गुरुवार, २७ मार्च, २०२५

कुळाचार २०२५/४

 


                                                                                                                                                          कुळाचार

आमचा ज्ञानेश्वरीचा वर्ग चालू होता. उत्तराताई शास्त्री अंत्यंत नेमकेपणाने गीतेचा श्लोक, त्यावरचं माऊलींचं भाष्य हे आम्हां अल्पज्ञांना अप्रतिम रीत्या समजावून सांगत होत्या.

पहिला अध्याय अर्जुनविषाद योगाचा. ‘सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यते’ शा अवस्थेतला अर्जुन ‘ मी माझ्याच आप्तांना युद्धात मारलं तर कुलक्षयाचं पाप मला लागेल’ हे भगवंताला सांगताना म्हणतो, ‘ कुलक्षये प्रणश्यन्ति कुलधर्माः सनातनाः|’

सनातन कुलधर्म म्हणजे माझ्या डोक्यात लगेच व्रतं-वैकल्यं, पूजा-अर्चा असा अर्थ जोडला गेला पण उत्तराताईनी तो गैरसमज दूर करून नेमका अर्थ विशद केला.

“ सनातन म्हणजे बुरसटलेला, कर्मठ नाही, तर दीर्घकाळच्या परंपरेने पिढ्यानपिढ्या चालत आलेले कुळाचार म्हणजे त्या कुळाची विशिष्ट संस्कृती, जगण्याची पद्धत, प्रेयस न दडपता श्रेयसाच्या मार्गाने कसं जायचं हे कुळाचार शिकवतात. त्यामुळे समाजाला स्वास्थ्य प्राप्त होतं. खरं तर वर्तनाच्या नियमांनाच भारतीय संस्कृतीत ‘धर्म’ म्हटलं गेलंय.”

वर्गाहून घरी येताना डोक्यात विचार सुरू झाले. अलीकडे वर्तनाच्या कितीतरी नियमांना ‘चलता है’ म्हणून तिलांजली दिली जाते.

मध्यंतरी एका कार्यालयात जेवायला गेले होते. पंगत होती त्यामुळे जरा बरं वाटलं. बहुतेक कार्यालयांत व्यवस्थित वाढतात, पण तिथे मात्र कुठेही, काहीही, कितीही, कसंही वाढणं चाललं होतं. ही एवढी चटणी उजवीकडे, भाजीचा ढीग डावीकडे, पातळ पदार्थ वाढताना डाव निपटून न घेतल्यामुळे पातेल्यातून वाटीत येईपर्यंत वरण, सार, अळूची भाजी इत्यादींचे रंगीबेरंगी ठिपके चादरीवर पडत होते. ते जेवणाचं पान इतकं कुरूप दिसत होतं की माझी अन्नावरची वासनाच गेली. त्यातून, हल्ली सगळी पंगत वाढून होईपर्यंत, पार्वतीपते.. म्हणेपर्यंत कोणी थांबतच नाही. ताटात पदार्थ पडला रे पडला की स्वाहा...

ही गोष्ट सहज एका मैत्रिणीजवळ बोलले तर ती लगेच फणकारली,  “तुझी नसती फॅडं असतात. काय फरक पडतो?”

मी मनात म्हटलं, ‘ काय फरक पडतो, या चलाऊ वृत्तीमुळेच आपला एकेकाळचा सुसंकृत समाज विकृत होत चाललाय.’

कोणतेही समारंभ कॉकटेल्सशिवाय न होणं, बुफेमध्ये परत-परत यायला नको म्हणून शिगोशीग प्लेट भरून घेणं आणि त्यातलं निम्मं अन्न टाकून देणं, उष्ट्या हातानेच अन्न वाढून घेणं- काय फरक पडतो? सार्वजनिक ठिकाणी हात-तोंड धुताना मोठमोठ्याने खाकरे काढणं, नाक शिंकरणं, चुळा भरल्यावर बेसिनमध्ये पाणी न ओतता आपण थुंकलेले अन्नाचे कण तसेच राहू देणं, पंगतीत सुद्धा पदार्थ मागून घेऊन टाकणं, ताट चिवडलेलं, बरबटलेलं ठेवणं- काय फरक पडतो?

