शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०२४

प्रौढ लेकरू Blog no. 2024/9

 





                                                                  "प्रौढ लेकरू "

खेड्यामधले घर कौलारू हे गदिमांचं भावपूर्ण भावगीत - अगदी त्या घराचं मूर्तिमंत चित्र

त्यातल्या नादांसकट डोळ्यापुढे उभं करणारं. विशेषतः त्यातलं

“माजघरातिल उजेड मिणमिण

वृध्द काकणे करिती किणकिण

किणकिण ती हळू ये कुरवाळू

दूरदेशीचे प्रौढ लेकरू”

हे शेवटचं कडवं तर स्वतः प्रौढ झाल्यावर जास्तच जवळचं झालं. खरंच, जोपर्यंत मोठीमा णसं घरात, आसपास आहेत तोपर्यंत आपलं वय कितीही झालं तरी लेकरूपण संपत नाही, खूप छान उबदार वाटत राहतं. हे भाग्य परमेश्वराने भरभरून माझ्या पदरात घातलंय. आई वडील, सासू, सासरे यांच्याबरोबरच इतर ज्येष्ठ नातेवाईक, ओळखीचे यांचा खूप स्नेह लाभला,आजही लाभतो आहे. माझ्या माम्या,आत्या, मावश्या, काकू यांनी तर लाड केलेच पण माझ्यासासूबाईंच्या बहिणी, वहिन्या यांच्याकडून ही मला भरपूर प्रेम मिळालं, मिळतं आहे.

नातं नसलेल्या अनेकांनीही या प्रौढ लेकरावर माया केली आहे.

आमचे फॅमिली फ्रेंड इन्स्पेक्टर नाईक पोलिस दलातून निवृत्त झालेले. करारी, कडक शिस्तीचेभोक्ते. तोंडावर कधी कौतुक नाही करणार पण मनात उदंड प्रेम. नेहमी पेरू घेऊन यायचे.त्यात मला आवडतो म्हणून एक कडक पेरू नक्की असणारच. “घ्या, दगड आणलायतुमच्यासाठी. दात बीत पडले तर मला सांगू नका” ही वर पुस्ती.आमच्या घरासमोर राहणाऱं सोमण कुटुंब म्हणजे धामणकरांचे लोकमान्यनगर पासूनचे सख्खे शेजारी. सोमण आजी – त्यांना सगळे मम्मी म्हणायचे- अत्यंत प्रेमळ. आमच्या घरातल्या सगळ्यांचे वाढदिवस त्यांच्या लक्षात असायचे. फोन तर करायच्याच पण त्या त्या व्यक्तीच्या आवडीचा पदार्थ स्वतः करून घेऊन यायच्या. एकदा मम्मींनी फोन केला. म्हणाल्या येऊन जा. मी गेले. मनात उत्सुकता होती का बर मुद्दाम बोलावलं असेल? माझ्यासमोर गळ्यातल्या कानातल्याचे बरेच सेट्स ठेवले आणि म्हणाल्या “ घे कुठलं आवडेल ते”. “अहो पण हे कशासाठी आत्ता”? तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते ऐकून माझ्या डोळ्यात पाणीच आलं.

त्यांचे यजमान – पपा- जाऊन बरीच वर्षं झाली होती. माझं लग्न व्हायच्या कितीतरी आधी ते गेले होते. मी त्यांना पाहिलंच नव्हतं.

“पपांना डॉ. धामणकरांच्या ओळखीने तुझ्या वडिलांच्या हॉस्पिटल मध्ये- श्री क्लिनिक मध्ये नोकरी लागली होती. तेव्हा तू खूपच लहान- आठ- दहा वर्षांची होतीस. हॉस्पिटलच्या वरच घर असल्यामुळे तू खाली येऊन सगळ्यांशी गप्पा मारायचीस, गाणी बिणी म्हणायचीस. पपांना तुझं खूप कौतुक होतं. मला एकदा म्हणाले, “इतकी चुणचुणीत मुलगी आहे. पुढे नक्की नाव कमावणार बघ. मला तिला काहीतरी द्यायचंय. तू जरा तिच्यासाठी छान बांगड्या घेऊन ये.”

पण काही न काही कारणाने त्या बांगड्या काही आणल्या गेल्या नाहीत. पुढे पपा गेलेच. आता तुझे इतके कार्यक्रम होतात, पेपरमध्ये नाव फोटो बघून मला तेव्हाची आठवण झाली. म्हटलं पपांची तेव्हाची राहिलेली इच्छा आता तरी पूर्ण करूया. म्हणून हे आणलंय. तुला आवडेल ते घे.”

आमच्या घरासमोर राहणाऱ्या लीलुताई जोशी- माझ्या सासूबाईची खास मैत्रीण. अप्रतिम चित्रकार. माझ्या चर्पट्मंजिरी या एकपात्री कार्यक्रमाच्या पाचशेव्या प्रयोगाला त्यांनी आपणहून दरवाज्यापाशी सुंदर रांगोळी काढली, त्यात माझ्याबद्दल कौतुकाच्या चार ओळी लिहिल्या.

