बुधवार, २७ मे, २०२६

सये! २/२०२६

 







सये!

सये,

तू नोकरी आणि घर दोन्ही आघाड्या सांभाळत असशील तर सर्वप्रथम एक कर- मनातली अपराधी भावना काढून टाक.नोकरीमुळे घराला, मुलांना पुरेसा वेळ देता येत नाही आणि घरगुती अडचणींमुळे कामाच्या ठिकाणी एकाग्रता होत नाही ही जी तुझी कुतरओढ होते, ती तुला हळूहळू पोखरते. तुला जमेल ती साधना प्रयत्नपूर्वक करत स्वतःचं व्यक्तिमत्व कणखर बनव, आत्मविश्वास वाढव. स्वतः स्वतःबद्दल आदर बाळगायला शीक. आपोआपच तुला दिशा सापडेल, मनाचे कप्पे करणं जमेल आणि मग ज्या क्षणी जिथे असशील, तिथे त्या क्षणाचं सोनं करशील.

सये,

बहुतेक वेळा आपली तक्रार असते- ‘ अलीकडे मला फार विसरायला होतं.’ पण खरं सांगू? समस्या अशी आहे की जे विसरायला हवं ते आपण विसरत नाही. अनेक वर्षांपूर्वी कोणीतरी केलेला अपमान,गरज असताना एखाद्याने न केलेली मदत, आपली चूक नसताना ऐकावी लागलेली बोलणी, आपण केलेल्या मदतीची दुसऱ्याने न ठेवलेली जाणीव, अशी अनेक ओझी आपण वेळच्या वेळी फेकून न देता प्राणपणाने जपत राहतो. नको वाकूस अशा निरर्थक ओझ्यांखाली. ‘ट्रॅव्हल लाईट’ हे तत्त्व प्रवासात जितकं सुखकर, त्यापेक्षा जीवनप्रवासात अधिक आनंददायी. प्रत्येक दिवसाला, माणसाला, मोकळ्या मनाने, पूर्वग्रहाशिवाय सामोरी जा आणि बघ, जग किती निर्मल दिसायला लागेल!

सये,

जेव्हा तुला कोणी विचारतं, ‘तुम्ही काय करता?’ तेव्हा तू गृहिणी असलीस तर ओशाळून सांगतेस, ‘काही नाही, मी घरातच असते.’ ही स्वतःची मानसिकता बदल. अभिमानाने सांग, ‘ मी फुलटाईम सुगृहिणी आहे, होममेकर आहे.’ हां, पण म्हणून सगळ्यांचा पसारा निस्तरण्यात धन्यता मानू नकोस. घरातल्या प्रत्येकाला जबाबदारीची जाणीव करून देणं, तीसुद्धा खुबीनं, हे सुगृहिणीचं प्रथम कर्तव्य आहे.

सये,

तू सुगृहिणी असलीस तरी पुढचं वाक्य कदाचित तुला आवडणार नाही. नोकरी, व्यवसाय करणाऱ्या किंवा छंद जोपासणाऱ्या स्त्रिया वेळेचं नियोजन अधिक चांगल्या रीतीने करतात; कारण उपलब्ध वेळ जितकी जास्त, तितकी कामाची लांबी वाढत जाते. तुला वाटत राहतं, घरातली कामं मेली संपतच नाहीत; पण रात्री विचार केलास की -आज दिवसभर मी असं काय केलं, ज्याने मला खूप समाधान मिळालं- तर हाती फारसं काही लागत नाही.

म्हणूनच दिवसाकाठी किमान दोन तास आपल्या आनंदासाठी, व्यक्तिमत्वाच्या समृद्धीसाठी वेगळे काढ, आणि बघ स्वतःमधला बदल!

सये,

प्रतिमेच्या चौकटीतून बाहेर पड. थांब, थोडं सोपं करून सांगते. तू कायम स्वतःला दुसऱ्याच्या चष्म्यातून बघतेस. दुसऱ्याच्या मनात स्वतःची एक प्रतिमा कल्पून त्या प्रतिमेला धक्का लागू नये म्हणून धडपडतेस. परिणाम? ना समोरच्याचं समाधान, ना स्वतःचं. सोडून दे ही धडपड. स्वतःच्या मनात सुद्धा स्वतःची प्रतिमा जपू नकोस. आदर्श सून, आदर्श पत्नी, आदर्श माता, आदर्श मैत्रीण, आदर्श आजी, नोकरीच्या ठिकाणी आदर्श कर्मचारी- काही अर्थ नाही ह्या विशेषणांना. ज्या वेळी जी भूमिका पार पाडायची ती समरसून, मनापासून, एवढंच पथ्य पाळ. जे शक्तीबाहेरचं आहे ते- मला जमणार नाही-हे सांगण्यात कमीपणा, अपराधीपणा वाटून घेऊ नकोस. सुपरवुमन म्हणवून घेण्याच्या अट्टाहासापायी आयुष्यातले महत्त्वाचे क्षण निसटून जाऊ देऊ नकोस. कुटुंबीय, मित्र-मैत्रिणींसह चवीचवीने आयुष्य चाख.

सये,

जरा बोलायला लाग. म्हणजे एरवी तू बोलघेवडी आहेस गं, पण नको तिथे गप्प बसतेस. अगं साधी गोष्ट. मुलांवर, नवऱ्यावर, मैत्रिणीवर चिडली असलीस तर अबोला धरतेस. त्यांनी माझ्या मनातलं ओळखावं, माझा मूड नाही हे समजून समजूत घालावी अशी अपेक्षा बाळगतेस आणि मग अपेक्षाभंग झाला म्हणून आणखी हिरमुसतेस, खंतावतेस. स्वतःविषयीच्या अनुकंपेने तुझं मन भरून येतं. नको अशी बिचारी होऊस. जो तो स्वतःच्या व्यापात इतकं मग्न असतो की दुसऱ्याचे मूड ओळखणं शक्य होत नाही; पण याचा अर्थ त्यांना तुझी कदर नाही असा लावू नकोस. जे खटकलं ते सांगून मोकळी हो. एखादेवेळी वाद होतील, पण ते तिथल्या तिथे संपवून टाक. पुढचा क्षण नवीन, ताजा असेल.

 

 

 


सये! २/२०२६

  सये! सये, तू नोकरी आणि घर दोन्ही आघाड्या सांभाळत असशील तर सर्वप्रथम एक कर- मनातली अपराधी भावना काढून टाक.नोकरीमुळे घराला, मुलांना पुरे...