माझी आई, सासूबाई नेहमी सांगतात, ‘ आपलं उष्टं ताट उचलणाऱ्याला किळस येतं कामा नये इतकं ताट स्वच्छ पाहिजे. लिंबाच्या फोडी किंवा मिरच्या-कढीलिंब वगैरे एकत्र करून वाटीत ठेवलं पाहिजे. यावरही काहींचं म्हणणं असतंच – हॅ, काय फरक पडतो? असं म्हणणाऱ्यांना एकदा पंगतीतली उष्टी ताटं उचलायला लावली पाहिजेत.

अनोळखी माणसाला, अगदी हॉटेलमधल्या वेटरला सुद्धा अहो-जाहो म्हणणं हे आमच्या घरातले संस्कार, त्यामुळे पटकन कुणी तिऱ्हाईताला अरे-जारे केलं की मीच कानकोंडी होते.

जिथे तिथे थुंकणं, कचरा टाकणं, आपल्या कुत्र्याला दुसऱ्याच्या दारात ‘बसवणं’ हे समाजाच्या आरोग्याला, सौंदर्याला घातक आहे हे कुणालाच जाणवत नाही? सार्वजनिक ठिकाणी पूजा-उत्सवाच्या नावाखाली स्पीकर्सची भिंत उभी करून कानठळ्या बसवणारी गाणी (?) लावणं, हिडीस अंगविक्षेप करत नाचणं याने समाजाचं सौष्ठव बिघडतं, असं कुणालाच वाटत नाही? प्रचंड मोठ्या आवाजाने आजूबाजूच्यांना त्रास होतो, क्वचित बहिरेपणाही येतो याची कुणालाच काही पडलेली नाही?


नुकतेच आम्ही रोटरी क्लबचे मित्र-मैत्रिणी लखनौ, अयोध्या-वाराणसीची ट्रीप करून आलो. ट्रीप अगदी छान झाली. अयोध्येला तर रामललाचं दर्शन इतकं सुंदर आणि विनासायास झालं की सगळेच अगदी कृतकृत्य झालो. पण त्या सुंदर दिवसाला गालबोट लावणारी एक गोष्ट रात्री घडली. त्या दिवशी उन्हात भरपूर चालणं झालं होतं. दमणूक झाली होती. आता रात्री मस्त झोपायचं अशा आमच्या सुखस्वप्नावर पाणी पडलं. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहिलो होतो, तिथेच खाली लॉनवर लग्नसमारंभ सुरू होता. उत्तरेकडची लग्नं मध्यरात्रीनंतरच लागतात. त्यामुळे आम्ही नऊच्या सुमारास खोलीत आलो तेव्हा स्पीकर्सची प्रचंड भिंत लावून कर्कश आवाजात गाणीबिणी चालू होती. त्यातून ते सगळं आमच्या खोलीच्या बरोब्बर खाली चालू होतं. धसका बसून मी रिसेप्शनला फोन करून विचारलं की हे किती वाजेपर्यंत चालणार आहे? तो म्हणाला ११. हरे राम! पण काही इलाजच नव्हता. प्रत्यक्षात मात्र बारा वाजून गेले तरी गोंगाट कमी होण्याचं नाव नाही. मी आपली सारखी खाली फोन करत होते. एकदा खाली जाऊन पण आले. त्यांचं म्हणणं – आम्ही सांगितलं पण आमचं ते ऐकत नाहीत. एक वाजता असह्य होऊन मी चक्क त्या मांडवात गेले. यजमानाला आवाज बंद करण्याची विनंती केली. सगळे दारू पिऊन तर्र झालेले. एकजण मला म्हणाला, ‘ शादी एक दिन ही होती है. सोते तो आप रोज है.’ काय बोलणार याच्यावर? मुकाट्याने परत खोलीत आले. थोड्या वेळाने रिसेप्शनिस्टला म्हटलं – पोलिसांना फोन करा. तो म्हणाला तुम्हीच करा. मी फोन लावला. तक्रार सांगितली. पुन्हा मला पोलिसांकडून दोनतीनदा फोन आला. ‘आम्ही आलो आहोत, खाली या’ म्हणाले. म्हटलं मी येणार नाही. रिसेप्शनिस्टला म्हटलं तू जा बाहेर. आवाज बंद झाला. मी सुटकेचा निःश्वास टाकला पण दहा मिनिटांत पुन्हा सुरू. मी पुन्हा पोलिसांना फोन लावला. तर ते म्हणाले, ‘ आम्ही येऊन आवाज बंद करायला लावला पण आम्ही गेल्यावर त्यांनी पुन्हा सुरू केला तर आम्ही काय करणार? आम्ही काही तिथे चोवीस तास बसून राहू शकत नाही. तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार करा.’ आता मात्र मी हतबलतेचा शेवटचा टप्पा गाठला होता. स्वस्थ पडून राहिले. दोन अडीचनंतर कधीतरी तो गोंधळ बंद झाला.