माझा आतेभाऊ दोन वर्षांसाठी इंग्लंडला गेला होता. २००५ मध्ये त्याची आई – माझी उषाआत्या आणि मी त्याच्याकडे जाणार होतो. मुंबईहून दुपारी १ वाजता जेट एअरवेजची फ्लाईट होती. मी सकाळी पुण्याहून जेटच्याच फ्लाईट ने गेले. उषाआत्या मुंबईला जॉईन होणार होती. मी मुंबईला पोचून डोमेस्टिक वरून इंटरनॅशनल एअरपोर्टला जाऊन पुन्हा सिक्युरिटी वगैरे सोपस्कार करून विमानात बोर्ड करेपर्यंत जरा उशीरच झाला. आत जायच्या रांगेत उभ्या असताना मी सहज आत्याला म्हटलं, “ भूक लागली बाई, केव्हा सकाळी निघालीये. डोमेस्टिक फ्लाईट असल्यामुळे काही खायला पण दिलं नाही. आता ह्या फ्लाईटमध्ये लवकर खायला दिलं म्हणजे बरं.” तिकीट वेगळं वेगळं काढल्यामुळे तिची आणि माझी सीट जवळ नव्हती. एअरहोस्टेसला सांगितलं तर म्हणाली आत्ता बसून घ्या, नंतर बघू.आम्ही बसतो न बसतो तोच कुर्सी की पेटी बांधनेका संकेत बिंकेत सुरूच झालं. अचानक माझ्या खांद्यावर हात पडला. दचकून पाहिलं तर आत्याबाई पोळीचे रोल घेऊन उभ्या. मी काही म्हणायच्या आत ते माझ्या हातात देऊन ती परत फिरली. तेवढ्यात एअरहोस्टेस तिला ओरडलीच. इतर सगळेजण ही तिच्याकडे नाराजीने बघत होते. हे सगळं का, तर भाचीला भूक लागली होती म्हणून.

कमलमावशी- माझ्या आईची बालमैत्रीण. कॅनडा मधे राहणारी. दर वर्षी हिवाळ्यात चार महिने पुण्यात यायची. अत्यंत धमाल प्रकरण. मावशीपेक्षा मैत्रीणच जास्त.

२००७ मध्ये मी अमेरिकेला जाणार हे कळल्याबरोबर मावशीबाईंनी हुकूम केला. माझ्याकडे कॅनडाला आलंच पाहिजे. मी तुला नायगारा दाखवायला नेणार आहे. नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. आठवडाभर तिच्याकडे मस्त माहेरपण झालं. नायगाराची ट्रीप तर केवळ अविस्मरणीय. तिच्या घरासमोर एक केनेडियन कुटुंब राहायचं. जेफ, शॅरन आणि त्यांच्या तीन मुली. एकट्या राहणाऱ्या कमल मावशीला त्यांची खूप मदत होत असे. शॅरनच्या माहेरचं कुटुंब खूप मोठं. पीच,प्लम चेरीच्या बागा, फुलशेती असणारं प्रचंड खटलं. त्यांची इस्टेट नायगाराच्या वाटेवरच. तिने सांगितलं तिथे नक्की जा. आम्ही अर्थातच गेलो. त्यावेळी पीचचा सीझन होता. शॅरनच्या वहिनीने बागा दाखवल्या,फळांची तोडणी, प्रतवार निवड, पॅकिंग सगळ्या प्रक्रिया समजावून सांगितल्या, प्रत्यक्ष दाखवल्या. ग्रीन हाउसमधली फुलांची शेती बघून तर डोळ्याचं पारणं फिटलं. निघताना मालकीण बाईंनी प्रीमियम क्वालिटी पीचेसची एक छोटी करंडी भेट दिली. काय रसरशीत फळ. तोंडाला अगदी पाणी सुटलं पण हावरटासारखं लगेच त्यांच्या समोर खाणं वाईट दिसलं असतं म्हणून कशीबशी कळ काढली. पण गाडी त्यांच्या इस्टेटीच्या बाहेर पडल्याबरोबर मी फराळ सुरु केला. शप्पत सांगते तशी पीचेस मी त्यापूर्वी आणि नंतर ही आजतागायत खाल्ली नाहीत. इतकी रसाळ होती की खाता खाता कितीही जपलं तरी रस गळत होता. तिच्या गाडीतले सगळे टिश्यू पेपर्स संपले तरी आपलं माझं कोपरापर्यंत आलेला रस चाटणं चालूच होतं. आम्ही दोघीही इतक्या हसत होतो की शेवटी पोट दुखायला लागलं. खरंच मी अगदी एखाद्या स्वच्छंद, उन्मुक्त छोट्या मुलीसारखी वागत होते. कमल मावशी, त्या क्षणांसाठी तुझे किती आभार मानू!

