या मनात दाटून आलं.

आणखी थोडं हिंडून सूरजने आम्हाला खोलीपर्यंत सोडलं. त्याला मनापासून धन्यवाद देऊन आम्ही दार लावलं. लगेचच त्याने परत दार वाजवले. दार उघडताच त्याने न बोलता फक्त नदीच्या दिशेने निर्देश केला. नदीपलीकडे एक गेंडा स्तब्ध उभा होता. स्वच्छ चांदण्यात न्हाऊन निघालेली चंदेरी नदी, गूढरम्य भासणारं जंगल आणि त्या नेपथ्यात उभा असलेला तो गेंडा , एखादे स्वप्नदृश्य असावे तसा तो देखावा होता. रात्री फिरायला न आलेल्यांना दुसऱ्या दिवशी आम्ही सगळ्याचं वर्णन जरा तिखट मीठ लावूनच सांगितलं.

काठमांडूला परतलो. ११.११.११. उजाडला. सकाळी ७.३० ला “ती” फ्लाईट होती. विमानतळावर जाण्यासाठी खाली आलो, तर हॉटेलच्या रिसेप्शनिस्टने सुहास्य मुद्रेने वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि एक सुंदरसा केक हातात ठेवला. हिला कसं कळलं हा प्रश्न मनात यायच्या आतच उत्तर सापडलं. उज्ज्वला ने केक ठेवला असणार. तेव्हढ्यात तिचा फोन आलाच. “ गाडी बाहेर उभी असेलच. आज हवा सुंदर आहे. तुझी एव्हरेस्ट बघायची इच्छा नक्की पूर्ण होणार. Happy Birthday.”  

विमानतळावर आलो. खरंच हवा अगदी स्वच्छ होती. असणारच होती. आधी कोणाजवळ बोलले नव्हते पण माझी दृढ श्रद्धा होती की देव माझा संकल्प सिद्धीला नेणार. विमानात बसलो. तिकिटाबरोबर एक मोठा फोटो दिला होता. जी शिखरं दिसणार त्यांचे नावासकट फोटो होते. विमानाने आकाशात भरारी घेतली. आम्ही  हातातल्या फोटोवरून शिखरं ओळखण्याचा प्रयत्न करत होतो. सगळीच शिखरं सुंदर दिसत होती. पण गौरीशंकर आम्हाला सगळ्यांनाच फार आवडलं. वैमानिक एकेकाला कॉकपिट मध्ये बोलावत होता. विमानाच्या खिडकीतून छानच दिसत होतं पण कॉक पिट मधून समोर दिसणाऱ्या हिमालयाची भव्यता श्वास रोखणारी होती. जसजसं विमान एव्हरेस्ट जवळ जाऊ लागलं तशी माझी धडधड वाढायला लागली. ८-९ महिन्यापासून जपलेलं स्वप्न पूर्ण होणार होतं. आणि- दिसलं- एवरेस्ट दिसलं. सगळ्या हिमनगांपेक्षा उंच, स्थितप्रज्ञ भासणारं, अवघ्या जगाच्या कुतूहलाचा विषय असलेलं ते अत्युच्च शिखर ११.११.११.ला मला दिसलं. तोपर्यंत विमानातल्या सगळ्यांनाच माझ्या वाढदिवसाबद्दल कळलं होतं, त्यामुळे एव्हरेस्ट दिसताच सगळ्यांनी Happy Birthday चा जल्लोष केला. माझा वाढदिवस खरोखर On top of the world साजरा झाला. अनेक भावनांची मनात गर्दी झाली होती. त्यांची नंतर कविता झाली. नेपाळी लोक एवरेस्टला सगरमाथा म्हणतात. कवितेचं शीर्षक अर्थात तेच.

                                       सगरमाथा

                                  तू सगरमाथा, नभाच ललाट

सगळाच हिमालय सुंदर , पण तुझा न्यारा थाट.

तुला भेटायचं म्हणजे गिर्यारोहकांना मोठं आव्हान,

सर्वात उत्तुंग स्थान म्हणून जगात तुला मोठा मान.

पण एक सांग,

इतक्या उंचावर कधी एकट एकट वाटतं का रे?

सोबतीची गरज कधीतरी भासते का रे?

अरे पण हो,

जमिनीपासून तू सर्वात दूर म्हणजे तुला जवळ आकाश,

म्हणजे ईश्वराचाच शेजार तुला, त्याचा सतत सहवास.

तुला बघण्यासाठी केव्हाचं आसुसल होतं मन

आणि अचानक तुझ्याबरोबर “त्यानेही” दिलं दर्शन.

खरं तर “तो” असतो निर्गुण निराकार,

पण माझ्यासाठी तुझ्या रूपात झाला सगुण साकार.

तुझं रूप कोरलं गेलं कायमचं माझ्या हृदयावर.

तुला बघता आलं ही देवाची केवढी कृपा माझ्यावर!-------------

आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...