आपल्या देशाच्या घटनेने प्रत्येक नागरिकाला शांततेने जगण्याचा हक्क दिला आहे, पण इतरांनी तुम्हाला शांततेने जगू दिलं पाहिजे ना! भारताने क्रिकेट सामना जिंकला किंवा अगदी फुटकळ कारणांनी सुद्धा, जोरदार फटाके, रात्री-अपरात्री मोठमोठ्याने हॉर्न वाजवत, आरडाओरडा करत रस्त्यांतून बेफाम जायचं, मग त्याचा कोणाला त्रास झाला तरी बेहत्तर. ही विकृती का बोकाळत चालली आहे? मला वाटतं याचं एक कारण म्हणजे या मंडळींच्या अंगी लक्षवेधी काम करण्यासाठी स्वतःची कर्तबगारी नसते, मग स्वतःकडे इतरांचं लक्ष वेधून घेण्यासाठी असलेच आचरट उपाय उरतात.

शाळेत शिकलेलं एक सुभाषित आठवतं –

अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम्

परोपकारः पुण्याय पापाय परपीडनम् ||

अठरा पुराणांचं सार म्हणजे व्यासांची ही दोन वचनं – ‘दुसऱ्याला मदत करणं हे पुण्य आणि त्रास देणं म्हणजे पाप’

हा इतका (म्हटलं तर)सोपा आपल्या भारतीय संस्कृतीचा कुळाचार आहे, तर मग कोणतीही गोष्ट बोलताना, करताना समाजाच्या स्वास्थ्याला, सुबकतेला, नीतिनियमांना तडा जाणार नाही याचं भान राखणं फार अवघड आहे का?

मंजिरी धामणकर 

बुधवार, १९ मार्च, २०२५

असामान्य सामान्य २०२५/३

 

                              असामान्य सामान्य


आपल्याला रोज कित्येक माणसं भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यातून. अशाच प्रत्यक्ष, अप्रत्यक्षपणे भेटलेल्या, लौकिकार्थाने सामान्य समजल्या जाणाऱ्या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवलं ते मला खूप समृद्ध करून गेलं.

                                

एका लहान गावात माझा ‘चर्पटमंजिरी’ हा एकपात्री कार्यक्रम होता. गावातल्या प्रतिष्ठित घरी माझी उतरायची सोय केली होती. राहायचं नव्हतं, पण गावात पोचल्यावर जेवणखाण, जरा आराम करण्याची सोय त्यांच्याकडे होती. त्यांचा मुकुंद नावाचा ड्रायव्हर कम नोकर मला रेल्वे स्टेशनवर न्यायला आला होता. कार्यक्रमाच्या ठिकाणी न्यायलाही तोच होता. माझ्याबरोबर काही सीडीज् होत्या. मी मुकुंदला विचारलं, ‘ बाहेर एक टेबल लावलं तर तू सीडीज विकशील का?’ तो हो म्हणाला. मी सीडीजची संख्या, किंमत वगैरे लिहून पिशवी त्याच्या ताब्यात दिली.

कार्यक्रम छान झाला. गावातली सगळी मान्यवर, प्रतिष्ठित कुटुंबं आली होती. कार्यक्रम संपल्यावर तिथेच जेवून स्टेशनवर जायचं होतं. मुकुंद गाडी घेऊन तयार होताच. त्याने आधी सीडीजचा हिशोब दिला. आम्ही स्टेशनवर गेलो. गाडी यायला वेळ होता. मी एक सीडी काढून मुकुंदला दिली. म्हटलं, ‘ ही तुला भेट.’