नायगाराच्या आधी नायगारा ऑन द लेक नावाचं एक गाव लागतं. किती टुमदार आणि देखणं म्हणून सांगू! जुलै ऑगस्ट महिन्यात तिथे थिएटर फेस्टिवल्स होतात. लोक नटूनथटून नाटकाला चालले होते. मला जरा हेवाच वाटला. नायगाराला पोचलो. लहानपणापासून इतकं ऐकलेला नायगारा प्रत्यक्ष पाहायला मिळणार म्हणून मी अगदी खूष होते. पाहिला.अगदी डोळे भरून पाहिला. मेड ऑफ द मिस्ट, टनेल वॉक सगळं काही अनुभवलं. त्यावर एक कविताही झाली. आमची मावशी जगमित्र. चक्क नायगारा गावात सुद्धा तिची एक मैत्रीण राहते. तिच्याकडे आम्ही राहणार होतो कारण रात्री त्या धबधब्यावर रंगीबेरंगी प्रकाशझोत टाकतात ते मला दाखवल्याशिवाय मावशीला चैन कसं पडणार!

तिच्या गावी ग्वेल्फला परत आलो. रोज काही न काही गम्मत चालूच होती. माझा कार्यक्रमही तिने तिथे ठरवला होता. इंग्लंडमध्ये शेक्सपियरचं गाव स्ट्रॅटफोर्ड ऑन अ‍ॅव्हॉन जसं जतन केलय त्याची प्रतिकृति ग्वेल्फजवळ आहे. तिथे गेलो. तशीच कमनीय वळण घेतलेली नदी,विहार करणारी बदकं, त्यावरचे देखणे पूल, काठावरचे पाण्यात डोकावणारे वीपिंग विलोज, सगळं तसंच. एक दिवस एका सुंदर थिएटरमध्ये जाऊन एक म्युझिकल नाटक बघितलं.

नायगारा ऑन द लेक मध्ये नाटक बघता न आल्याचं शल्य काही अंशी कमी झालं.

तिच्या घरून निघताना म्हणाली पुढच्या वेळी दिलीपला घेऊन ये. नायगाराच्या काठावरच्या आलिशान हॉटेलमध्ये तुमच्यासाठी हनिमून सूट बुक करते. मात्र ते राहूनच गेलं. कमलमावशीने त्या आधीच जगातून एक्झिट घेतली.

गेल्या जन्मी मी बरंच पुण्य कमावलं असणार म्हणूनच या जन्मात इतकं उदंड प्रेम वाट्याला आलं. मी ही मग मनात आलं की सगळ्या आज्यांना गाडीत घालते. कधी नाटक बघून, कधी मस्त फिरून खाऊन पिऊन आम्ही परत येतो. त्या थोरांमुळे माझं सानपण टिकून आहे.

मध्यंतरी लेकीच्या घरी गेले होते. मी बाहेरच्या खोलीत होते. तिने आतून हाकमारली, “ आई, गरम पोळी खायला ये”. अरेच्या, इतकी वर्षं मी तिला जी हाक मारत आले ती हाक आज माझी लेक मला मारते आहे? खरंच की, साठी जवळ आली म्हणजे दुसरं बालपण सुरू झालं म्हणायचं----

नायगारा कविता –


नायगाऱ्यास,

खरं सांगू?

लांबून पाहिलं तेव्हा तू त्या बाजारी वातावरणात मनाला भिडला नाहीस.

जितकं ऐकलं होतं त्या मानाने प्रथमदर्शनी तितकासा भावला नाहीस.

तू तेव्हा नक्की मनात मला हसला असशील

‘आगे आगे देख होता है क्या’ म्हणाला असशील.

झालंही तसंच,

तुझी धुंदपरी (मेड ऑफ द मिस्ट बोट )मला तुझ्याजवळ घेऊन गेली,

आणि बघता बघता जादूची कांडी फिरली.

इंद्रधनुष्याची कमान ओलांडून तुझ्या प्रासादात प्रवेश केला,

अन धीरगंभीर ओंकाराने अंगावर रोमांच उमटला.

आधी काही चुकार तुषारांनी गुलाबपाणी शिंपडून स्वागत केलं,

मग मात्र पाहुणचाराच्या सरींनी अंगभर भिजवलं.

शुभ्र फेसाळते लोट आवेगाने झेपावत होते,

खाली फुटून फेसाळताना धुक्याचा पडदा विणत होते.

मग तुझ्या पोटात शिरून (टनेल वॉक) तुझं रहस्य जाणण्याचा प्रयत्न केला,

तेव्हा ओठी तेच पोटी हा अंतर्बाह्य निखळपणा अनुभवला.

रात्री रंगीबेरंगी प्रकाशझोतात तुला पाहिलं,

पण त्या कृत्रिम रंगात तुझं भारदस्त देखणेपण मुळीच नाही मावलं.

सूर्यकिरणांच्या रोषणाईशीच तुझ्या तारा जुळतात,

इंद्रधनुष्याचे अलंकार तुझं सौंदर्य शतगुणित करतात.

मी निघाले तेव्हा सहस्रावधी धारांनी माझा निरोप घेतलास,

‘माझं बर्फाळ तटस्थ रूप बघायला ये’ प्रेमळ आग्रह केलास.

