असे कलाकार- असे रसिक
पं प्रभाकर
कारेकर कालवश झाल्याची बातमी वाचली आणि खोल स्मृतिसागरातली सुमारे ५५
वर्षांपूर्वीची एक स्मृती तरंगत वर आली.
माझे वडील-
त्या काळचे सुप्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ ह ना फडणीस हे शास्त्रीय संगीताचे
अत्यंत शौकीन. श्री क्लिनिक –या आमच्या हॉस्पिटलच्या वरच आमचे घर होते. घरातच
गाण्याच्या मैफली करता याव्यात यासाठी आमचा दिवाणखानाच बाबांनी १८ फूट *४०फुटांचा बांधून
घेतला होता, त्या मापाचे रुजामे बनवून घेतले होते. अनेक मोठमोठ्या गायकांच्या
मैफली आमच्या घरी होत असत. सर्व व्यवस्था करण्यात माझ्या आईची अर्थात साथ होतीच.
पं प्रभाकर
कारेकर हे सगळ्यांच्याच आवडीचे गायक. अत्यंत धारदार आवाज, कमालीचा फिरता गळा, यामुळे ते
रसिकांच्या गळ्यातला ताईत होते. सवाई गंधर्व महोत्सवात तर ‘प्रिये पहा’- हे
नाट्यगीत म्हटल्याशिवाय श्रोते त्यांना उठूच द्यायचे नाहीत.
आमच्या घरीही
त्यांची मैफल झाली होती. चांगली ओळख होती.
एकदा मॉडर्न हायस्कूलच्या
मैदानावर रात्री पं प्रभाकर कारेकर यांचे गाणे होते. आई-बाबा गेले होतेच. मैफल
सुरू झाल्यावर थोड्याच वेळात जोरदार पाऊस सुरू झाला. थोडा वेळ वाट पाहिली पण कमी
होण्याचे काही चिन्ह दिसेना. सगळ्यांचाच हिरमोड झाला. पण तेवढ्यात आई-बाबांच्या
काही कानगोष्टी झाल्या आणि बाबा पुढे जाऊन म्हणाले, “ पंडितजी आणि इतर सगळ्यांची
तयारी असेल तर मला अर्धा-पाउण तास द्या. उरलेली मैफल आमच्या घरी होईल.” हे ऐकून
अर्थातच सर्वांना सुखद आनंदाचा धक्का बसला. पंडितजींनी होकार दिला. आई-बाबा लगेच
घरी गेले. घरच्या-हॉस्पिटलच्या नोकर-चाकरांना घेऊन हॉलमधले फर्निचर हलवून रुजामे
घालून घेतले. आयोजकांनी ध्वनिव्यवस्था वगैरे इतर व्यवस्था केली.
बरोबर पाऊण
तासाने पं प्रभाकर कारेकर गायला बसले आणि श्रोत्यांना अमृतानुभवाची पर्वणी लाभली.
घरात इतक्या लोकांना पुरेल एवढ्या कॉफीसाठी दूध नसल्यामुळे आणि सगळी दुकाने बंद झाली
असल्यामुळे नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे श्रोत्यांना खास ‘गाण्याची कॉफी’ देता आली
नाही याबद्दल आईने दिलगिरी व्यक्त केली. पण ती मैफल इतकी रंगली की सर्वांची
तहानभूक हरपली होती. (हे सगळे तपशील अर्थात
नंतर कळले. त्यावेळी मी लहान होते.)
ऑगस्ट २००२
मध्ये बाबा गेले. नंतरचे दिवस वगैरे काही करायचेच नव्हते. समाजात नाव मिळवलेल्या
व्यक्तींसाठी सहसा शोकसभा भरवतात. पण बाबांसाठी आम्ही ‘शौकसभा’भरवायचं ठरवलं.
त्यासाठी पं कारेकरांशिवाय दुसऱ्या नावाचा विचारही कोणाच्या मनात आला नाही. अतिशय
हृद्य वातावरणात उत्तम मैफल झाली.
त्या रात्री
अगदी झोप लागताना मला पाठीवर एक शाबासकीचा हात जाणवला. भरून पावले.
आता सगळे
स्वर्गस्थ रसिक पंडितजींच्या मैफिलीचा चिरंतन आनंद घेतील.
मंजिरी धामणकर
पंडितजींनी गायलेल्या या नाट्यगीताचा आस्वाद घ्या.

सुरेख अनुभव, कारेकर एक भारदस्त आवाजाचे धनी. त्यांच्या मैफिलीचा आनंद चक्क घरी घेता आला. मंजिरी. भाग्यवान आहेस. सुंदर ब्लाॅग.
उत्तर द्याहटवाधन्यवाद
उत्तर द्याहटवा