तो म्हणाला, ‘  ताई, सांगणारच नव्हतो, पण आता सांगतो. हिशोब करताना माझ्या लक्षात आलं की एका सीडीचे पैसे कमी आहेत. गर्दीत कोणीतरी पैसे न देता उचलली असणार. मग मी तिथल्या वॉचमनची सायकल घेऊन घरी गेलो, तेवढे पैसे आणले आणि तुम्हाला बरोबर हिशोब दिला.

मी अवाक.’ अरे, तू तुझ्या खिशातले पैसे कशाला दिलेस?’

‘असं कसं ताई? तुम्ही माझ्यावर विश्वासाने जबाबदारी सोपवली होती. नेमके माझ्याजवळ काहीच पैसे नव्हते, म्हणून घरी जावं लागलं. तुम्ही जेवत होतात तोपर्यंत घरी जाऊन आलो.’

‘ अरे पण तुझ्याकडे गाडी होती तर सायकल का घेऊन गेलास?’

‘छे छे! माझ्या कामासाठी मालकांची गाडी कशी वापरायची? ‘

‘मग तुझं जेवण?’

‘राहू दे हो ताई, जेवणाचं काय एवढं! तुमचा इतका सुंदर कार्यक्रम ऐकूनच पोट भरलं माझं.’

मी त्याला सीडीचे पैसे दिले. तो घेताच नव्हता, पण बळजबरीने दिले. तिथे स्टेशनवर वडापावची गाडी होती तिथून त्याला वडापाव घेऊन दिला, खायला लावला. त्याच्या डोळ्यांत पाणी आलं, पण खरी हल्ले होते मी.

तथाकथित प्रतिष्ठित, श्रीमंत जमावातल्या कोणीतरी हातोहात सीडी लांबवली होती आणि या गरीब माणसाला इमान,विश्वास महत्त्वाचा वाटत होता. त्यासाठी स्वतःच्या पदराला खर लावायचीही त्याची तयारी होती.

कोणाला श्रीमंत म्हणायचं, कोणाला गरीब?


                                    

रोज घरी येणारा दूधवाला,पोस्टमन, पेपरवाला यांचं,एका संस्थेचा प्रतिनिधी एवढंच आपल्या लेखी अस्तित्व असतं. पत्र मिळाल्याशी कारण, तो पोस्टमन गोरा की काळा याच्याशी आपल्याला फारसं देणंघेणं नसतं. हल्ली ईमेल, व्हॉट्सअ‍ॅपच्या जमान्यात तर बिचाऱ्या पोस्टमनची कुणी वाटही पाहत नाही. पण पोस्टमनची एक व्यक्ती म्हणून दखल घ्यायला लावणारी एक घटना माझ्या बाबतीत बऱ्याच वर्षांपूर्वी घडली.

२००२ साली आम्ही तीन मैत्रिणींनी मिळून केलेल्या युरोपच्या अनोख्या कार ट्रीपबद्दलची माझी लेखमाला एका दैनिकात प्रसिद्ध झाली. अनेकांनी ती वाचून मला पसंतीची पावती दिली. पण मला आश्चर्याचा धक्का दिला तो एका पोस्टमनने. रोज दाराखालून पत्रे सरकवून जाणाऱ्या पोस्टमनने त्या दिवशी बेल वाजवली. मला वाटलं रजिस्टर असेल किंवा एखाद्या पत्राला कमी पैशाचं तिकीट लावलं असेल. पण तो म्हणाला, ‘ ताई, मी तुमचे सगळे लेख वाचले. अतिशय आवडले. मुद्दाम सांगावंसं वाटलं म्हणून बेल वाजवली.’ मी थक्क. त्याला आत बोलावलं. प्यायला ताक दिलं. तो सांगायला लागला. ‘ मी कॉलेजमध्ये असताना कविता करायचो. एक कवितासंग्रह प्रकाशित होण्याच्या बेतात असतानाच घराला आग लागली. इतर सामानाबरोबर कविताही जाळून गेल्या. मग पुढे पोट पाठीमागे लागलं आणि सगळंच राहून गेलं. पण काही चांगलं वाचलं, ऐकलं, की दाद दिल्याशिवाय राहवत नाही. बरं, येतो ताई.’ असं म्हणून तो सायकल मारत उन्हातून निघून गेला. तेव्हापासून तो निवृत्त होईपर्यंत आमची साहित्यिक मैत्री होती.