तुझे खूप फोटो काढले इतरांना दाखवण्यासाठी,

माझ्या मनःपटलाची छबी मात्र फक्त माझ्यासाठी,

अगदी खास माझ्याचसाठी ||

बुधवार, २ ऑक्टोबर, २०२४

सुभाषितप्रशंसा Blog no 2024/8

 







सुभाषितप्रशंसा 

दोनचार हजार वर्षांपासून चालत आलेली संस्कृत सुभाषिते हा केवळ अभ्यास करण्याचा विषय नाही, तर त्यांत शहाणपणा, व्यावहारिक ज्ञान आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दैनंदिन जीवनात कसे वागावे याचे उत्तम मार्गदर्शन चपखल उदाहरणांसह, केवळ दोन ओळींत सामावलेले असते.

एकेका विषयावरील दोन-तीन सुभाषिते, त्यांचा मी मराठी काव्यपंक्तीत केलेला अनुवाद, ( समश्लोकी असेलच असे नाही) आणि सविस्तर अर्थ असे या सदराचे स्वरूप असेल.  तर चला, लुटूया हे रत्नभांडार.

सुरुवात करूया सुभाषितांचा महिमा सांगणाऱ्या काही सुभाषितांनी

                                                                                                                                                                                                                     

१)  नायं प्रयाति विकृतिं विरसो न यः स्यात्

न क्षीयते बहुजनैर्नितरां निपीतः |

जाड्यं निहन्ति रुचिमेति करोति तृप्तिं

नूनं सुभषितरसोsन्यरसातिशायी ||

 

कधीहि नासत नाही, चव याची बिघडत नाही,

करोत प्राशन कितिही, तरीही हा संपत नाही.

अज्ञान करी हा दूर, गोडीने करतो तृप्त,

सुभाषिताचा रस हा, रस यापरि दुसरा नाही.

 

अर्थ - सुभाषितातील रस हा इतर  रसांपेक्षा श्रेष्ठ कसा आहे हे सांगताना सुभाषितकार म्हणतो – हा रस म्हणजेच यातील ज्ञान कधीही नासत नाही,( कालबाह्य होत नाही) बेचव होत नाही, कितीही जणांनी तो रस, ते ज्ञान ग्रहण केले, त्याचा आस्वाद घेतला तरी तो रस कमी होत नाही. अज्ञान, मूढता, मंदपणा  दूर करणारा हा रस इतका मधुर आहे की पिणारा अगदी तृप्त होतो.

 

२)  पृथिव्यां त्रीणि रत्नानि जलमन्नं सुभाषितम् |

मूढैः पाषाणखण्डेषु रत्नसंज्ञाम् विधीयते ||

 

पृथ्वीवर या तीनच रत्ने, पाणी, अन्न, नि सुभाषिते,

परि दगडांच्या तुकड्यांना मूढ व्यक्ति रत्ने म्हणते.

 

अर्थ - सुभाषितांचे महत्त्व अधोरेखित करताना सुभाषितकार म्हणतो की पृथ्वीवर जीवनाला आवश्यक अशी फक्त तीन रत्ने म्हणजेच मौल्यवान गोष्टी आहेत – पाणी, अन्न आणि सुभाषिते, पण मूर्ख माणसे मात्र केवळ दगडांच्या तुकड्यांना रत्ने म्हणतात आणि त्यांच्या हव्यासापायी आयुष्य वाया घालवतात.

 

३)  संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्यमृतोपमे |

सुभाषितरसास्वादः सङ्गतिः सुजनैः स ||

 

अमृतापरी दोन फळे ही संसाराच्या कटु वृक्षाची,

सुभाषितांचा रसास्वाद अन संगत सज्जन, साधुजनांची.

 

अर्थ - सुभाषितकाराने संसाराला कटू – कडू वृक्ष म्हटले आहे. त्या वृक्षाची इतर सर्व फळे – म्हणजेच अनंत अडचणी, दुःखे - कडू असतात पण ती दुःखे, त्या अडचणी सुकर करू शकतील अशी दोनच अमृतासारखी फळे या वृक्षाला आहेत – एक म्हणजे सुभाषितांचा आस्वाद घेणे – म्हणजेच त्यांतून बोध घेऊन वागणे आणि दुसरे म्हणजे सज्जन, सत्प्रवृत्त, सदसद्विवेकी लोकांच्या संगतीत राहणे.

या तिसऱ्या सुभाषितात सुभाषितकाराने सज्जनांच्या संगतीत राहावे असे सांगितले आहे. हे सज्जन म्हणजे कोण, त्यांची लक्षणे काय, त्यांना कसे ओळखावे हे पुढच्या भागात
पाहूया.

 


मंगळवार, २४ सप्टेंबर, २०२४

"पुढा स्नेह पाझरे" blog no. 2024/7

पुढा स्नेह पाझरे ---  








अहमदनगर मधील स्नेहालय आणि त्याचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी बहुतेकांना माहिती आहेत. त्यांचे अफाट कामही काही जणांना माहिती असेल. ज्यांना अधिक जाणून घ्यायचे असेल त्यांनी www.snehalaya.org या त्यांच्या वेबसाईटला अवश्य भेट द्यावी. 

स्नेहालयची माहिती सांगण्यासाठी या लेखाचा प्रपंच नाही, तर प्रत्येक भेटीत डॉ गिरीश कुलकर्णी यांचा एक वेगळाच पैलू दिसतो आणि आपले अचंबित होणे कसे थांबतच नाही हे मला सांगायचे आहे.

माझी मैत्रीण शुभांगी कोपरकर हिने स्नेहालयवर लिहिलेल्या ‘परिवर्तनाची पहाट’ या मराठी पुस्तकाचा मी हिंदी अनुवाद केला. ते पुस्तक ‘ परिवर्तन की प्रभात’ दि ५ जानेवारी २०१९ ला हिंदी साहित्यातील एक थोर व्यक्तिमत्व आणि पुणे विद्यापीठातील माजी हिंदी विभाग प्रमुख डॉ केशव प्रथमवीर यांच्या हस्ते स्नेहालयमधेच प्रकाशित झाले. त्या समारंभासाठी शुभांगी आणि मी गेलो होतो.

शुभांगी आता स्नेहालयच्या पुण्यातील प्रकल्पाचे – स्नेहाधारचे काम बघते. त्याविषयी तिला गिरीश सरांशी काही बोलायचे होते त्यामुळे कार्यक्रम स्थळी जाताना ते आमच्या गाडीत आले. इतर गोष्टी बोलून झाल्यावर शुभांगी त्यांना म्हणाली, ‘ आपल्या एका देणगीदारांची मुलगी अमेरिकेत असते तिला मोठी देणगी द्यायची आहे. तर आता तुम्हाला कुठल्या विशेष गोष्टीसाठी मदत पाहिजे ते सांगितले तर त्या त्याप्रमाणे व्यवस्था करतील.’ मग गिरीश सरांनी सांगितले ‘सध्या पाण्याचा खूप प्रश्न आहे त्यामुळे बोअरवेल करायची आहे, काही इमारतींची डागडुजी करायला हवी आहे, मुलींच्या वसतिगृहाचे पत्रे खूपच खराब झाले आहेत.’ 

मी ऐकत होते. हे बोलणे कुठल्याही संस्थाचालकासारखे होते. पण गिरीश कुलकर्णी ही चीजच काही और आहे, यावर त्यांच्या पुढच्या वाक्यामुळे पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले. त्यांच्याकडून स्फूर्ती घेऊन कित्येक कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या संस्था सुरु केल्या आहेत. त्यापैकी अजित कुलकर्णी याने अंध, मूक बधिरांसाठी ‘अनाम प्रेम’ नावाची संस्था सुरु केली आहे. गिरीश सर पुढे म्हणाले, ‘अनाम प्रेमला खूपच बेसिक गोष्टींसाठी पैशाची गरज आहे. त्या देणगीदारांना चालणार असेल तर स्नेहालय ऐवजी अनाम प्रेमला देणगी द्यायला सांगा.’ 

मला खरंच त्या क्षणी त्यांना साष्टांग नमस्कार घालावासा वाटला. स्वतःसाठी मागणे तर त्यांच्या कधी स्वप्नातही आले नसेल पण आपल्या संस्थेकडे येऊ पाहणारी एक मोठी रक्कम दुसऱ्या संस्थेला द्या असे सांगणाऱ्या माणसाला काय बिरूद लावायचे?

ज्ञानेश्वर माउलींनी तेराव्या अध्यायात ज्ञानी पुरुषाची लक्षणे सांगताना म्हटले आहे त्याची आठवण झाली -

पुढा स्नेह पाझरे| माघा चालती अक्षरे|

शब्द पाठी अवतरे| कृपा आधी||

मंजिरी धामणकर





मंगळवार, १७ सप्टेंबर, २०२४

ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट blog no. 2024/6





 ससा कासव शर्यतीची उरलेली गोष्ट 

नमस्कार,

ससा कासव शर्यतीची गोष्ट लहानपणापासून आपण शेकडो वेळा ऐकली आहे. त्याचं तात्पर्य देखील आपल्याला चांगलं ठाऊक आहे. शर्यतीत कासव जिंकलं हे सर्वांना माहिती आहे. पण शर्यत हरलेल्या सशाचं पुढे काय झालं असावं हे सांगणारी ही उरलेली अर्धी गोष्ट नुकतीच वाचनात आली. लेखक माहित नाही पण खूप आवडली गोष्ट म्हणून सांगावीशी वाटली.  

   "सशाने वेगाने धावता धावता मागे वळून पाहिलं, कासव दूरवर कुठेच दिसत नव्हतं. शर्यत ठरल्यापासून कासव सतत, सावकाश, न थांबता शेकडो मैल चालण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल बढाया मारत होतं. सशाला त्याला दाखवून द्यायचं होतं की तोही शेकडो मैल धावू शकतो आणि तेही वेगाने. त्यामुळे शर्यतीच्या विचाराने त्याला रात्रभर झोप लागली नव्हती. म्हणून झाडाची थंडगार सावली दिसल्यावर सशाने थोडा वेळ विश्रांती घ्यायची ठरवली.