                                                                                                                                                    

एका गावातल्या जमीनदारांचा हृद्य किस्सा ऐकला. जमीनदार सुमारे सत्तरीचे. आता इनामं जरी गेली असली तरी गावात त्यांची जबरदस्त पत होती. अडल्यानडल्याचे कैवारी होते. भरपूर शेती होती, राबणारी कुळंहोती, सुबत्ता होती.

अचानक एक धक्कादायक बातमी कळली. इनामदारांना सारखा ताप येत होता म्हणून तपासणी केली तर निदान झालं रक्ताच्या कर्करोगाचं. जेमतेम चार-सहा आठवडे मिळतील असं डॉक्टर म्हणाले. झालं! गावावर शोककळा पसरली. पण इनामदार माणूसच वेगळा! त्यांनी गावकऱ्यांना बोलावून सांगितलं ,’ गड्यांनो, मी काही आता राहत नाही. बोलावणं आलं, जायला पाहिजे. तुमचा निरोप घेता येतोय हे काय कमी आहे? असं करा, येत्या शनिवारी सगळ्या गावाने वाड्यावर जेवायला यायचं. फक्कड मेजवानी करू या.

गावकरी रडायला लागेल, ‘ धनी, काय बोलताय? ही काय मेजवानीची वेळ आहे होय?’ इनामदार हसून म्हणाले, ‘ अरे माणूस गेल्यावर तेराव्याचं जेवण घालतात ना, ते मी आत्ताच घालतोय. माझी माणसं माझ्या डोळ्यादेखत पोटभर जेवताना बघून किती समाधान वाटेल मला!’

काय कमाल कल्पना आहे नाही! हां, मात्र त्यासाठी काळीज वाघाचंच हवं!!!

 

 

रविवार, १६ मार्च, २०२५

"शुद्धमती " blog no 2025/2

 


                                             


                                                शुद्धमती

‘नवक्षितिज’ – डॉ नीलिमा आणि डॉ चंद्रशेखर देसाई यांनी मतिमंद प्रौढांसाठी स्थापन केलेली निवासी संस्था. दोघेही आमचे जवळचे मित्र असल्यामुळे या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली गेली तेव्हापासून आजपर्यंतची वाटचाल जवळून बघितलेली. आज नवक्षितिजच्या २१ व्या वर्धापन दिनाला गेले असताना तो सर्व पट नजरेसमोरून तरळून गेला. शेखर-निलीमाची धाकटी मुलगी अदिती मतिमंद. तिचा पूर्णपणे स्वीकार करून तिच्यासारख्या इतर मुलांची १८ वर्षानंतर संपूर्ण जबाबदारी स्वीकारण्यासाठी नवक्षितिज उदयाला आली. त्यांना केवळ अन्न,वस्त्र, निवाराच नव्हे तर उदंड प्रेम आणि त्यांना त्यांचे आयुष्य सन्मानाने, क्रियाशीलतेने आणि अतिशय आनंदाने जगता येईल अशा सोयी हे नवक्षितिजचे वैशिष्ट्य. इथे आज साठीच्या घरात असलेली ‘मुले’ही आहेत. आजच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात काहींनी सादर केलेले देशभक्तीपर, पर्यावरणाचा संदेश देणारे कार्यक्रम बघताना त्यांचे शिक्षक आणि काळजीवाहक यांच्यापुढे आपोआपच मान झुकली. या सगळ्या प्रवासात नीलिमा एका अतर्क्य आजाराने सर्वांना सोडून गेली पण तिने आरंभलेले कार्य थांबले नाही. संस्था चालवणारे सर्वजण, तिथे राहून काम करणारे कर्मचारी, काळजीवाहक, त्यांची क्षुधाशांती करणाऱ्या अन्नपूर्णा- सर्वांना सलाम आहे.

आज स्टेजवरचा त्या ‘मुलांनी’ सादर केलेला सुंदर कार्यक्रम बघताना आणखी एक आठवण जागी झाली.