 एक छानसा लांबटगोल दगड निवडून त्यावर मऊसूत गवत पसरून तो सशाने उशाला घेतला  आणि ताणून दिली. आजूबाजूला पानांची सळसळ, पक्ष्यांची किलबिल, थोड्या अंतरावरून वाहणाऱ्या ओढ्याचा खळाळ - सतत वेगाने धावण्याच्या उन्मादात आजूबाजूच्या इतक्या सुंदर जंगलाकडे त्याने कधी नीट पाहिलंच नव्हतं. सगळच वातावरण इतकं सुखद होतं की लगेच त्याचा डोळा लागला.

 त्याला स्वप्न पडलं की एका लाकडाच्या ओंडक्यावर झोपून तो ओढ्यातून वाहत चालला आहे. किनाऱ्याजवळ आल्यावर त्याला एक लांब दाढी असलेले साधू महाराज दिसले.  त्याच्याकडे बघून हसून त्यांनी विचारलं,

साधू -  ‘ कोण आहेस बेटा तू?’

ससा  - ‘ मी ससा आहे महाराज आणि मी कासवाशी शर्यत लावली आहे.’

 साधू  -‘ ती का बरं?’

 ससा - मी सगळ्यात वेगाने धावू शकतो हे सिद्ध करण्यासाठी.’

साधू  -- ‘ ते कशासाठी सिद्ध करायचं?’

ससा - म्हणजे काय! सरळ आहे. त्यामुळे मला पदक मिळेल, सन्मान मिळेल आणि सर्वात जास्त वेगाने धावणारा म्हणून माझ्यानंतरही माझं नाव घेतलं जाईल.’

 साधू  - ‘ पन्नास – शंभर वर्षांपूर्वी सर्वात वेगाने धावणाऱ्या हरणाचं नाव, किंवा सर्वात मोठ्या हत्तीचं, किंवा सर्वात बलशाली सिंहाचं नाव तुला माहिती आहे का?’

ससा -- ‘ अं --- नाही महाराज.’

साधू - ‘ आज तुला एका कासवाने आव्हान दिलंय, उद्या एखादा साप देईल, परवा झेब्रा. मग काय ‘ मी सगळ्यांपेक्षा जास्त वेगाने धावतो हे सिद्ध करण्यासाठी तू आयुष्यभर शर्यतच लावत राहणार?’

ससा - ‘ हं – हा विचार मी कधीच केला नव्हता.’

साधू  -- ‘ तर मग आता कर. शर्यत विसर. तुला आयुष्यात कशाने आनंद मिळतो हे शोध आणि ते कर.’

 सशाला जाग आली. त्याला खूप शांत वाटत होतं. तो निवांतपणे चालू लागला. वाटेत भेटणारा प्रत्येकजण विचारत होता, ‘ अरे तू इथे काय करतो आहेस? शर्यत लावली होतीस ना? कासव जिंकलं की. तू हरलास.’

ससा हसून म्हणाला, ‘ कासवाला त्याचा विजय लखलाभ. मला आता कोणतीच शर्यत लावायची नाही. मला शांतपणे माझं काम करत, प्रत्येक क्षणाचा आनंद घेत आयुष्य जगायचं आहे.’

गोष्ट मी लिहिलेली नसली तरी त्यातून माझं जे विचारचक्र सुरू झालं ते असं- 

मूळ गोष्टीपेक्षा या गोष्टीचं तात्पर्य अगदी वेगळं. पण विचार करायला लावणारं आहे, हो ना?

प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या शर्यतीत धावतो आहे- ऊर फुटेस्तोवर. परीक्षेतले मार्क, पद, प्रतिष्ठा,पैसा, प्रसिद्धी, गाडीचं, फोनचं मॉडेल, वाहनांचा वेग - अगदी सगळ्या सगळ्या गोष्टींत 'मी कसा सगळ्यांच्या पुढे जाईन ही चुरस. 

आता त्यात भर पडली आहे सोशल मीडियाची. फॉलोअर्स,सब्स्क्राइबर्स,व्ह्यूज, यांत चढाओढ. त्यासाठी रील्स बनवताना, सेल्फी घेताना जिवाचीही पर्वा नाही. मी इतरांपेक्षा आघाडीवर राहिलं पाहिजे- बस्स! कुठे जाणार आहोत आपण ही आघाडी घेऊन? लाख मोलाचा जीव असल्या क्षुल्लक स्पर्धेसाठी पणाला लावायचा? जे मिळवण्यासाठी इतका आटापिटा चालला आहे, ते मिळालं तर त्याचा उपभोग घ्यायला तरी वेळ आहे का? 

लहानपणी आजीकडून एक गोष्ट ऐकली होती. 

एका माणसाजवळ खूप अंथरूणं - पांघरुणं होती. त्याला वास्तविक एकच पुरणार होतं पण त्याला वाटलं सगळ्याचा उपभोग घेऊ. म्हणून तो सगळी अंथरूणं घालत बसला. शेवटचं घालेपर्यंत सकाळ झाली. त्याला झोपायलाच मिळालं नाही. 

विचार करू या. जाऊ दे कासवाला पुढे. आपण आनंदाचे क्षण वेचू या. 

   मंज़िलें मिलीं नहीं, तो चलो, रास्ते बदल लेते हैं

    वक़्त बदला नहीं, तो चलो, ख़्वाहिशें बदल लेते हैं,

    समय किसी के लिए रुकता नहीं,

    जो मिला है, चलो, उसीको संवार लेते हैं||

वाचकहो, पटलं,आवडलं तर कॉमेंट बॉक्समधे तसं नक्की लिहा. 

आणखी कुठल्या विषयाबद्दल वाचायला आवडेल तेही लिहा. मी नक्की लिहायचा प्रयत्न करीन. 

शनिवार, १४ सप्टेंबर, २०२४

आश्ना -उर्दू शायरीची मराठी सखी भाग १ Blog no. 2024/5

 


                                  

उर्दू शायरी, ग़ज़ल, या काव्यप्रकारात काही वेगळीच खुमारी आहे, लज्जत आहे. भाषेची नजाकत, शायराचं कविकल्पनेत स्वतःला झोकून देणं, त्यामुळे होणारी अतिशयोक्ती, हे सगळंच फार तरल, लोभस आहे. उर्दू शायरी न वाचणाऱ्या मराठी रसिकांपर्यंत ते वैभव आणावं म्हणून मी त्या शेरांचा मराठी काव्यपंक्तींत अनुवाद करायला सुरुवात केली. त्याचं पुस्तक झालं. त्यातलीच पानं स्कॅन करून मी इथे टाकते आहे, जेणेकरून त्यातील चित्रं देखील वाचकांना बघता येतील आणि पुस्तक वाचतो आहोत असं वाटेल. माझंच पुस्तक असल्यामुळे कॉपीराईटचाही प्रश्न नाही.  या पहिल्या भागात बघूया हे काही शेर ‘शायरी, ग़ज़ल,’ या विषयावरचेच –






यातील काही भागाचा दृक्श्राव्य अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ अवश्य बघा.




हे पुस्तक माझ्याच आवाजात स्टोरीटेलवर आहे. https://www.storytel.com/books/ashana-1475376?appRedirect=true

तेही तुम्ही ऐकू शकता.

 

 

मंगळवार, १० सप्टेंबर, २०२४

अद्भुत संस्कृत 2024/4

 

                                                                                                                      अद्भुत संस्कृत  


नमस्कार,

संस्कृत एक अद्भुत भाषा.  आजच्या लेखात संस्कृतची महती.  एकच गोष्ट स्पष्ट करते. संस्कृत हा माझ्या आवडीचा विषय आहे – अभ्यासाचा नाही. कदाचित एखादी चूक होऊ शकते. तेव्हा चूकभूल देणे-घेणे

सुसुवातीला मुंडक उपनिषदाचा हा शांतिपाठ

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम  देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः

स्थिरैरङ्गैस्तुष्टुवाँसस्तनूभिर्व्यशेम देवहितं यदायुः|

स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्त नः पूषा विश्ववेदाः

स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः , स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ||

हे देवांनो, आम्हाला कानांनी मंगलकारक ऐकायला मिळो, डोळ्यांनी चांगलं पाहायला मिळो. स्थिर (निरोगी) आणि सुदृढ अशा अवयव आणि शरीरासह आम्हाला दीर्घायुष्य प्राप्त होवो. इंद्र, पूषण,गरुड देव, आणि बृहस्पती आमचं कल्याण करो. 

संस्कृत भाषा कशी आहे तर -

भाषासु  मुख्य मधुरा दिव्या गीर्वाणभारती

तत्रापि काव्यं मधुरं, तस्मादपि सुभाषितम्||

संस्कृत ही किती समृद्ध भाषा आहे हे सिद्ध करणारा पुढचा श्लोक. यात केवळ हे एकच अक्षर वापरूनच पूर्ण अद्भुत श्लोक तयार केलेला आहे. किरातार्जुनीयम् काव्यसंग्रहातील हा श्लोक भारवि या महाकविने रचलेला आहे.  

 

न नोननुन्नो नुन्नोनो नाना नानानना ननु।

नुन्नोऽनुन्नो ननुन्नेनो नानेना नुन्ननुन्ननुत्॥

 

अनुवाद -दुर्बलाकडु होइ विद्ध जो

            दुर्बलावरी करी मात जो

           म्हणावेच ना नर हो त्याला

           संबोधावे भेकड त्याला  

 

अर्थ -  आपल्याहून दुर्बल असलेल्याकडून जो मात खातो किंवा पराभव स्वीकारतो तो आणि आपल्यापेक्षा दुर्बल असलेल्यावर जो हात उगारतो अशा दोघांनाही माणूस म्हणू  नये, भेकड म्हणावे.

 

रामकृष्ण विलोम काव्य, हा आणखी एक अद्भुत प्रकार.  