काही वर्षांपूर्वी कामायनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाला प्रमुख पाहुणी या नात्याने उपस्थित राहण्याचा योग आला. १९६४ मध्ये सिंधूताई जोशींनी मतिमंद मुलांसाठी सुरु केलेल्या या शाळेची निगडीला एक शाखा आहे. त्या शाखेचे स्नेहसंमेलन होते. सर्व कार्यक्रमांचे सूत्र होते – ‘नाती.’ त्यात वडील-मुलगा, गुरु - शिष्य, पैलवान – माती, गाव- गावकरी, देश – देशवासीय, देव- भक्त, निसर्ग- माणूस अश्या विविध नात्यांवर कार्यक्रम बसवलेले होते. दिव्यांग मुलांचे कार्यक्रम म्हणजे ‘ अशी असून सुद्धा त्या मानाने चांगले करताहेत’ असा जास्त कौतुकाचाच भाग असणार अशी धारणा, पण कार्यक्रम सुरु झाले आणि त्यात त्या मुलांची त्या त्या जागेवर उभे राहण्यातली अचूकता, शिकवलेल्या हालचाली तंतोतंत करण्याची धडपड, समरसता आणि सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व करताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले निर्व्याज हसू,हे बघताना माझ्या डोळ्यांना धारा केव्हा लागल्या माझे मलाही कळले नाही.

मुलांचे पोषाख, नेपथ्य, संगीत सगळेच उत्तम जमून आले होते. ते त्या मुलांकडून बसवून घेणाऱ्या शिक्षकांचे कौतुक करावे तितके थोडेच. विशेष म्हणजे कार्यक्रम चालू असताना एकही शिक्षक/शिक्षिका स्टेजवर तर नाहीच, पण विंगमध्ये सुद्धा उभे नव्हते. कोणाचे चुकले तर मुलेच त्याला कसे करायचे ते हसत हसत दाखवत होती. देशाचे नाते दाखवताना तर मुले हातात २६/११ च्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांचे फोटो असलेला फ्लेक्स घेऊन आली. सगळ्या हॉलने उभे राहून मानवंदना दिली.

 कामायनीचे वर्कशॉप आहे, त्यातील मुला-मुलींनी फिल्मी गाण्यांवर नृत्य सादर केले. त्यांची तालाची, लयीची समज बघून थक्क व्हायला झालं.

सलग ५ तास गाऊन रेकॉर्ड केलेला दिव्यांग मुलगा पृथ्वीराज इंगळे याचा शाळेतर्फे सत्कार करण्यात आला. त्याची आई सांगत होती की लिहिता वाचता येत नसूनही त्याला शेकडो गाणी पाठ आहेत. कुठूनही मधून म्युझिक लावलं तरी बरोब्बर तो ते गाणं सुरु करतो.

फक्त त्याला युगुलगीत म्हणता येत नव्हतं कारण आपण थांबायचं आणि गायिकेला गायला द्यायचं हे त्याला समजत नव्हतं. मग त्याची आई त्याला एखाद्या युगुलगीताचा व्हिडीओ दाखवायची, हिरोसारखे कपडे त्याला घालायची, हिरोईनचे कपडे स्वतः घालायची आणि मग तिचा भाग आला की त्याला थांबवून स्वतः गायची. त्यामुळे आता तो युगुलगीतेही उत्तम प्रकारे म्हणू शकतो.

खरोखरच धन्य आहे पालकांची, शिक्षकांची, मुलांना शाळेत नेण्या- आणणाऱ्या बसचालक-वाहकांची, इतर मदतनिसांची आणि अर्थातच अत्यंत निरागस असणाऱ्या या मुलांची. अर्थात त्यांचेही भावनांचे चढ उतार, रुसून बसणे असणारच पण मला वाटते ते क्षणिक असणार. कामायानीतल्या त्या मुलांना आणि नवक्षितिजमधल्या प्रौढांना बघताना मला सारखे जाणवत होते की परमेश्वराने त्यांना जसे जन्माला घातले त्या शुध्द स्वरूपातच ती आजही आहेत. आपल्यासारख्या तथाकथित बुद्धिमंतांप्रमाणे राग,लोभ,द्वेष,मत्सर यांची गाठोडी त्यांनी निर्माण केलेली नाहीत.

त्यामुळे त्यांचे प्रेम निरपेक्ष आहे. म्हणूनच त्यांना मंदमती म्हणण्याऐवजी ‘शुद्धमती’ म्हटले पाहिजे.

गुरुवार, १३ मार्च, २०२५

असे कलाकार असे रसिक २०२५/१

 




                                                                                                                                             असे कलाकार- असे रसिक

पं प्रभाकर कारेकर कालवश झाल्याची बातमी वाचली आणि खोल स्मृतिसागरातली सुमारे ५५ वर्षांपूर्वीची एक स्मृती तरंगत वर आली.