 

14 व्या शतकात दैवज्ञ सूर्यकवी नावाच्या कवीने रामकृष्ण विलोमकाव्य लिहिलं. विलोम म्हणजे डावीकडून किंवा उजवीकडून कसंही वाचलं तरी शब्द तेच असतात. साधे उदाहरण म्हणजे ‘समास’ हा शब्द. कसाही वाचला तरी ‘समास’ असाच राहतो. तर हे विलोम काव्य अद्भुत अशासाठी की ते सरळ वाचलं तर श्रीरामाचं चरित्र किंवा स्तुती आहे आणि उलटीकडून वाचलं तर श्रीकृष्णस्तुती आहे.  यातली ही एक ओळ-

 

तं भूसुतामुक्तिमुदारहासं वंदे यतो भव्यभवं दयाश्रीः

 

अर्थ – ज्याने भूमिकन्या सीतेला रावणाच्या कैदेतून मुक्त केलं, ज्याचं हास्य विलोभनीय आहे, ज्याचा अवतार श्रेष्ठ आहे,आणि ज्याच्याकडून सदैव दया आणि भव्यता प्रक्षेपित होते अशा त्याला ( रामाला) मी वंदन करतो.

 

आता उलटीकडून वाचताना –

 

श्रीयादवं भव्यभतोयदेवं संहारदा मुक्तिमुतासुभूतम्

 

अर्थ –ज्याच्या ठायी सूर्यचंद्राचं तेज आहे, ज्याने विध्वंसक पूतनेचा संहार केला आणि जो विश्वात्मा आहे, अशा यादवकुलोत्पन्न श्रीकृष्णाला मी नमन करतो.

 

असंच ‘ राघवयादवीयं’ हे आणखी एक रामकृष्णविलोम काव्य १७ व्या शतकात कांचीपुरमच्या कवी वेंकटाध्वरी यांनी लिहिलं.

 

त्यातला हा पहिला श्लोक

 

वंदेऽहं देवं तं श्रीतं रन्तारं कालं भासा यः ।

रामो रामाधीराप्यागो लीलामारायोध्ये वासे ॥ १॥

 

अर्थ – ज्यांच्या हृदयात सीता आहे, ज्यांनी पर्वत पार करून लंकेला जाऊन रावणाचा वध केला आणि वनवास पूर्ण करून अयोध्येला आले त्या श्रीरामांच्या चरणी मी प्रणाम करतो  

आता उलटीकडून वाचताना –

 

सेवाध्येयो रामालाली गोप्याराधी भारामोराः।

यस्साभालंकारं तारं तं श्रीतं वन्देऽहं देवम् ॥ १॥

 

अर्थ – जो सदैव माता लक्ष्मीसह विराजमान आहे, ज्याच्या शोभेपुढे  सर्व जडजवाहिराची शोभा फिकी आहे, जो रुक्मिणी आणि गोपींना पूज्य आहे, अशा श्रीकृष्णाच्या चरणी मी प्रणाम करतो

 

काय अफाट ही प्रतिभा आणि काय ही संस्कृतची क्षमता !

 

हल्ली अशी भीती व्यक्त केली जाते की संस्कृत भाषा लोप पावत चालली आहे.  तसं होऊ नये म्हणून पूज्य श्री वरदानंद भारती यांनी ईश्वराकडे पसायदान मागितलं आहे. तेच आपणही मागू या.

 

करुणानिधे प्रभो, नो दोषान् क्षमस्व भगवन्|

सुचिरात्प्रसुप्त देशं परिबोधयाशु भगवन||

भुविभूत सर्वभाषा, परिपूरिताभिलाषा|

श्वसितीव देवभाषा, तां पालयस्व भगवन्||.

आसीत् कदाचिदेषा, वाणी विशुद्धवेषा|

अधुना लवावशेषा, तां आश्रयस्व भगवन्||.

देशे स्वतन्त्रतायाः, प्राचीन सभ्यतायाः|

समयं समर्घतायाः पुनरानयस्व भगवन्||

 

अर्थ – हे करुणाकर परमेश्वरा, आमच्या दोषांना क्षमा कर. दीर्घकाळ निद्रेत असलेल्या या देशाला ज्ञानाने जागृत कर. पृथ्वीतलावर सर्व भाषांची अभिलाषा पूर्ण करणारी ही देवभाषा – संस्कृत – आज केवळ श्वसन करते आहे, तिचा सांभाळ कर. पूर्वी ही देववाणी विशुद्ध रूपाने वास करत होती, आता ती अवशेष मात्र शिल्लक राहिली आहे. तिला तू आश्रय दे. हे परमेश्वरा, या देशाला स्वतंत्रता, प्राचीन सभ्यता आणि वैभवसंपन्नतेच्या काळाकडे पुन्हा घेऊन जा.

 

 



 

 

१/२०२६ रम्य ही सर्वांहुन लंका

                                            रम्य ही सर्वांहुन लंका. ‘तो भाइयों और बहनों , आईये अगली पायदान पर सुनते हैं....” दर बुधवारी र...