माझे वडील- त्या काळचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ ह ना फडणीस हे शास्त्रीय संगीताचे अत्यंत शौकीन. श्री क्लिनिक –या आमच्या हॉस्पिटलच्या वरच आमचे घर होते. घरातच गाण्याच्या मैफली करता याव्यात यासाठी आमचा दिवाणखानाच बाबांनी १८ फूट *४०फुटांचा बांधून घेतला होता, त्या मापाचे रुजामे बनवून घेतले होते. अनेक मोठमोठ्या गायकांच्या मैफली आमच्या घरी होत असत. सर्व व्यवस्था करण्यात माझ्या आईची अर्थात साथ होतीच.

पं प्रभाकर कारेकर हे सगळ्यांच्याच आवडीचे गायक. अत्यंत धारदार आवाज, कमालीचा फिरता गळा, यामुळे ते रसिकांच्या गळ्यातला ताईत होते. सवाई गंधर्व महोत्सवात तर ‘प्रिये पहा’- हे नाट्यगीत म्हटल्याशिवाय श्रोते त्यांना उठूच द्यायचे नाहीत.

आमच्या घरीही त्यांची मैफल झाली होती. चांगली ओळख होती.

एकदा मॉडर्न हायस्कूलच्या मैदानावर रात्री पं प्रभाकर कारेकर यांचे गाणे होते. आई-बाबा गेले होतेच. मैफल सुरू झाल्यावर थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. थोडा वेळ वाट पाहिली पण कमी होण्याचे काही चिन्ह दिसेना. सगळ्यांचाच हिरमोड झाला. पण तेवढ्यात आई-बाबांच्या काही कानगोष्टी झाल्या आणि बाबा पुढे जाऊन म्हणाले, “ पंडितजी आणि इतर सगळ्यांची तयारी असेल तर मला अर्धा-पाउण तास द्या. उरलेली मैफल आमच्या घरी होईल.” हे ऐकून अर्थातच सर्वांना सुखद आनंदाचा धक्का बसला. पंडितजींनी होकार दिला. आई-बाबा लगेच घरी गेले. घरच्या-हॉस्पिटलच्या नोकर-चाकरांना घेऊन हॉलमधले फर्निचर हलवून रुजामे घालून घेतले. आयोजकांनी ध्वनिव्यवस्था वगैरे इतर व्यवस्था केली.

बरोबर पाऊण तासाने पं प्रभाकर कारेकर गायला बसले आणि श्रोत्यांना अमृतानुभवाची पर्वणी लाभली. घरात इतक्या लोकांना पुरेल एवढ्या कॉफीसाठी दूध नसल्यामुळे आणि सगळी दुकाने बंद झाली असल्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रोत्यांना खास ‘गाण्याची कॉफी’ देता आली नाही याबद्दल आईने दिलगिरी व्यक्त केली. पण ती मैफल इतकी रंगली की सर्वांची तहानभूक  हरपली होती. (हे सगळे तपशील अर्थात नंतर कळले. त्यावेळी मी लहान होते.)

ऑगस्ट २००२ मध्ये बाबा गेले. नंतरचे दिवस वगैरे काही करायचेच नव्हते. समाजात नाव मिळवलेल्या व्यक्तींसाठी सहसा शोकसभा भरवतात. पण बाबांसाठी आम्ही ‘शौकसभा’भरवायचं ठरवलं. त्यासाठी पं कारेकरांशिवाय दुसऱ्या नावाचा विचारही कोणाच्या मनात आला नाही. अतिशय हृद्य वातावरणात उत्तम मैफल झाली.

त्या रात्री अगदी झोप लागताना मला पाठीवर एक शाबासकीचा हात जाणवला. भरून पावले.

आता सगळे स्वर्गस्थ रसिक पंडितजींच्या मैफिलीचा चिरंतन आनंद घेतील.

मंजिरी धामणकर 

पंडितजींनी गायलेल्या या नाट्यगीताचा आस्वाद घ्या.




आणखी एक ( किती?) बळी! २०२५/८

                                आणखी एक ( किती?) बळी! “ एखाद्या तात्कालिक कारणावरून दाम्पत्यात वाद झाला आणि त्यातून पतीने पत्नीला मारहाण क...